Wednesday, November 14, 2018


पीओएसद्वारे केरोसिनचे वितरण
576 के. एल. केरोसीन बचत
  नांदेड दि. 14 :- केरोसिनची विक्री पीओएस मशीनद्वारे व हमीपत्र, घोषणापत्राशिवाय वितरीत करण्‍यात येणार नाही. जिल्‍ह्यातील तहसिल कार्यालयाकडून केरोसीन लाभधारकांना दिलेल्‍या गॅस जोडणी नसल्याबाबत हमीपत्रांच्‍या संख्‍येनुसार तालुक्‍याची केरोसीन मागणी निश्‍चीत होत आहे. त्‍याआधारे तालुक्‍याना ऑक्‍टोंबर पासून केरोसीन नियतन देण्‍यात येत आहे. ऑक्‍टोंबरमध्‍ये नांदेड जिल्‍ह्याचे 144 के.एल तर नोव्‍हेंबर मध्‍ये 432 के.एल असे एकूण 576 के.एल केरोसीन बचत झाले, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी‍ दिली आहे.
अन्‍न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्देशानुसार तहसिलदार यांच्याकडून गॅसधारक शिधापत्रिकांवर स्‍टॅम्पिंग करण्‍याबाबत व पात्र शिधापत्रिकाधारकांची कुटुंबातील सदस्‍यांसह आधार क्रमांक नोंद करुन अद्यावत शिधापत्रिकाधारक यादी 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत सादर करण्‍याची कार्यवाही होणार आहे.
जिल्ह्यात शिधापत्रिकेला आधार क्रमांक लिंक करण्याचे काम एप्रिल 2018 पासून सुरु झाले आहे. हे काम सुरु झाल्‍यापासून दुबार, मयत, स्‍थलांतरीत आदी कारणामुळे 93 हजार 759 शिधापत्रिका डिलिट करण्‍यात आल्‍या आहेत. आधार सिडींगमुळे शिधाप‍त्रिकाधारक राज्‍यात एकाच ठिकाणाहन धान्‍य उचल करु शकतो. त्यामुळे लाभधारकाचे नाव राज्‍यात एकापेक्षा जास्‍त शिधापत्रिकेत राहणार नाही.
केरोसिन लाभधारकांकडून गॅस जोडणी नसल्याबाबत हमीपत्र दुकाननिहाय मोजून घेतल्‍यानंतर या हमीपत्राच्‍या संख्‍येच्‍या आधारे नियतनाची मागणी तहसिलदार यांच्याकडून जिल्‍हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे नोंदविण्यात येणार आहे. अनुदानित केरोसिनचे वितरण केवळ आधार क्रमांक सादर केलेल्‍या बिगरगॅस जोडणी शिधापत्रिकाधारकांना त्‍यांनी सादर केलेल्‍या गॅस जोडणी नसल्याबाबतच्‍या  हमीपत्राच्‍या सत्‍यतेची खात्री करूनच करण्‍यात येईल. रास्‍तभाव दुकानातील पीओएस मशीनद्वारे कुटुंबातील कोणत्‍याही एका सदस्‍याचेही आधार प्रमाणिकरण झाले असल्‍यास केरोसिन वितरण होईल.
शिधापत्रिकेवरील माहिती पीओएस मशिनवर उपलब्‍ध नसल्‍यास आधार नोंदणीची प्रत कुटुंबातील प्रत्‍येक सदस्‍याकडून प्राप्‍त करून घेऊन केरोसिन वितरण केले जाईल. परंतु हा पर्याय एकदाच वापरण्‍यात येईल. ही माहिती दुकानदाराने तात्‍काळ तहसिल कार्यालयास कळवावी. ज्‍या रास्‍तभाव दुकानांमध्‍ये पीओएस DEVICE ला नेटवर्क उपलब्‍ध नाही त्‍या दुकानामधून पात्र लाभार्थ्‍यांना केरोसिनचे वितरण प्रचलित पद्धतीनेच करण्‍यात येईल. परंतू त्‍यासंदर्भात शिधापत्रिकाधारकाकडून आधार क्रमांक उपलब्‍ध करून घ्‍यावे. केरोसिन विक्री पावतीवर लाभार्थ्‍यांचे नाव, आधार क्रमांक व शिधापत्रिकेचा क्रमांकाची नोंद घ्‍यावी आणि केरोसिन विक्री पावतीवर लाभार्थ्‍यांची स्‍वाक्षरी घ्‍यावी. शिधापत्रिकाधारकानी केरोसीन मिळण्यासाठी गॅस जोडणी नसल्याबाबत भरुन दिलेल्‍या हमीपत्रकातील माहिती चुकीची निघाल्‍यास किंवा सदर माहिती खेाटी असल्‍याचे आढळून आल्‍यास संबंधीत  लाभधारकाविरूध्‍द जीवनावश्‍यक वस्‍तु अधिनियम 1955 तसेच भारतीय दंड संहितेतील तरतुदीनुसार कारवाई होईल.
स्‍थानिक गॅस एजन्‍सीनी गॅसजोडणी लाभार्थ्‍यांची यादी संबंधित तहसिलदार (पुरवठा शाखा) यांना पाठवावी व ही यादी तहसिलदार यांनी संबंधित रास्‍तभाव दुकानदार / केरोसिन विक्रेत्‍यांना उपलब्‍ध करुन द्यावी. स्‍थानिक एजन्‍सीनी गॅसधारकांची यादी उपलब्‍ध करुन न दिल्‍यास संबंधितांविरुध्‍द जीवनावश्‍यक वस्‍तु अधिनियमांतर्गत कारवाई होईल. याची नोंद जिल्ह्यातील रास्‍तभाव दुकानदार, किरकोळ केरोसीन विक्रेते, शिधापत्रिकाधारक व गॅस एजन्‍सीधारकांनी  घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.   
000000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...