वृत्त क्रमांक
विष्णुपुरीचा पाणीसाठा पिण्यासाठी राखणे आवश्यक; सिंचनासाठी आवर्तन देणे शक्य नाही!
पंप व जलवाहिन्यांची दुरवस्था, उपलब्ध पाण्यात ६.२९ दलघमीची तूट; पाणी जपून वापरण्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन
नांदेड, दि. १६ : डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पातील उपलब्ध मर्यादित पाणीसाठा, आगामी काळातील पिण्याच्या पाण्याची गरज आणि उपसा यंत्रणेची दुरवस्था लक्षात घेता रब्बी हंगामासाठी सिंचनाचे आवर्तन देणे शक्य होणार नाही. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करून नांदेड शहरासह ग्रामीण व औद्योगिक पाणीपुरवठ्याला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केले.
विष्णुपुरी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामासाठी किमान एक आवर्तन देण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा, भविष्यातील पाण्याची आवश्यकता तसेच उपसा यंत्रणेची तांत्रिक स्थिती यांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता आय. एम. चिश्ती, पाटबंधारे विभाग उत्तरचे कार्यकारी अभियंता सी. आर. बनसोड आणि उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण उपस्थित होते.
सध्या विष्णुपुरी धरणात ५७.१४ टक्के म्हणजेच ४६.१६ दलघमी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. अंतेश्वर बंधाऱ्यातील ७.८८ दलघमी साठ्यासह एकूण उपलब्ध पाणी ५४.०४ दलघमी आहे. यामधून ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत अपेक्षित १८ दलघमी बाष्पीभवनाचा विचार करता प्रत्यक्षात ३६.०४ दलघमी पाणी उपलब्ध राहणार आहे. मात्र, याच कालावधीपर्यंत नांदेड शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी ३८.९० दलघमी, औद्योगिक वापरासाठी १.७३ दलघमी आणि ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी १.७० दलघमी, असे एकूण ४२.३३ दलघमी पाणी आवश्यक आहे. त्यामुळे उपलब्ध साठ्याच्या तुलनेत ६.२९ दलघमी पाण्याची तूट निर्माण होत आहे.
प्रकल्पाच्या उपसा यंत्रणेची पाहणी केली असता १४ पंप नादुरुस्त असल्याचे, तर केवळ चार पंप कार्यरत असून त्यांची कार्यक्षमता ५० टक्क्यांपेक्षाही कमी झाल्याचे निदर्शनास आले. तसेच रायझिंग मेनच्या तिन्ही जलवाहिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गळती व फुटी झाल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या यंत्रणेद्वारे सिंचनासाठी पाणी सोडल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होऊन अपेक्षित लाभक्षेत्रापर्यंत पुरेसे पाणी पोहोचणार नाही. दरम्यान, प्रकल्पावर नवीन पाईपलाईन व पंप बसविण्याचे काम सुरू असून ते मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
या सर्व बाबींचा विचार करता ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत नांदेड शहर, ग्रामीण भाग आणि उद्योगांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी उपलब्ध साठा राखणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे सद्यस्थितीत विष्णुपुरी प्रकल्पाच्या लाभक्षेत्राला सिंचनासाठी आवर्तन देणे शक्य होणार नाही. नागरिकांनी आणि शेतकरी बांधवांनी उपलब्ध पाण्याची मर्यादा लक्षात घेऊन पाण्याचा काटकसरीने वापर करावा व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
*******





No comments:
Post a Comment