वृत्त क्रमांक
पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संकल्प; नांदेड जिल्ह्यात 1 ते 7 नोव्हेंबरदरम्यान ‘ब्रिक्स शाश्वत जीवनशैली सप्ताह’
•नागरिकांनी अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा-मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांचे आवाहन
•प्लास्टिकमुक्ती, कचरा व्यवस्थापन, जलस्रोत संवर्धन व स्वच्छतेसाठी विविध उपक्रम
नांदेड, दि. 30 : पर्यावरणाचे संवर्धन, नैसर्गिक संसाधनांचा काटकसरीने वापर आणि स्वच्छतेच्या चळवळीत लोकसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने नांदेड जिल्ह्यात 1 ते 7 नोव्हेंबर 2026 या कालावधीत ‘ब्रिक्स शाश्वत जीवनशैली सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहानिमित्त जिल्ह्यातील ग्रामपंचायती, शाळा, युवक मंडळे, महिला मंडळे, बचत गट आणि विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून जनजागृतीपर तसेच कृतीशील उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगीकार करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी केले आहे.
भारताच्या 2026 मधील ब्रिक्स अध्यक्षपदाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या वतीने देशभरात या सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. ‘मिशन लाईफ’च्या सात प्रमुख संकल्पनांवर आधारित या अभियानातून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा प्रसार, नैसर्गिक संसाधनांचे जतन आणि नागरिकांच्या दैनंदिन सवयींमध्ये सकारात्मक बदल घडविण्यावर भर देण्यात येणार आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) च्या उद्दिष्टांशी सुसंगतपणे जिल्ह्यात एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळणे, ई-कचऱ्याचे प्रमाण कमी करणे आणि कचऱ्याची निर्मिती रोखणे यासाठी विशेष जनजागृती करण्यात येणार आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 बाबत नागरिकांना माहिती देणे, घरगुती स्तरावर कचऱ्याचे चार प्रकारांत वर्गीकरण करण्यासाठी प्रबोधन करणे तसेच प्लास्टिक कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी वापर कमी करणे, पुनर्वापर आणि पुनर्चक्रण या त्रिसूत्रीचा प्रसार करण्यात येणार आहे.
ग्रे-वॉटर अर्थात घरगुती वापरानंतर निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, शासकीय कार्यालयांचे परिसर आणि जलस्रोतांची स्वच्छता राखण्यासाठी विशेष स्वच्छता मोहिमा राबविण्यात येणार आहेत. कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत स्वच्छतेच्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामस्तरावर लोकसहभाग वाढविण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
या सप्ताहाच्या माध्यमातून केवळ पर्यावरणविषयक जनजागृती न करता पर्यावरणपूरक सवयी दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पाणी, ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधनांचा जपून वापर, प्लास्टिकचा मर्यादित वापर, कचऱ्याचे योग्य वर्गीकरण आणि परिसर स्वच्छ ठेवणे यांसारख्या कृतींमधून शाश्वत जीवनशैलीची चळवळ अधिक व्यापक करण्याचे उद्दिष्ट आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत, शाळा, युवक मंडळे, महिला मंडळे, बचत गट, शासकीय विभाग आणि नागरिकांनी या सप्ताहात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा. लोकसहभागातून स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक गावांच्या निर्मितीस हातभार लावावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील आणि जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मयूरकुमार आंदेलवाड यांनी केले आहे.
**
No comments:
Post a Comment