Tuesday, July 28, 2026

वृत्त क्रमांक 

एसडीआरएफच्या मार्गदर्शनाखाली शेळगाव थडी येथे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

शोध व बचाव कार्याबाबत स्थानिक पथक, विद्यार्थी व नागरिकांना प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन

नांदेड, दि. 28 जुलै :- धर्माबाद तालुक्यातील मौजे शेळगाव थडी येथील हनुमान मंदिर परिसरात जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या वतीने राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), धुळे यांच्या सहकार्याने नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

स्थानिक शोध व बचाव पथकांना आपत्तीच्या प्रसंगी प्रभावीपणे कार्य करता यावे, यासाठी शोध व बचाव कार्याचे प्रशिक्षण, प्रत्यक्ष सराव तसेच शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ आणि नागरिकांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती करणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल कर्डीले यांच्या संकल्पनेतून आणि निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडले.

प्रशिक्षणासाठी एसडीआरएफ, धुळे तुकडी क्रमांक 1 चे रेस्क्यू टीम कमांडर तथा पोलीस निरीक्षक रघुनाथ पवार, उपपोलीस निरीक्षक सुरेश संकपाळ, सुरेश बगाड, राहुल आवचार तसेच 33 प्रशिक्षित बचावकर्ते जवान उपस्थित होते. मान्सून तैनातीसाठी नांदेड येथे मुक्कामी असलेल्या या पथकाने विविध आपत्तीजन्य परिस्थितींमध्ये शोध व बचाव कार्याची प्रात्यक्षिके सादर केली.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे गौरव तिवारी आणि बारकुजी मोरे उपस्थित होते. तसेच उपविभागीय अधिकारी धनंजय राऊत, तहसीलदार, सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. धर्माबाद व कुंडलवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांनीही प्रशिक्षणात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या प्रशिक्षणामुळे स्थानिक स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाबाबतची सज्जता वाढण्यास मदत होणार असून, नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांनी सुरक्षिततेचे उपाय अवलंबून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

000000












No comments:

Post a Comment

  नवी दिल्ली भारतीय रेल्वेने दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील परभणी-मुदखेड दुहेरी रेल मार्गाच्या आधुनिकीकरणासाठी महत्त्वाचा निर्णय घे...