वृत्त क्रमांक 125
नांदेडमध्ये तृतीयपंथी समुदायासाठी
दोन दिवसीय व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
नांदेड दि. 29 जानेवारी :- CYDA संस्था आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंथी बांधव आणि भगिनींसाठी दोन दिवसीय व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचा उद्देश तृतीयपंथी समुदायाला स्वावलंबी बनवणे, उद्योजकतेसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे आणि आर्थिक साक्षरता प्रदान करणे हा होता.
या प्रशिक्षणात सुमारे 37 तृतीयपंथी बांधव आणि भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि विविध व्यवसाय कौशल्ये आत्मसात केली. कार्यशाळेत व्यवसायाची योग्य कल्पना कशी निवडावी, व्यवसायाची वाढ कशी साधावी, बचतीचे महत्त्व, वित्तीय साक्षरता, डिजिटल साक्षरता तसेच व्यवसायासाठी शासकीय योजनांचा कसा लाभ घ्यावा याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
सहभागी तृतीयपंथीयांनी या प्रशिक्षणाचा उत्कृष्ट प्रतिसाद दिला. त्यांनी व्यवसाय प्रशिक्षणाचे फॉर्म भरून आपल्या व्यवसायाचे नियोजन केले आणि भविष्यात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला. या उपक्रमामुळे तृतीयपंथी समुदायातील अनेक जणांना आर्थिक स्थैर्य आणि स्वावलंबनाच्या दिशेने प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाच्या शेवटी सामाजिक कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या हस्ते सहभागींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे तृतीयपंथी समुदायाला नवी संधी आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने मजबूत पाऊल उचलण्याची संधी प्राप्त झाली.
सामाजिक समावेश आणि आर्थिक स्वावलंबनाच्या दृष्टीने अशा उपक्रमांचे मोठे महत्त्व असून, भविष्यातही तृतीयपंथी समुदायाच्या सशक्तीकरणासाठी असे उपक्रम राबवले जावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
0000
No comments:
Post a Comment