वृत्त
जिल्ह्यात सन 2025 च्या
तुलनेत
सन 2026 मध्ये अपघातात घट
नांदेड दि. 15 एप्रिल :- परिवहन विभागाने राबविलेल्या विविध उपाययोजनाचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून जिल्ह्यात रस्ते अपघात आणि मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे अतिवेगाने आणि मद्यपान करुन वाहन चालविणाऱ्या वाहन चालकावर कारवाई करण्यात येत आहे. आरटीओ कार्यालयाच्या इंटरसेप्टर वाहनांवरील रडार कॅमेऱ्याद्वारे रस्त्यावरुन भरधाव जाणाऱ्या, सिटबेल्ट न लावलेल्या, ट्रीपल सीट व हेल्मेट नसलेल्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत आहे.
जिल्हयात एकूण झालेल्या अपघातांपैकी सर्वाधिक अपघात हे सायंकाळी 6 ते रात्री 9 च्या दरम्यान झाली आहेत. अपघात कमी करण्यासाठी सुक्ष्म पद्धतीने तालुकानिहाय विश्लेषण करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या एकूण 32 अधिकाऱ्यांद्वारे फेब्रुवारी 2025 ते मार्च 2025 या दोन महिन्याच्या कालावधीत नांदेड जिल्हातील सर्व 16 तालूक्यांचे तालुकानिहाय सर्वेक्षण करण्यात आले.
या सर्वेक्षणात Geo Tagging करून अपघात स्थळांची पाहणी करण्यात आली. अपघातांची कारणे जाणून अपघातांची संख्या कमी करण्याच्यादृष्टीने तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी त्या-त्या तालुक्यांचा उपाययोजनेसह सादर केलेला अहवाल जिल्हाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांना सादर करण्यात आला. या अहवालाच्या अनुषंगाने रस्त्या सुरक्षा संबंधित सर्व यंत्रणांना, अहवालात सुचविल्याप्रमाणे उपययोजनाबाबत तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिल्या आहेत. याबाबत कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागांना कळविण्यात आले आहे.
त्यामुळे सन 2025 च्या तुलनेत 2026 फेब्रुवारी पर्यंत जिल्हयात प्राणांतिक अपघातांमध्ये 24.38 टक्क्यांची घट झाली आहे. ही कामगिरी अधिक उंचावण्यासाठी आणि 2026 मध्ये अपघात मृत्यूदर आणखी कमी करण्यासाठी जिल्हयातील अपघात प्रवण क्षेत्रांचा अभ्यास करुन त्यावर उपाययोजना करण्यात येत आहेत.
जिल्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी
जानेवारी ते फेब्रुवारी या दोन महिन्यात अपघातामध्ये मृत्यूचे प्रमाण सुमारे 15.85
टक्क्यांनी कमी झाले आहे. सन 2026 मध्ये ही
कामगिरी अधिक सुधारण्यासाठी या कार्यालयाच्या वायुवेग पथक व इंटरसेप्टर पथकातील
वाहनांद्वारे अवजड वाहनांवर व वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनांवर करडी नजर ठेवली
जाईल आणि रस्ता सुरक्षा जनजागृतीवर आमचा भर राहणार आहे, अशी माहिती प्रसिद्धी
पत्रकाद्वारे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत केकरेज यांनी दिली.
00000
No comments:
Post a Comment