वृत्त क्रमांक
एफएफएस ॲपद्वारे नांदेड जिल्ह्यात 3,553 शेतकऱ्यांची 928 मे. टन खतासाठी नोंदणी
• खत खरेदीतील पारदर्शकतेसाठी डिजिटल सुविधेचा लाभ घ्या-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन
नांदेड, दि. 28 : शेतकऱ्यांना आवश्यक खते सुलभतेने उपलब्ध व्हावीत, खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता वाढावी आणि खत खरेदीसाठी होणारी गर्दी टाळता यावी, यासाठी केंद्र शासनाने ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (एफएफएस) हे ॲप उपलब्ध करून दिले आहे. या सुविधेचा नांदेड जिल्ह्यातील शेतकरी लाभ घेत असून, आतापर्यंत 3 हजार 553 शेतकऱ्यांनी 928 मेट्रिक टन खतासाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या सुविधेचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी द. रा. कळसाईत यांनी केले आहे.
केंद्र शासनाची ही डिजिटल प्रणाली महाराष्ट्रात 22 ऑक्टोबरपासून लागू झाली आहे. शेतकऱ्यांना मोबाईलमधील प्ले स्टोअरवरून एफएफएस ॲप डाउनलोड करून आपल्या परिसरातील खत विक्री केंद्रांवर उपलब्ध असलेली खते, त्यांचा साठा आदी माहिती घरबसल्या मिळविता येते. आवश्यक खताची ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर संबंधित विक्रेत्याकडून खत खरेदी करणे अधिक सुलभ होते. त्यामुळे खत खरेदीसाठी दुकानांबाहेर रांगा लावण्याची गरज कमी होणार आहे.
एफएफएस प्रणालीमुळे खत विक्री प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. खतांची छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणे तसेच अनुदानित खतांसोबत इतर कृषी निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करणे यांसारख्या प्रकारांना आळा घालण्यास या प्रणालीची मदत होईल. ऑनलाइन नोंदणीमुळे खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता वाढून शेतकऱ्यांना आवश्यक खत उपलब्धतेची माहिती वेळेत मिळू शकेल.
नोंदणीनंतर 72 तासांत खताची उचल आवश्यक
शेतकऱ्यांनी एफएफएस ॲपवर खताची नोंदणी केल्यानंतर 72 तासांच्या आत संबंधित खताची उचल करणे बंधनकारक आहे. त्यामुळे नोंदणी करताना खताची प्रत्यक्ष गरज, आवश्यक प्रमाण आणि खरेदीसाठी उपलब्ध असलेला वेळ यांचा विचार करावा. तसेच ॲपचा वापर करताना आधारशी संलग्न मोबाईल क्रमांकावर येणाऱ्या एकवेळच्या संकेतांकाद्वारे (ओटीपी) पडताळणी केली जाते. यासाठी शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड व त्यास संलग्न मोबाईल क्रमांक अद्ययावत ठेवावेत.
एफएफएस ॲपचा वापर करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी तालुकास्तरावर व्यवस्था करण्यात आली आहे. गावपातळीवर क्षेत्रीय सहाय्यक कृषी अधिकारी व संबंधित उपकृषी अधिकारी यांच्यामार्फत शेतकऱ्यांना ॲप हाताळण्याचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले जात आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीऐवजी ऑनलाइन नोंदणी सुविधेचा अधिकाधिक वापर करावा. या सुविधेमुळे खत वितरण अधिक सुलभ व पारदर्शक होण्यास मदत होईल, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी द. रा. कळसाईत यांनी केले आहे.
***
No comments:
Post a Comment