Thursday, August 13, 2026

वृत्त क्रमांक

महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समिती दौऱ्याच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

नांदेड दि. 13 ऑगस्ट :- महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीचा नांदेड जिल्हा दौरा येत्या 19 ते 21 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना, विकासकामे, कल्याणकारी उपक्रम तसेच विभागनिहाय प्रलंबित बाबींचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात घेण्यात आला. 

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, किनवटचे सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी बी. सरवनन, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यासह विविध संबंधित विभागांचे अधिकारी, कक्षप्रमुख, आमदार महोदयांचे संपर्क प्रमुख आदींची उपस्थिती होती.

अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या जिल्हा दौऱ्यादरम्यान समितीसमोर सादर करण्यात येणारी विभागनिहाय माहिती, प्रगती अहवाल, योजनांची सद्यस्थिती, मंजूर व प्रलंबित कामे, निधीची उपलब्धता व खर्च, लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या विविध योजनांच्या लाभाची माहिती तसेच अनुसूचित जमाती बांधवांच्या विविध प्रश्नांबाबत आवश्यक माहिती अद्ययावत  ठेवण्याच्या दृष्टीने बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीमध्ये जिल्ह्यातील आदिवासी भागातील शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते व दळणवळण, महिला व बालविकास, सामाजिक न्याय, कृषी, पशुसंवर्धन, ग्रामविकास, रोजगार, कौशल्य विकास, आदिवासी विकास विभागाच्या विविध योजना तसेच पायाभूत सुविधांशी संबंधित विषयांचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला. 

आदिवासीबहुल व दुर्गम भागातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा प्रभावीपणे लाभ मिळत आहे किंवा नाही, पात्र लाभार्थी योजनांपासून वंचित राहणार नाहीत यासाठी करण्यात येणारी कार्यवाही, योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.

 तसेच अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या दौऱ्यादरम्यान समिती सदस्यांकडून विविध विभागांना भेटी देऊन प्रत्यक्ष वस्‍तीगृहे , इतर बाबींची पाहणी करतात त्‍या दृष्‍टीने प्रत्‍येक  विभागांनी आवश्यक कागदपत्रे, अहवाल, सांख्यिकीय माहिती, योजनानिहाय प्रगती, छायाचित्रे तसेच इतर आवश्यक अभिलेख अद्ययावत ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आले.

विभागनिहाय माहिती अचूक व वस्तुनिष्ठ स्वरूपात सादर करण्याच्या सूचना

जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांनी त्यांच्या विभागाशी संबंधित अनुसूचित जमाती कल्याणाच्या योजनांची अद्ययावत व अचूक माहिती तयार ठेवावी. योजनांची मंजुरी, निधी प्राप्ती, निधीचा विनियोग, भौतिक व आर्थिक प्रगती, लाभार्थी संख्या, प्रलंबित प्रकरणे तसेच पूर्ण झालेल्या कामांची माहिती स्पष्टपणे उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या. विशेषतः आदिवासीबहुल क्षेत्रातील विकासकामे, मूलभूत सुविधा आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणी दरम्यान येणाऱ्या अडचणींचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. नागरिकांच्या तक्रारी व मागण्यांवर संवेदनशीलतेने कार्यवाही करून प्रलंबित बाबी वेळेत निकाली काढण्यावर भर देण्यात आला.

किनवट व आदिवासीबहुल भागातील योजनांवर विशेष लक्ष

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा तसेच आदिवासीबहुल क्षेत्रातील विकासकामांचा बैठकीत विशेष आढावा घेण्यात आला. आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण, शैक्षणिक सुविधा, आश्रमशाळा व वसतिगृहे, आरोग्य सुविधा, रोजगाराच्या संधी, स्वयंरोजगार, कृषीविषयक योजना आणि मूलभूत पायाभूत सुविधांबाबतची माहिती अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विभागांमध्ये समन्वय ठेवण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

आदिवासी आश्रमशाळा, अनुदानित शाळा, शाळेतील विद्यार्थ्‍यासाठी मिळणा-या  सोई-सुविधा, तपासणी करण्‍याबाब तसेच सबंधीत योजना अमंलबजावणी योग्‍यरित्‍या होते की नाही, आदिवासी शासकीय कर्मचारी यांचे जात प्रमाणपत्रे पडताळणी झाली किंवा कसे, आदिवासी जमीनीचे अग्रीस्‍टॅक, त्‍यांचे केवायसी आस्‍थापना विषयक बाबींची सविस्‍तर माहिती ठेवण्याबाबत सुचना दिल्या.

आपल्‍या कार्यालयातील अनुसूचित जमातीच्‍या प्रवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांच्‍या भरती, बढती, आरक्षण, आनुशेष व जात पडताळणी बाबी संदर्भात तसेच शासकीय यंत्रणांनी आदिवासी उपयोजना व बाहयक्षेत्रात आदिवासीच्‍या कल्‍याणासाठी राबविण्‍यात येणाऱ्या कल्‍याणकारी योजनाची अंमलबाजावणी योग्‍यरित्‍या होते का कसे या बाबतच्‍या सुचना दिल्‍या.

समिती दौऱ्याच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांना जबाबदारी निश्चित

अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या दौऱ्यादरम्यान विविध विभागांकडून सादर करण्यात येणाऱ्या माहितीमध्ये अचूकता, सुसूत्रता व एकसंधता राहावी, यासाठी नियुक्त कक्षप्रमुखांनी संबंधित विभागांशी सातत्याने समन्वय साधावा, अशा सूचना देण्यात आल्या. प्रत्येक विभागाने आपल्या विभागाशी संबंधित विषयांची तयारी पूर्ण करून आवश्यक कागदपत्रे व माहिती विहित स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. आमदार महोदयांचे संपर्कप्रमुख यांच्याशीही प्रत्‍येक आमदार महोदयांशी प्रत्‍यक्ष संपर्क करून ते कोणत्‍या तारखेस येणार कसे येणार त्‍याबाबतची आवश्यक समन्वय साधून  माहिती घेण्‍याबाबत सुचना दिलेल्‍या आहेत. बैठकीची प्रस्‍तावना व आभार निवासी उपजिल्‍हाधिकारी किरण अंबेकर यांनी केले.   

0000000





No comments:

Post a Comment

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ पूर्वीची कर्जमुक्ती मर्यादा ₹५०,०००/- आता मिळणार ₹ २ लाखांपर्यंत कर्जमुक्ती #कर...