Tuesday, June 16, 2026

वृत्त क्रमांक

नांदेड जिल्ह्यात भूमी अभिलेख विभागाची तीन नवीन कार्यालये कार्यान्वित; 

जनसामान्यांच्या सेवेसाठी कामकाजाला सुरुवात

नांदेड 16 जून : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत भूमी अभिलेख विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने मंजूर करण्यात आलेल्या 'सुधारित आकृतीबंधा'ची अंमलबजावणी 15 जून 2026 पासून राज्यभरात अधिकृतपणे करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे नांदेड जिल्ह्यात तीन नवीन कार्यालये 15 जूनपासून प्रत्यक्ष कार्यान्वित झाली आहेत. यामुळे जमिनीच्या मोजणी आणि इतर तांत्रिक कामांसाठी नागरिकांना अधीक सोईचे होऊन प्रशासकीय कामात मोठी सुलभता येणार आहे.

प्रशासकीय सुधारणेचा मोठा निर्णय 11 मार्च 2026 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, भूमी अभिलेख विभागातील मंजूर पदांचा सर्वकष आढावा घेण्यात आला होता. त्यानुसार, विभागातील 9 हजार 689 पदांमध्ये वाढ करून 10 हजार 683 पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला. विभागाची व्याप्ती वाढवणे आणि सामान्य नागरिकांना जमिनीच्या मोजणीसह अन्य तांत्रिक व अर्धन्यायिक कामांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी वारंवार येण्यापासून मुक्ती मिळावी, या हेतूने हे नवीन बदल करण्यात आले आहेत.

नांदेड जिल्ह्यातील नागरिकांची वाढती गरज आणि कामाचा व्याप विचारात घेऊन, या सुधारित आकृतीबंधानुसार जिल्ह्यात तीन नवीन कार्यालयांची स्थापना करण्यात आली आहे. या कार्यालयांच्या निर्मितीमुळे आता संबंधित तालुक्यातील किंवा परिसरातील नागरिकांना आपल्या परिसराजवळच भूमी अभिलेख विषयक सेवा उपलब्ध होणार आहेत. यामुळे कामाचा वेग अधीक वाढेल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (म.राज्य) पुणे यांच्या आदेशानुसार, उपसंचालक भुमी अभिलेख नांदेड, प्रदेश नांदेड व जिल्हा अधिक्षक भुमि अभिलेख नांदेड क्र. 2 मुख्यालय भोकर आणि नगर भुमापन अधिकारी नांदेड या तीन नवनिर्मित कार्यालयांचे कामकाजास उपसंचालक भूमि अभिलेख किशोर जाधव छत्रपती संभाजीनगर प्रदेश छत्रपती संभाजीनगर यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख नांदेड श्रीमती सिमा देशमुख, यांचेकडून कार्यान्वित करून सुरवात करण्यात आली आहे. 

१५ जून रोजी सकाळपासून या कार्यालयांमध्ये कामकाजाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. कार्यालय सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, जमिनीच्या मोजणीसह इतर महसुली कामांमध्ये सुलभता येईल व कामे जलद गतीने होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

या कार्यालयांच्या सुरुवातीमुळे महसूल प्रशासनाचे विकेंद्रीकरण होऊन जनतेच्या कामांना अधिक गती मिळेल, असे मत स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही व्यक्त केले आहे. नागरिकांनी आता आपल्या कामांसाठी नवीन कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

00000







No comments:

Post a Comment

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण पूर्...