Thursday, September 24, 2026

वृत्त क्रमांक 

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम

६ आस्थापनांमधून ६७५ किलो अन्नसाठा जप्त; ५४ अन्न नमुने विश्लेषणासाठी पाठविले

ग्राहकांनी दक्षता घेण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका), दि. २४ : सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार मिठाई, खवा, दूध, दुग्धजन्य पदार्थ तसेच इतर अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ ही राज्यव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासन, नांदेड कार्यालयामार्फत जिल्ह्यात विशेष तपासणी अभियान राबविण्यात आले.

या अभियानात विविध ६ आस्थापनांची तपासणी करून ८ अन्न नमुने घेण्यात आले असून, एकूण ६७५ किलो अन्नसाठा, अंदाजे किंमत २ लाख ८९ हजार ८० रुपये, जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या साठ्यामध्ये तूप, खवा, कुंदा पेढा, स्वीट पेढा, मावा पेढा तसेच खाद्यतेलाचा समावेश आहे.

या तपासणीदरम्यान मे. शिवकृपा दूध भांडार, देगलूर नाका, नांदेड येथून ८८ किलो तूप व ४९ किलो खवा, मे. श्रीसाई खवा सेंटर, मालेगाव रोड, नांदेड येथून ९९ किलो खवा, मे. खंडेलवाल मिठाई, एमआयडीसी, नांदेड येथून ९९ किलो खवा जप्त करण्यात आला. तसेच मे. बदामराव पेढेवाले, पाळज, ता. भोकर येथून ३८ किलो कुंदा पेढा व ७८ किलो स्वीट पेढा, मे. काशीराम दाचावर, कुंडलवाडी, ता. बिलोली येथून १४६ लिटर रिफाईंड सोयाबीन तेल (कृष्णा गोल्ड) आणि मे. जगदंबा बिकानेर, वाई बाजार, ता. माहूर येथून ७८ किलो मावा पेढा जप्त करण्यात आला.

याशिवाय जिल्ह्यातील स्वीट मार्ट, दूध व दुग्धजन्य पदार्थ तसेच इतर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या २८ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान खवा, पनीर, पेढा, बर्फी, खाद्यतेल आदींचे एकूण २६ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेऊन प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.

सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांची खरेदी करताना ग्राहकांनी परवानाधारक विक्रेत्यांकडूनच अन्नपदार्थ खरेदी करावेत. पॅकबंद अन्नपदार्थ खरेदी करताना पॅकिंगवरील माहिती, वैधता कालावधी व इतर आवश्यक तपशील तपासून घ्यावेत. मिठाई व दुग्धजन्य पदार्थांची योग्य ठिकाणी साठवणूक करण्यात आली आहे का, तसेच त्यांचा लवकर वापर केला जातो का, याचीही दक्षता घ्यावी.

अन्न भेसळ अथवा असुरक्षित अन्नपदार्थांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन, नांदेड कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच FOSCOS या ऑनलाइन पोर्टलवर अथवा complaints.mahafda.in या पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन, नांदेड कार्यालयाच्या सहायक आयुक्तांनी केले आहे.

**

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   लोकसंवादाच्या माध्यमातून श्री राजस्थानी नवयुवक गणेश मंडळ येथे शासनाच्या विविध योजनांची जनजागृती नांदेड (जिमाका), दि. 24 : शा...