वृत्त क्रमांक
नांदेडमध्ये १४ वर्षीय प्रणव मेंडके बेपत्ता ; शोध घेण्यासाठी पोलिसांचे आवाहन
नांदेड, दि. २८ ऑक्टोबर : नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १४ वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. प्रणव रामेश्वर मेंडके असे या मुलाचे नाव असून तो इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे. नातेवाइकांनी शोध घेऊनही तो आढळून न आल्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, भाग्यनगर पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
घरातून पहाटे निघाला, अद्याप परतला नाही
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रणव मेंडके हा सोमवार ५ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे ४.२० वाजण्याच्या सुमारास घरातून निघून गेला. त्यानंतर तो घरी परतला नसल्याचे समोर आले आहे. नातेवाइकांनी त्याचा विविध ठिकाणी शोध घेतला; मात्र तो सापडला नसल्याने अखेर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली.
प्रणव हा मूळचा भोकर तालुक्यातील आमदरी वाडी येथील रहिवासी असून, सध्या तो नांदेड शहरातील छत्रपती चौक परिसरातील मोरेश्वर प्लाझा, प्लॉट क्रमांक ३०१ येथे राहत होता.
बेपत्ता मुलाचे वर्णन
प्रणवची उंची सुमारे पाच फूट असून, रंग सावळा आणि शरीरबांधा सडपातळ आहे. त्याचा चेहरा लांबट असून, बेपत्ता झाला त्यावेळी त्याने ग्रे रंगाचा हाफ टी-शर्ट, हिरवट रंगाची नाइट पँट परिधान केली होती. तसेच त्याच्या तोंडाला लाल रंगाचा मास्क सदृश बांधलेले कापड आणि पायात सॅन्डल होते. त्याला चहा पिण्याची सवय व मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा बोलता येत असल्याची माहिती पोलिसांच्या शोधपत्रिकेत नमूद करण्यात आली आहे.
माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन
बेपत्ता प्रणव मेंडके याच्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास त्यांनी तात्काळ भाग्यनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी केले आहे. संपर्क क्रमांक भाग्यनगर पोलीस ठाणे ०२४६२-२६१३६४, पोलीस निरीक्षक संतोष तांबे ९८५०१८८१००, तपासीक अंमलदार आर. पी. जाधव : ९०४९३४३०९५ हा आहे. बेपत्ता मुलाचा शोध घेण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे आणि त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास वरील क्रमांकांवर त्वरित कळवावे, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.
0000

No comments:
Post a Comment