वृत्त क्रमांक
शेतकऱ्यांना विनाविलंब पीक कर्ज द्या-जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे बँकांना निर्देश
• नांदेडमधील बँकांना अचानक भेट; पीक कर्ज प्रकरणांचा घेतला आढावा, शेतकऱ्यांशी साधला संवाद
• ऑनलाईन सातबाऱ्याच्या आधारे कर्ज प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करा
• शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बँकांनी तत्परतेने कार्यवाही करावी
नांदेड (जिमाका), दि. 21 : शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये, तसेच पात्र शेतकऱ्यांना विनाविलंब कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज नांदेड शहरातील बँकांच्या अचानक भेटीदरम्यान दिले. नवा मोंढा येथील भारतीय स्टेट बँक, वजीराबाद येथील महाराष्ट्र ग्रामीण, तारासिंग मार्केट येथील पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँकेला भेट देऊन त्यांनी पीक कर्ज वितरणासह अन्य कर्ज प्रकरणांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी बँकेत उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून त्रास देऊ नये. उपलब्ध सुविधांचा वापर करून ऑनलाईन सातबारा उतारा प्राप्त करावा आणि पात्र शेतकऱ्यांना विनाविलंब पीक कर्ज मंजूर करून द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बँक अधिकाऱ्यांना दिले. कर्ज मंजुरीची प्रक्रिया सुलभ करून शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध होईल, यासाठी बँकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांमधील प्रलंबित कर्ज प्रकरणे, शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेले अर्ज, आवश्यक कागदपत्रांबाबत निर्माण होणाऱ्या अडचणी आणि त्यावर काढता येणारे पर्याय यांची सविस्तर माहिती घेतली. सामाईक क्षेत्रातील शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देताना येणाऱ्या अडचणींबाबतही त्यांनी बँक अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अशा प्रकरणांमध्ये नियमानुसार योग्य पर्याय शोधून कर्ज वितरणाची कार्यवाही सुलभ करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
पीक कर्ज हे शेतकऱ्यांच्या शेतीविषयक गरजांसाठी महत्त्वाचे असल्याने कर्ज वितरण प्रक्रियेत अनावश्यक विलंब होणार नाही, याची बँकांनी खात्री करावी. शेतकऱ्यांच्या अर्जांवर वेळेत कार्यवाही करून पात्र लाभार्थ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. या भेटीच्या माध्यमातून त्यांनी पीक कर्ज वितरणाची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेत बँक अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या.
यावेळी जिल्हाधिकारी यांच्यासोबत जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक बी. जी. सोनकांबळे, तहसीलदार संजय वारकड, जिल्हा पशुसंवर्धनचे उपायुक्त डॉ. प्रविणकुमार घुले यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
***

.jpeg)

No comments:
Post a Comment