Tuesday, June 16, 2026

वृत्त क्रमांक

21 जून रोजी पोलीस कवायत मैदानावर भव्य आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन

जिल्हा प्रशासनासह विविध विभागांचा संयुक्त उपक्रम; नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन*

नांदेड, दि. 16 जून : जगभरात 21 जून हा दिवस दरवर्षी ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली, मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश समाजात पोहोचविण्याच्या उद्देशाने यंदाही नांदेड जिल्ह्यात भव्य योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार 21 जून रोजी सकाळी 7 वाजता वजीराबाद येथील पोलीस कवायत मैदान येथे होणार असून जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग, जिल्हा योग संघटना आणि लोकमत समूह यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील नागरिक, विद्यार्थी, युवक, क्रीडापटू, योगप्रेमी, स्वयंसेवी संस्था तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड यांनी केले आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत विविध विभागांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून कार्यक्रमाचे नियोजन, सुविधा आणि समन्वय यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य) अजय शिंदे, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, जिल्हा युवा अधिकारी श्रीमती कनकटे, क्रीडा अधिकारी बालाजी शिरसीकर, लोकमत समूहाच्या प्रतिनिधी सपना भागवत तसेच योग विद्या धामचे योगाचार्य, जिल्हा योग संघटनेचे प्रतिनिधी आणि जिल्ह्यात योगाचा प्रचार-प्रसार करणाऱ्या विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत बोलताना अपर जिल्हाधिकारी डॉ. गायकवाड यांनी सांगितले की, कार्यक्रमाचे आयोजन करताना सर्व संबंधित विभागांनी आपापसात समन्वय साधून सूक्ष्म नियोजन करावे. कार्यक्रमादरम्यान भारत निवडणूक आयोगाच्या लागू असलेल्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

योगाचा संदेश गावपातळीपर्यंत पोहोचविण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष पुढाकार घ्यावा, असे निर्देश देण्यात आले. त्यानुसार माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना योग दिन साजरा करण्यासंदर्भात पत्र पाठवून विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याचे नियोजन करण्याचे ठरविण्यात आले.

तसेच कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या दिव्यांग आणि विशेष गरज असलेल्या नागरिकांसाठी स्वतंत्र व सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला. मैदानावर आसन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सहभागी नागरिक व विद्यार्थ्यांच्या बसण्याची व्यवस्था, प्रवेश आणि इतर अनुषंगिक नियोजनाबाबत क्रीडा विभागाला आवश्यक सूचना देण्यात आल्या.

बैठकीत उपस्थित योगाचार्य आणि योग संघटनांच्या प्रतिनिधींनी योग दिन अधिक प्रभावी व व्यापक करण्यासाठी काही सूचना मांडल्या. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आणि अधिकाधिक नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी लोकमत समूहाकडून जनजागृती आणि समन्वयाच्या माध्यमातून सहकार्य करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

जिल्हास्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या या योग दिन कार्यक्रमातून नागरिकांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण होऊन निरोगी जीवनशैलीचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

०००००


No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना - २०२६’ ची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना2026 #महाराष्...