Tuesday, October 6, 2026

वृत्त क्रमांक

निकृष्ट चाऱ्याला युरिया प्रक्रियेतून मिळणार सकसतेची जोड

• चारा साक्षरता अभियानांतर्गत देगलूर येथे पशुपालकांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिक

• चारा टंचाईवर शास्त्रीय व्यवस्थापनाचा संदेश

नांदेड(जिमाका), दि. 06: सेवा संकल्प अभियानांतर्गत आज दि. 6 ऑक्टोबर 2026 रोजी देगलूर उपविभागीय कार्यालयात चारा साक्षरता अभियान राबविण्यात आले. दुष्काळसदृश परिस्थिती आणि संभाव्य चारा टंचाई लक्षात घेता उपलब्ध चाऱ्याचा शास्त्रीय व कार्यक्षम वापर करून पशुधनाला सकस व पौष्टिक चारा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या संकल्पनेतून तसेच जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्यासाठी सोयाबीन गुळीवर युरिया प्रक्रिया करून सकस चारा तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक उपस्थित शेतकरी व पशुपालकांना करून दाखविण्यात आले.

यावेळी युरिया प्रक्रियेद्वारे निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता, पाचकता आणि रुचकरता वाढविण्याची शास्त्रीय पद्धत सविस्तर समजावून सांगण्यात आली. तसेच उपलब्ध चाऱ्याचे योग्य संवर्धन, साठवणूक आणि शास्त्रीय व्यवस्थापन करून चारा टंचाईच्या काळात त्याचा पशुधनासाठी प्रभावी वापर कसा करता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रसंगी उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, तहसीलदार सूर्यवंशी, नायब तहसीलदार सरकलवाड तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. 

हे प्रात्यक्षिक देगलूरचे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. आर. व्ही. सुरेवाड व तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. एल. पाशमवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. एस. आर. यंकम यांनी उपस्थित नागरिक, शेतकरी व पशुपालकांना प्रत्यक्ष करून दाखविले.

उपलब्ध चाऱ्याचे शास्त्रीय व्यवस्थापन-चारा टंचाईवर प्रभावी समाधान हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. उपलब्ध चाऱ्याचा योग्य वापर, त्याचे शास्त्रीय संवर्धन व व्यवस्थापन केल्यास चारा टंचाईच्या काळात पशुधनासाठी पुरेसा व सकस चारा उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे.

****








No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक प्रगती महिला बचत गटातील 130 महिलांना शास्त्रीय पशुपालन व चारा व्यवस्थापनाचे प्रशिक्षण • किनवट येथे दोन दिवसीय प्रशिक्षण • ...