Tuesday, July 28, 2026

वृत्त क्रमांक 

गुरुवारी लोहा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’

लोहा व कंधार तालुक्यातील नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – उपविभागीय अधिकारी

नांदेड, दि. 28 जुलै : महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय व मुख्यमंत्री महोदय यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून लोहा विधानसभा मतदारसंघासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

उपविभागीय अधिकारी कार्यालय, कंधार यांच्यावतीने गुरुवार 30 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता के. के. मंगल कार्यालय, लोहा येथे हे महाशिबिर होणार असून, शिबिराच्या अध्यक्षस्थानी लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर राहणार आहेत.

महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्याबरोबरच शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. शासन निर्णयानुसार राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात अशा स्वरूपाचे समाधान शिबिर आयोजित करण्यात येत आहे.

या महाशिबिरात महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या सेवा, प्रमाणपत्रे, मार्गदर्शन तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

लोहा विधानसभा मतदारसंघातील लोहा व कंधार तालुक्यातील नागरिकांनी गुरुवार, 30 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता के. के. मंगल कार्यालय, लोहा येथे उपस्थित राहून महाशिबिराचा तसेच विविध शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी, कंधार यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ #शेतकरीकर्जमाफी #शेतकरीकल्याण