वृत्त क्रमांक
मतदारांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा देण्याचे आवाहन
• खासगी आस्थापना, उद्योग व संस्थांनी मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत द्यावी
नांदेड (जिमाका), दि. 06 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार, दि. 23 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदान होणार आहे. मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी संबंधित खासगी आस्थापना, उद्योग, संस्था व कार्यालयांनी आवश्यक वेळ उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 मधील कलम 135ब नुसार निवडणुकीच्या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्याची तरतूद आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या दि. 23 जून 2011 रोजीच्या शासन निर्णयानुसार पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतदारांसाठी विशेष नैमित्तिक रजा जाहीर करण्यात आली आहे.
मात्र, खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या मतदारांना ही विशेष नैमित्तिक रजा लागू नसल्याने, अशा आस्थापनांमध्ये कार्यरत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदानाच्या दिवशी किमान दोन तासांची विशेष सवलत देण्यात यावी, अशा सूचना संबंधित तहसीलदारांनी खासगी आस्थापनांना देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
मतदारांना मतदानासाठी आवश्यक वेळ उपलब्ध करून देणे, ही बाब लक्षात घेऊन खासगी आस्थापना, उद्योग, संस्था व कार्यालयांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मतदानाची संधी उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित आस्थापना व संस्थांनी याची नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांनी कळविले आहे.
**
No comments:
Post a Comment