वृत्त क्रमांक
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या 51 व्या ग्रंथभेट योजनेतील ग्रंथांची यादी अवलोकनासाठी उपलब्ध
• यादीबाबत सूचना, हरकती व आक्षेप 31 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका), दि. 21 : ग्रंथालय संचालनालयाच्या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान योजनेअंतर्गत 51 व्या ग्रंथभेट योजनेसाठी निवड करण्यात आलेल्या 1 हजार 183 ग्रंथांची यादी ग्रंथालय संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 16 ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता आणि राज्य शासन यांच्या संयुक्त निधीतून राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत सन 2024 मध्ये प्रकाशित झालेल्या व ग्रंथालय संचालनालयास प्राप्त झालेल्या ग्रंथांपैकी राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या उपसमिती सदस्यांनी या ग्रंथांची निवड केली आहे. यामध्ये मराठी भाषेतील 685, हिंदी भाषेतील 246 आणि इंग्रजी भाषेतील 252 ग्रंथांचा समावेश आहे. या यादीतील ग्रंथांचे वितरण संचालनालयाने निश्चित केलेल्या 25 टक्के सवलतीच्या दराने करणे बंधनकारक आहे.
ग्रंथांच्या तपशिलातील त्रुटी निदर्शनास आणून द्याव्यात
या यादीतील कोणत्याही ग्रंथाच्या नावाबाबत, लेखक, प्रकाशक किंवा किमतीबाबत काही त्रुटी अथवा बदल निदर्शनास आल्यास संबंधितांनी त्याबाबतच्या सूचना, हरकती किंवा आक्षेप 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत लेखी स्वरूपात सादर करावेत. हे निवेदन ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई-400001 या पत्त्यावर कार्यालयीन वेळेत हस्तपोच किंवा टपालाद्वारे पाठवावे. तसेच, संचालनालयाने नमूद केलेल्या director.dol@maharashtra.gov.in या ई-मेल पत्त्यावरही सूचना पाठविता येतील. विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या सूचना, हरकती किंवा आक्षेपांचा विचार केला जाणार नाही.
ग्रंथांच्या यादीतील नाव, लेखक, प्रकाशक आणि किंमत यासंबंधी काही बदल किंवा त्रुटी आढळल्यास त्या संचालनालयाच्या निदर्शनास आणून द्याव्यात, असे आवाहन प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक मा. गाडेकर यांनी केले आहे.
**
No comments:
Post a Comment