वृत्त क्रमांक
16 जून ते 31 जुलै 2026 या कालावधीत अतिसार नियंत्रण मोहिमेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी ; ३ लाख ३५ हजार ओआरएस पाकिटे व ९ लाख झिंक गोळ्यांच्या वितरणाचे नियोजन अतिसारावर करा मात, स्वच्छता व ओ.आर.एस. ची घेऊनी साथ!"
नांदेड दि. 16 जून : पावसाळ्याच्या दिवसांत बालकांमध्ये उद्भवणाऱ्या अतिसाराच्या (डायरिया) संभाव्य प्रादुर्भावाला रोखण्यासाठी आणि बालमृत्यू दर शून्य टक्क्यांवर आणण्यासाठी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शिल्लक चिकित्सक डॉ.संजय पेरके व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी यांच्या नियोजनाने आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात १६ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत विशेष स्टॉप डायरिया कॅम्पेन' (अतिसार नियंत्रण मोहीम २०२६) अत्यंत व्यापक पातळीवर सुरू करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्याची एकूण २६,११,१०० (२६ लाख ११ हजार १००) लोकसंख्या या मोहिमेत समाविष्ट करण्यात आली असून, त्यामधील ५ वर्षांखालील सर्व २,६१,११९ बालकांना या मोहिमेचा थेट लाभ दिला जाणार आहे.
जिल्ह्यातील लाभार्थी बालकांची अधिकृत आकडेवारी:
एकूण जिल्हा लोकसंख्या: २६,११,१००
० ते ५ वर्षे वयोगटातील एकूण लाभार्थी बालके: २,६१,११९
० ते १ वर्षे वयोगटातील बालके (झींक सिरपचे लाभार्थी): ४३,८७६
१ ते ५ वर्षे वयोगटातील बालके (झींक गोळ्यांचे लाभार्थी): २,१७,२४३
आरोग्य यंत्रणेचे विस्तृत जाळे आणि साठा नियोजन:
नांदेड जिल्ह्यातील दुर्गम आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने ७० प्राथमिक आरोग्य केंद्रे, ३८४ उपकेंद्रे, ७१२ आरोग्य सेविका, ३,७२३ अंगणवाड्या आणि १,७५० आशा स्वयंसेविका (ASHA Workers) यांचे भव्य जाळे सक्रिय केले आहे. सर्व स्तरांवर ओ.आर.एस. पाकिटे आणि झिंक सिरप/गोळ्यांच्या वितरण करण्यात आला आहे.|
या शिवाय, ० ते १ वर्ष वयोगटातील लहान बालकांसाठी विशेष ४३,८७६ झींक सिरप बॉटल्स वितरीत केल्या जात आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत २,१३,४४० ओआरएस पाकिटे आणि ५,१५,२४६ झींक गोळ्यांचा उपलब्ध आहे.
आशा स्वयंसेविकांद्वारे प्रत्येक घरात प्रात्यक्षिक आणि मोफत वाटप:
मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील १,७५० आशा स्वयंसेविका त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक घराला भेट देणार आहेत. ज्या घरात ५ वर्षांखालील मूल आहे, त्या मातेला ओ.आर.एस. द्रावण योग्य पद्धतीने कसे तयार करावे याचे थेट प्रात्यक्षिक दाखवले जाईल. अतिसार आजार उद्भवल्यास त्वरित उपचारासाठी प्रति बालक २ ओ.आर.एस. पाकिटे आणि सलग १४ दिवस देण्यासाठी १४ झिंकच्या गोळ्या मोफत दिल्या जातील. तसेच जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये ORS-Zinc Corner'ची स्थापना करण्यात आली आहे.
शाळा व अंगणवाड्यांमध्ये 'हात धुणे' उपक्रम:
अतिसाराचा प्रादुर्भाव दूषित हात आणि अस्वच्छतेमुळे मोठ्या प्रमाणावर होतो. हे रोखण्यासाठी जिल्ह्यातील ३,७२३ अंगणवाड्या आणि सर्व प्राथमिक शाळांमध्ये बालकांना जेवणापूर्वी आणि शौचानंतर साबणाने स्वच्छ हात धुण्याचे (Handwashing Steps) प्रत्यक्ष धडे दिले जात आहेत. गावागावांमध्ये ग्राम आरोग्य, पोषण व स्वच्छता समिती (VHSND) च्या बैठक घेऊन जनजागृती केली जात आहे.
पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचे संदेश व धोक्याची लक्षणे
बालकाला दिवसातून ३ किंवा त्यापेक्षा जास्त वेळा पातळ संडास झाल्यास शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन 'जलशुष्कतेचा' (Dehydration) धोका निर्माण होतो. अशा वेळी त्वरित ओ.आर.एस. आणि झिंक सुरू करावे. खालीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास बालकाला विलंब न करता जवळच्या शासकीय रुग्णालयात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करावे:
बालक अत्यंत सुस्त होणे, चिडचिड करणे किंवा बेशुद्ध पडणे.
डोळे खोल जाणे किंवा बालकाने अन्न-पाणी, स्तनपान घेणे पूर्णपणे बंद करणे.
शौचातून (संडासमधून) रक्त पडणे.
तीव्र ताप असणे आणि ओआरएस दिल्यानंतरही उलट्या होणे.
नांदेड जिल्ह्यातील सर्व पालकांनी, विशेषतः मातांनी आपल्या ५ वर्षांखालील बालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे आणि आरोग्य यंत्रणेला सहकार्य करून या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय पेरके व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी यांनी केले आहे.
0000000
No comments:
Post a Comment