वृत्त क्रमांक
जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड (जिमाका), दि. २४ : अनंत चतुर्दशी, विविध धार्मिक कार्यक्रम, महापुरुषांच्या जयंती तसेच विविध सामाजिक व आरक्षण विषयक आंदोलने, मोर्चे आणि रॅलींच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.
अपर जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांनी जारी केलेल्या आदेशानुसार दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपासून ते दि. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण नांदेड जिल्ह्यात हा आदेश लागू राहणार आहे.
अनंत चतुर्दशीच्या अनुषंगाने दि. २५ सप्टेंबर रोजी नांदेड शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जन मिरवणुका, अन्नदान व इतर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तसेच दि. २८ सप्टेंबर रोजी मुखेड येथे हजरत मस्तान शाह वली संदल/उर्स, दि. ४ ऑक्टोबर रोजी धर्माबाद येथील गांधीनगर येथे सैफअली बाबा संदल/उर्स कार्यक्रम होणार आहेत. दि. २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत.
तसेच ओबीसी, मराठा, अनुसूचित जाती उपवर्गीकरण, आदिवासी, बंजारा, वंजारी व धनगर आरक्षणाच्या अनुषंगाने विविध आंदोलने, मोर्चे व रॅली होण्याची शक्यता आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी आंदोलने, तसेच सीजेपीच्या वतीने आंदोलन, मोर्चा व निवेदन देण्याची शक्यता आहे. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व शेतकरी संघटनांकडूनही आंदोलने होण्याची शक्यता लक्षात घेण्यात आली आहे.
आदेशाच्या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी किंवा त्याच्या जवळपास शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येणारी इतर कोणतीही वस्तू जवळ बाळगता येणार नाही. तसेच दाहक किंवा स्फोटक पदार्थ, दगड अथवा इतर क्षेपणास्त्रे किंवा ती फेकण्यासाठीची उपकरणे जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे यास मनाई करण्यात आली आहे.
जाहीरपणे घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल अशा प्रकारची आवेशपूर्ण भाषणे, हावभाव, चित्रे, चिन्हे किंवा फलकांचे प्रदर्शन व प्रसार करण्यासही मनाई राहणार आहे.
नांदेड जिल्ह्यात रस्त्यावर पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन वरीलप्रमाणे प्रतिबंधित कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे.
मात्र, कामावरील पोलीस अधिकारी किंवा इतर शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा तसेच सक्षम प्राधिकाऱ्याने विशेष परवानगी दिलेल्या मिरवणुका यांना हा आदेश लागू राहणार नाही. सभा, मिरवणुका, मोर्चे, पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचे एकत्र येणे तसेच ध्वनीक्षेपक वापरण्यास परवानगी देण्याचे अधिकार संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तसेच पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना राहतील.
हा आदेश बहुसंख्य नागरिकांना लागू असल्याने त्याची दवंडीद्वारे, ध्वनिक्षेपकाद्वारे तसेच विविध प्रसारमाध्यमांतून व्यापक प्रसिद्धी करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक, नांदेड यांना देण्यात आल्या आहेत. आदेशाच्या प्रती जिल्ह्यातील सर्व उपविभागीय दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी व पोलीस ठाण्यांच्या नोटीस बोर्डवर लावण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
***
No comments:
Post a Comment