Wednesday, November 14, 2018


अनुसूचित जातींच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना
90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टरची योजना
नांदेड दि. 14 :- अनुसूचित जातींच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टरची योजनेसाठी शासन निर्णयातील तरतुदींची पूर्तता करणाऱ्या स्वयंसहाय्यता बचत गटांनी परिपूर्ण अर्ज संपूर्ण कागदपत्रांसह शुक्रवार 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नांदेड येथे सादर करावेत, असे आवाहन नांदेड समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध  घटकांच्या  स्वयंसहाय्यता बचतगटांना 90 टक्के अनुदानावर  9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना कार्यान्वित झाली आहे. शासन निर्णय 8 मार्च 2017 अन्वये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या  स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्यासाठी लाभाचे हस्तांतर रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
या योजनेअंतर्गत पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे आहेत. बचत गटांतील  सर्व सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत. एकूण सदस्यांपैकी 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जातीचे असावेत. तसेच अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. सक्षम अधिकाऱ्यानी दिलेले सर्व सदस्यांचे जातीचे प्रमाणपत्र व रहिवाशी प्रमाणपत्र असावेत. बचतगटाची नोंदणी सक्षम अधिकाऱ्याकडून केलेली असावी. बचत गटाचे खाते हे राष्ट्रीयकृत बँकेत असावे व त्या गटातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड हे त्या खात्यास सलग्न केलेले असावेत. सर्व सदस्यांची बँकेने प्रमाणित केलेली यादी असावी. या योजनेअंतर्गत लाभार्थी बचतगटांची निवड झाल्यानंतर बचत गटाने Ministry of Agriculture and Farmers  Welfare Deparment of Agriculture, Co- operation and Farmers Welfare. यांनी निर्धारित केल्यानुसार मिनी ट्रॅक्टर व  त्याची उपसाधने ही फार्म मशिनरी, ट्रेनिंग आणि टेस्टिंग इंस्टीटयूट  यांनी टेस्ट करुन जाहीर केलेल्या उत्पादकांच्या यादीतील परिमाणानुसार असावीत. तसेच निवड झालेल्या लाभार्थी बचत गटाने परिमाणानुसार मान्यता प्राप्त उत्पादकाकडून मिनी ट्रॅक्टर / ट्रॅक्टर व त्याची उपसाधने शासनाने निर्धारित केलेल्या किंमतीपर्यंत खरेदी करणे आवश्यक आहे. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा  3 लाख 50 हजार  इतकी राहील. स्वयंसाह्यता बचतगटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनाच्या किंमतीच्या 10 टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किंमतीच्या 90 टक्के (कमाल 3 लाख 15 हजार रुपये ) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील. एकूण किमतीच्या 10 टक्के स्वहिस्सा भरण्याचे हमीपत्र व गटातील कोणत्याही सदस्याने यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नाही असे हमीपत्र अर्जासोबत जोडावे. आरटीओ कार्यालयातील नोंदणी बचत गटाने स्वतः करून घेण्याचे हमीपत्र शंभर रुपये बाँडवर असावे. इतर अटीं व शर्ती तसेच विहित नमुन्यातील अर्ज समाज कल्याण कार्यालयाच्या सूचना फलकावर डकविण्यात आलेला आहे. बचतगटाने परिपूर्ण अर्ज सादर करावे. त्रुटीयुक्त अर्ज सादर करू नयेत. त्रुटी पूर्ततेसाठी कोणत्याही प्रकारची संधी दिली जाणार नाही.
वरील अटीं शर्तीची तसेच शासन निर्णयातील तरतुदींची पूर्तता करणाऱ्या स्वयंसहाय्यता बचत गटांनी परिपूर्ण अर्ज संपूर्ण कागदपत्रांसह शुक्रवार 30 नोव्हेंबर पर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नांदेड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ज्ञानमाता शाळेसमोर नांदेड येथे सादर करावा. यापूर्वी निवड न झालेल्या बचतगटानी नव्याने अर्ज करणे आवश्यक आहे. यापूर्वी सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असेही आवाहन केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...