Thursday, August 6, 2026

वृत्त क्रमांक 

कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन; 

इंडिया स्किल्स कॉम्पिटिशन 2026-27 साठी नोंदणी सुरू

नांदेड, दि. 6 : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई यांच्या निर्देशानुसार India Skills Competition 2026-27 या देशातील प्रतिष्ठित राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड यांनी केले आहे. स्पर्धेसाठी इच्छुक उमेदवारांनी https://www.skillindiadigital.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी.

India Skills Competition ही राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद (NSDC) यांच्या माध्यमातून दर दोन वर्षांनी आयोजित केली जाणारी राष्ट्रीय स्तरावरील कौशल्य स्पर्धा आहे. व्यावसायिक शिक्षण व कौशल्य क्षेत्रातील गुणवंत युवक-युवतींना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य सादर करण्यासाठी ही स्पर्धा व्यासपीठ उपलब्ध करून देते. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांची पुढील राज्यस्तरीय व राष्ट्रीय फेरीसाठी निवड केली जाते. राष्ट्रीय स्तरावर यशस्वी ठरलेल्या स्पर्धकांना भारताचे प्रतिनिधित्व करत WorldSkills Competition मध्ये सहभागी होण्याची संधी मिळते.

यावर्षी विविध कौशल्य क्षेत्रांमध्ये वैयक्तिक (Individual) तसेच सांघिक (Team) स्वरूपातील स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. विविध कौशल्य क्षेत्रांसाठी स्वतंत्र पात्रता निकष व वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. बहुतांश कौशल्यांसाठी उमेदवारांचा जन्म 9 जानेवारी 2003 किंवा त्यानंतरचा असावा. तर Cyber Security, Industry 4.0, Mechatronics, Robot Systems Integration तसेच Autonomous Mobile Robotics, Concrete Construction Work आणि Landscape Gardening या टीम स्किल्ससाठी उमेदवारांचा जन्म 9 जानेवारी 2004 किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे.

स्पर्धेची निवड प्रक्रिया जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर राबविण्यात येणार असून विविध उद्योग, Sector Skill Councils, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या सहकार्याने स्पर्धेचे आयोजन केले जाईल.

जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी महाविद्यालये, विद्यापीठे, शाळा, प्रशिक्षण संस्था, उद्योग तसेच कौशल्य विकासाशी संबंधित संस्थांनी पात्र उमेदवारांमध्ये या स्पर्धेबाबत जनजागृती करून त्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी Skill India Digital (SIDH) पोर्टलवर ऑनलाइ्न नोंदणी करावी. तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड येथे संपर्क साधावा. सहाय्यक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी पात्र युवक-युवतींनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य सिद्ध करावे, असे आवाहन केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.100                                                                                                                       दि.06-...