वृत्त क्रमांक
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी नोडल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न
नांदेड, दि. 22 मे : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक 2026 अनुषंगाने नियुक्त नोडल अधिकारी व त्यांच्या सहाय्यकांचे प्रशिक्षण आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पार पडले.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व नोडल अधिकाऱ्यांना निवडणुकीसंदर्भातील सोपविलेल्या जबाबदाऱ्या व कर्तव्ये अधिक काटेकोरपणे पार पाडण्याच्या सूचना दिल्या.
प्रशिक्षणावेळी अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजकुमार माने, उपजिल्हाधिकारी (रोहयो) हनमंत कोळेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्यासह सर्व नोडल अधिकारी व त्यांचे सहाय्यक उपस्थित होते.
निवडणूक कामकाज अधिक सुलभ व प्रभावीपणे पार पाडण्यासाठी विविध कक्षांची स्थापना करण्यात आली असून त्यासाठी नोडल अधिकारी व सहाय्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये प्रशिक्षण व्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्था, नामनिर्देशन, आचारसंहिता, माहिती व्यवस्थापन, मतदान कर्मचारी व्यवस्थापन, मतदार यादी व मतदान केंद्र व्यवस्थापन, मतपत्रिका छपाई व वाटप, स्ट्राँग रूम व मतमोजणी व्यवस्थापन, उमेदवार व राजकीय पक्ष निवडणूक खर्च तपासणी व नियंत्रण, जिल्हास्तरीय कक्ष, निवडणूक निरीक्षक कक्ष, वाहन अधिग्रहण व वाहतूक व्यवस्थापन, मतपेटी व मतदान साहित्य वाटप तसेच संगणकीकरण व्यवस्थापन आदी कक्षांचा समावेश आहे.सर्व नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणुकीशी संबंधित जबाबदाऱ्या व कर्तव्ये सक्षमपणे पार पाडावीत, असे निर्देश यावेळी देण्यात आले.
निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी राजकुमार माने यांनी विविध कक्ष तसेच नोडल अधिकाऱ्यांच्या कामकाज व जबाबदाऱ्यांबाबत माहिती दिली.
000000

No comments:
Post a Comment