वृत्त क्रमांक
अंगणवाडी केंद्रे बालकांच्या सर्वांगीण विकासाचे माहेरघर बनावीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड (जिमाका), दि. ११ : शहरातील अंगणवाडी केंद्रे केवळ पोषण आहार वाटपाचे ठिकाण न राहता बालकांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासाचे केंद्र बनावीत. यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
जिल्हा बाल विकास प्रकल्प कार्यालयातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित नांदेड शहरातील शाळांच्या मुख्याध्यापकांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी बाल विकास प्रकल्प अधिकारी कैलास तिडके, महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी प्रवीण मांदळे, जिल्हा समुपदेशक तथा शिक्षण विस्तार अधिकारी बालासाहेब कच्छवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री.कर्डिले म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्यातील अंगणवाडी केंद्रे प्राथमिक शाळांना जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून अंगणवाडीतील बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाशी जोडता येईल. बालकांचा बौद्धिक, शैक्षणिक आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांनी सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे.
बाल विकास प्रकल्प अधिकारी कैलास तिडके यांनी अंगणवाडी केंद्रांच्या अडचणी दूर करून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले. शिक्षणाधिकारी प्रवीण मांदळे यांनी अंगणवाडी केंद्रे प्राथमिक शाळांशी जोडल्यामुळे त्यांच्या जागेसह विविध सुविधा व शैक्षणिक बाबींचे प्रश्न सुटण्यास मदत होऊन बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे सुलभ होईल, असे सांगितले.
शिक्षण विस्तार अधिकारी बालासाहेब कच्छवे म्हणाले की, बालकांच्या आयुष्यातील पहिली आठ वर्षे मेंदूच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. अंगणवाडीतील बालकांमध्ये मोठी गुणवत्ता असून, त्यांच्या क्षमतेला योग्य वेळी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.
बैठकीच्या प्रारंभी बाल विकास प्रकल्प अधिकारी कैलास तिडके यांनी प्रास्ताविक केले. बैठकीस नांदेड शहरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***
No comments:
Post a Comment