वृत्त क्रमांक
दिवाळी अंकांच्या साहित्यिक मेजवानीतून वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन!
• नांदेड जिल्हा ग्रंथालयात दीडशेहून अधिक दिवाळी अंकांचे प्रदर्शन
• जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर चिंचाणे यांच्या हस्ते उद्घाटन
नांदेड, दि.17 : दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा जपत वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व डिजिटल उपकेंद्र, नांदेड यांच्या वतीने आयोजित दीडशेहून अधिक दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर चिंचाणे यांच्या हस्ते करण्यात आले. बहुउद्देशीय सांस्कृतिक संकुल, स्टेडियम परिसरातील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाशेजारील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
या प्रदर्शनात दिवाळीनिमित्त प्रकाशित झालेले नामवंत नियतकालिकांचे विशेषांक तसेच कला, संस्कृती, साहित्य, बालसाहित्य, कथा, कविता, वैचारिक लेख, विज्ञान आणि महिला विषयक विविध दिवाळी अंक वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मराठी साहित्यात दिवाळी अंकांची अनेक दशकांची समृद्ध परंपरा असून, महाराष्ट्राच्या वैचारिक, सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीत या अंकांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. नवोदित लेखकांना आपले विचार आणि लेखन मांडण्यासाठी दिवाळी अंक महत्त्वाचे व्यासपीठ ठरत असल्याचे सुधाकर चिंचाणे यांनी यावेळी नमूद केले. नांदेड जिल्ह्यातील वाचक, अभ्यासक आणि साहित्यिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन साहित्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी यांनी केले. हे प्रदर्शन पुढील पंधरा दिवस सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थी, शिक्षक, साहित्यप्रेमी आणि अभ्यासकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन साहित्यिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा, तसेच अधिकाधिक नागरिकांनी सार्वजनिक ग्रंथालयाचे सभासद व्हावे, असे आवाहन अनिल सूर्यवंशी यांनी केले.
यावेळी सहाय्यक नियोजन अधिकारी निखिल बासटवार, अजय वट्टमवार, श्रीनिवास इज्जपवार, रघुवीर श्रीरामवार, राजीव पाटील, शंकर शिंदे, गोविंद वाघमारे, दिगंबर शिंदे, रोहित सूर्यवंशी यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
***


.jpeg)
No comments:
Post a Comment