वृत्त क्रमांक
आजपासून एफएफएफएस अॅपद्वारे घरबसल्या खत खरेदीची सुविधा
• मोबाईलवर मिळणार खताच्या उपलब्धतेची माहिती
• जादा दराने विक्री व लिंकिंगला आळा
नांदेड (जिमाका), दि. 21 : केंद्र शासनाच्या फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल (एफएफएफएस) या डिजिटल प्रणालीची महाराष्ट्रात उद्या, दि. 22 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी होत असून, या सुविधेमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या खतांची उपलब्धता पाहून खरेदी करता येणार आहे. त्यामुळे खत खरेदीसाठी दुकानाबाहेर रांगा लावण्याची गरज राहणार नसल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे यांनी दिली.
शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअरवरून एफएफएफएस अॅप डाउनलोड केल्यानंतर त्यांच्या परिसरातील कोणत्या खत विक्रेत्याकडे कोणते खत उपलब्ध आहे, तसेच संबंधित खताचा उपलब्ध साठा किती आहे, याची माहिती मोबाईलवर पाहता येणार आहे. त्यामुळे गरजेनुसार उपलब्ध खताची माहिती घेऊन शेतकऱ्यांना खरेदीचे नियोजन करता येईल.
अॅपच्या माध्यमातून खताची मागणी नोंदविल्यानंतर संबंधित विक्रेत्याला ते खत उपलब्ध करून देणे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खत मिळविण्यासाठी अनावश्यक प्रतीक्षा किंवा दुकानांमध्ये वारंवार चकरा मारण्याची आवश्यकता राहणार नाही.
एफएफएफएस प्रणालीमुळे खत विक्रीची प्रक्रिया डिजिटल पद्धतीने होणार आहे. त्यामुळे खत विक्रेत्यांकडून खत विक्रीमध्ये टाळाटाळ करणे, छापील किमतीपेक्षा जादा दर आकारणे किंवा अनुदानित खतासोबत इतर कृषी निविष्ठा खरेदी करण्याची सक्ती करणे यास प्रतिबंध होणार आहे. परिणामी खत विक्रीतील लिंकिंगच्या प्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे.
एफएफएफएस प्रणालीची सुरुवातीला कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत पथदर्शी स्वरूपात अंमलबजावणी करण्यात आली होती. या प्रणालीचा विस्तार आता 22 ऑक्टोबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येणार आहे.
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खत खरेदीसंदर्भात काही अडचण किंवा तक्रार असल्यास त्यांनी संबंधित पंचायत समितीतील कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे यांनी केले आहे.
***
No comments:
Post a Comment