Thursday, September 24, 2026

वृत्त क्रमांक 

पीक कापणी प्रयोग वस्तुनिष्ठ व काटेकोरपणे करा– जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

• पर्जन्यमानातील घट लक्षात घेऊन पीक कापणी प्रयोगांबाबत दक्षतेचे निर्देश

नांदेड (जिमाका), दि. 24 : नांदेड जिल्ह्यात चालू पावसाळी हंगामात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत पर्जन्यमानात घट झाली असून, त्याचा परिणाम पीक उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन जिल्ह्यातील पीक कापणी प्रयोग काळजीपूर्वक, वस्तुनिष्ठ व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पूर्ण करावेत. पीक कापणी प्रयोगांमध्ये कोणत्याही प्रकारचा आक्षेप किंवा तक्रार येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.

कृषी विभागाच्या वतीने डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आज जिल्हास्तरीय पीक कापणी प्रयोग उजळणी प्रशिक्षण कार्यशाळचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लातूरचे विभागीय कृषी सहसंचालक महेश तीर्थकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, कृषी उपसंचालक कैलास वानखेडे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि ग्रामस्तरावरील कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले की, पीक कापणी प्रयोग हे पीक उत्पादन निश्चित करण्यासाठी महत्त्वाचे असल्याने ते अचूक व वस्तुनिष्ठ पद्धतीने घेणे आवश्यक आहे. पीक विमा योजनेच्या अनुषंगाने हे प्रयोग महत्त्वाचे असल्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींशी समन्वय ठेवून प्रयोग पूर्ण करावेत. पीक नुकसानीचे निकष विचारात घेऊन शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे. शून्य उत्पादन नोंदविल्या जाणाऱ्या पीक कापणी प्रयोगांचे आवश्यक पंचनामे करावेत.

पीक कापणी प्रयोगांच्या दैनंदिन आढाव्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करावा. दररोज पूर्ण झालेल्या प्रयोगांचा अहवाल सादर करावा. जिल्ह्यातील पीक कापणी प्रयोगांना मी स्वतः , मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सर्व उपविभागीय अधिकारी भेटी देणार आहेत. त्यामुळे सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून निर्धारित वेळेत प्रयोग पूर्ण करावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी दिल्या.

पीक विमा व महिला शेतकरी नोंदणीवर भर द्या- विभागीय कृषी सहसंचालक महेश तीर्थकर

विभागीय कृषी सहसंचालक महेश तीर्थकर यांनी मागील वर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अधिकाधिक पीक विम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी केलेल्या कामाबद्दल जिल्हा प्रशासन व संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. यावर्षी पावसाचे कमी प्रमाण आणि पावसातील खंड यामुळे पीक उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी या तिन्ही यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. प्रत्येक पीक कापणी प्रयोग काटेकोरपणे घेऊन त्यामध्ये कोणताही आक्षेप येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

दि. 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या सेवा संकल्प अभियानांतर्गत महिला शेतकरी नोंदणीला गती द्यावी. पात्र महिला शेतकऱ्यांची जास्तीत जास्त नोंदणी करून घ्यावी. येत्या 2 ऑक्टोबर रोजी पात्र महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार असल्याने याबाबत व्यापक जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. जिल्ह्यात एकूण 1116 ठिकाणी पीक कापणी प्रयोग घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

पीक कापणी प्रयोग करताना संबंधित कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक प्लॉटची प्रत्यक्ष पाहणी करावी. शेतातील वस्तुस्थिती जाणून घेऊन उत्पादनाची अचूक नोंद करावी. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व प्रयोग पूर्ण करून त्यामध्ये कोणताही आक्षेप राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आपापल्या तालुक्यातील पीक परिस्थितीचा आढावा सादर केला.

**






No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   लोकसंवादाच्या माध्यमातून श्री राजस्थानी नवयुवक गणेश मंडळ येथे शासनाच्या विविध योजनांची जनजागृती नांदेड (जिमाका), दि. 24 : शा...