Tuesday, July 28, 2026

वृत्त क्रमांक 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

यांच्या जयंती निमित्त विविध आरोग्य उपक्रमांचे यशस्वी आयोजन 

नांदेड, दि. 28 जुलै : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त, आयुक्त वैद्यकीय शिक्षण व आयुष मुंबई तसेच जिल्हाधिकारी नांदेड यांच्या निर्देशानुसार डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे 22 ते 28 जुलै 2026 या कालावधीत विविध आरोग्यविषयक शिबिरे, तपासणी मोहिमा, छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियान अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिर तसेच इतर जनकल्याणकारी आरोग्य उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या सर्व उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मोठ्या संख्येने नागरिकांनी विविध आरोग्यसेवांचा लाभ घेतला. 

या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या विविध शिबिरांमध्ये रक्तदान शिबिरातून 387 रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. स्तनकर्करोग तपासणी शिबिरामध्ये 330 महिलांची तपासणी, बोन मिनरल डेन्सिटी तसेच हाडांची तपासणी शिबिरामध्ये 332 नागरिकांची तपासणी, नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरामध्ये 888 रुग्णांची तपासणी करण्यात आली. आवश्यक रुग्णांवर शस्त्रक्रिया तसेच पुढील उपचार करण्यात आले. तसेच गर्भाशय मुख कर्करोग तपासणी शिबिरामध्ये 224 महिलांची तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन व उपचार देण्यात आले. 

सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या परिसरातच तज्ज्ञ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियान अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. 22 जुलै रोजी ओम गार्डन कौठा नांदेड येथे आयोजित आरोग्य तपासणी शिबिरामध्ये 516 रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच 26 जुलै रोजी ए. के. संभाजी मंगल कार्यालय वाडी (बु.) नांदेड येथे आयोजित आरोग्य तपासणी शिबिरामध्ये 546 रुग्णांची तपासणी करून विविध तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. 

या विविध आरोग्य उपक्रमांद्वारे कर्करोगासह विविध आजारांचे लवकर निदान, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा, रक्तदानाबाबत जनजागृती तसेच सर्वसामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण, सुलभ व सर्वसमावेशक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा उद्देश प्रभावीपणे साध्य झाला. 

या सर्व उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विजयकुमार कापसे, वैद्यकीय अधीक्षक रुग्णालय, डॉ. अजय वराडे उपवैद्यकीय अधीक्षक रुग्णालय, डॉ. शिवानंद देवसरकर उपवैद्यकीय अधीक्षक, डॉ. अक्षय गव्हाणे वैद्यकीय अधिकारी तसेच विविध चिकित्सालयीन विभागांचे विभागप्रमुख, वैद्यकीय अधिकारी, निवासी डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, कर्मचारी व स्वयंसेवक यांनी समन्वयाने मोलाचे कार्य केले. त्यांच्या योगदानामुळे सर्व शिबिरे व आरोग्य उपक्रम यशस्वीपणे पार पडले. 

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड हे शासनाच्या जनकल्याणकारी आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार, सुलभ व सर्वसमावेशक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने कार्यरत असून भविष्यातही अशा लोकाभिमुख आरोग्य उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

0000




No comments:

Post a Comment

  नवी दिल्ली भारतीय रेल्वेने दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील परभणी-मुदखेड दुहेरी रेल मार्गाच्या आधुनिकीकरणासाठी महत्त्वाचा निर्णय घे...