Monday, August 10, 2026

वृत्त क्रमांक

रुग्ण नोंदणीसाठी आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात ‘स्कॅन अँड शेअर’ डिजिटल सुविधा सुरू

नांदेड, दि. १० ऑगस्ट : भारत सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) अंतर्गत नागरिकांना जलद व सुलभ ओपीडी नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी, नांदेड येथे ‘स्कॅन अँड शेअर (Scan & Share)’ ही आधुनिक डिजिटल सुविधा सुरू करण्यात आली आहे.

या सुविधेमुळे रुग्णांना ओपीडी नोंदणीसाठी दीर्घकाळ रांगेत उभे राहण्याची आवश्यकता कमी होणार आहे. रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आलेला ABHA (आभा) QR कोड स्कॅन करून काही मिनिटांत ओपीडी नोंदणी प्रक्रिया सुरू करता येणार आहे. त्यामुळे रुग्णांचा वेळ वाचण्यासोबतच नोंदणी प्रक्रिया अधिक जलद व सुलभ होणार आहे.

अशी करा ‘स्कॅन अँड शेअर’ सुविधा वापर

क्युआर कोड स्कॅन करा : रुग्णालयात प्रदर्शित करण्यात आलेला ‘Scan & Share’ QR कोड मोबाईलच्या कॅमेऱ्याद्वारे किंवा कोणत्याही ABDM-सक्षम मोबाईल अॅपद्वारे स्कॅन करावा.

ABDM अॅपमध्ये लॉगिन करा : मोबाईलमध्ये ABHA अॅप, आरोग्य सेतू अॅप किंवा इतर ABDM समर्थित अॅप उघडून लॉगिन करावे.

आभा प्रोफाइल शेअर करा : QR कोड स्कॅन केल्यानंतर आपल्या ABHA प्रोफाइलमधील आवश्यक माहिती रुग्णालयास शेअर करावी. त्यानंतर ओपीडी नोंदणीसाठी टोकन क्रमांक प्राप्त होईल.

टोकननुसार नोंदणी करा : प्राप्त झालेल्या टोकन क्रमांकानुसार संबंधित ओपीडी नोंदणी काऊंटरवर जाऊन आवश्यक शुल्क भरावे व ओपीडी पेपर घेऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आधार व आभा कार्ड सोबत आणण्याचे आवाहन

रुग्णांनी उपचारासाठी रुग्णालयात येताना आधार कार्ड आणि आभाकार्ड/क्रमांक सोबत आणावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.

आभाशी आरोग्य नोंदी जोडल्यास रुग्णांचा वैद्यकीय इतिहास, तपासण्या, औषधोपचार, निदान अहवाल आणि इतर आरोग्यविषयक माहिती सुरक्षित डिजिटल स्वरूपात जतन करता येते. त्यामुळे भविष्यातील उपचार अधिक अचूक, जलद आणि परिणामकारक होण्यास मदत होते.

आयुष्मान भारत डिजिटल मिशनअंतर्गत उपलब्ध विविध डिजिटल आरोग्य सेवांचा लाभ घेण्यासाठी तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ सुलभपणे मिळविण्यासाठी आधार कार्ड व ABHA नोंदणी उपयुक्त ठरणार आहे.

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी येथे उपचारासाठी येणाऱ्या सर्व नागरिकांनी आधार कार्ड व ABHA कार्ड/क्रमांक सोबत आणून ‘स्कॅन अँड शेअर’ सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’च्या लाभ वितरणास प्रारंभ! ६.२२ लाख पात्र शेतकरी ; ₹५,०२८ कोटींचा कर्जमुक्ती लाभ ...