Friday, May 22, 2026

वृत्त क्रमांक 

सोयाबीन, तुर, मुग, उडीद, ज्वारी प्रमाणित बियाणे वाटपासाठी

वैयक्तिक शेतकऱ्यांनी  अर्ज करावा- जिल्हा अधीक्षक कृषी अधीकारी

नांदेड दि. 22 मे:-  खरीप हंगाम 2026 मध्ये विविध योजनांतर्गत प्रमाणित बियाणे वितरणासाठी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू आहे. कडधान्य आत्मनिर्भरता अभियान अंतर्गत तुर, मुग, उडीद, (पाच वर्षाच्या आतील वाण 6 हजार रुपये प्रत‍ि क्व‍िंटल  व पाच वर्षा वरील परंतू 10 वर्षाच्या आतील वाण- 3 हजार रुपये प्रत‍ि क्व‍िंटल अनुदान) या योजनेत अधिसूचित वाणांसाठी अर्ज करता येणार आहे. 

राष्ट्रीय खाद्यतेल अभियानातील तेलबिया योजनेत सोयाबीन (5 वर्षांच्या आतील वाण 11 हजार रुपये प्रत‍ि क्व‍िंटल अनुदान) अधिसूचित वाणांसाठी अर्ज करता येणार आहे. लाभार्थी निवड प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर होणार आहे. 

प्रमाणित बियाणे वितरणासाठी सोयाबीन, तुर, मुग, उडीद, ज्वारी या पिकांसाठी वैयक्तिक शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक फार्मर आयडीद्वारे महाडीबीटी पोर्टलवर बियाण्यांसाठी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. 

शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी(https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin) या संकेतस्थळाचा वापर करावा. योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभाग, महाराष्ट्र राज्याचे www.krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळ पाहावे. संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अटी व शर्ती अर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक राहतील.

000000

वृत्त क्रमांक 

सोयाबीन, तुर, मुग, उडीद प्रात्यक्षिकासाठी शेतकरी गट, उत्पादक कंपनी, 

कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थानी ऑनलाईन अर्ज करावेत -जिल्हा अधीक्षक कृषी अधीकारी

नांदेड दि. 22 मे:- कडधान्य आत्मनिर्भरता अभियान आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया) अंतर्गत सन 2026-27 या वर्षासाठी पीक प्रात्यक्षिक घटकासाठी महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. पीक प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार केला जाणार आहे. प्रात्यक्षिक लाभासाठी 31 मार्च 2026 पर्यंत नोंदणीकृत असलेले शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था पात्र आहेत. 

खरीप हंगाम 2026-27 साठी महाडीबीटी पोर्टलवर (https://mahadbt.maharashtra. gov.in /Farmer/ AgriLogin) अर्जाची विंडो उपलब्ध झाली असून जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

या योजनेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अन्नधान्य, गळीतधान्य, तृणधान्य, आणि कडधान्य पिकांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी सुधारित वाणांचे दर्जेदार बियाणे, जैविक खते, किटकनाशके, बीज प्रक्रिया औषधी इत्यादी निविष्ठांचा 10 हेक्टर (25 एकर) क्षेत्रावर प्रात्यक्षिकांचा लाभ देण्यात येणार आहे. 

शेतकरी जवळच्या सेतू केंद्रावर, सीएससी केंद्रावर किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज सादर करू शकतात. अर्जाची निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर होणार असल्याने जिल्हयातील शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था यांनी लवकारात लवकर अर्ज करावेत. मागील दोन वर्षात पीक प्रात्यक्षिकांचा योजनेंअतर्गत लाभ घेतला असल्यास त्यांची यावर्षी लाभासाठी निवड केली जाणार नाही. शेतकरी गट/ कंपनी मधील केवळ फार्मर आयडी असलेले शेतकरी सदस्य लाभासाठी पात्र असणार आहेत असेही कृषी विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

00000

वृत्त क्रमांक 

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी नोडल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

नांदेड, दि. 22 मे : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक 2026 अनुषंगाने नियुक्त नोडल अधिकारी व त्यांच्या सहाय्यकांचे प्रशिक्षण आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पार पडले.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व नोडल अधिकाऱ्यांना निवडणुकीसंदर्भातील सोपविलेल्या जबाबदाऱ्या व कर्तव्ये अधिक काटेकोरपणे पार पाडण्याच्या सूचना दिल्या.

प्रशिक्षणावेळी अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजकुमार माने, उपजिल्हाधिकारी (रोहयो) हनमंत कोळेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्यासह सर्व नोडल अधिकारी व त्यांचे सहाय्यक उपस्थित होते.

निवडणूक कामकाज अधिक सुलभ व प्रभावीपणे पार पाडण्यासाठी विविध कक्षांची स्थापना करण्यात आली असून त्यासाठी नोडल अधिकारी व सहाय्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये प्रशिक्षण व्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्था, नामनिर्देशन, आचारसंहिता, माहिती व्यवस्थापन, मतदान कर्मचारी व्यवस्थापन, मतदार यादी व मतदान केंद्र व्यवस्थापन, मतपत्रिका छपाई व वाटप, स्ट्राँग रूम व मतमोजणी व्यवस्थापन, उमेदवार व राजकीय पक्ष निवडणूक खर्च तपासणी व नियंत्रण, जिल्हास्तरीय कक्ष, निवडणूक निरीक्षक कक्ष, वाहन अधिग्रहण व वाहतूक व्यवस्थापन, मतपेटी व मतदान साहित्य वाटप तसेच संगणकीकरण व्यवस्थापन आदी कक्षांचा समावेश आहे.सर्व नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणुकीशी संबंधित जबाबदाऱ्या व कर्तव्ये सक्षमपणे पार पाडावीत, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी राजकुमार माने यांनी विविध कक्ष तसेच नोडल अधिकाऱ्यांच्या कामकाज व जबाबदाऱ्यांबाबत माहिती दिली.

000000



 वृत्त क्रमांक 

२५ वर्षांपासून बंद असलेला शिवरस्ता १.५ कि.मी.पर्यंत खुला

नांदेड, दि. 22 मे : नांदेड तालुक्यातील सुगाव बुद्रुक, सुगाव खुर्द ते भानपूर या मार्गावरील शिवरस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण झाले होते. संबंधित शेतकऱ्यांना रस्त्याचे महत्त्व समजावून सांगून त्यांच्या सहमतीने आज  22 मे 2026 रोजी सुमारे १.५ कि.मी. लांबीचा रस्ता खुला करण्यात आला.

मा. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ तसेच तहसीलदार संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड तालुक्यात शिवरस्ते व पाणंद रस्ते मोकळे करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.

या कारवाईवेळी नायब तहसीलदार (महसूल) सुनिल माचेवाड, मंडळ अधिकारी नाळेश्वर, कुणाल जगताप, तलाठी सज्जा वाघी राजेश बरोडा तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व शेतकरी उपस्थित होते.

यापुढेही अशाच प्रकारचे शिवरस्ते खुले करण्यात येणार असल्याचे तहसीलदार संजय वारकड यांनी सांगितले. तसेच रस्ते अडविणाऱ्या शेतकऱ्यांना पुढे शासकीय लाभांपासून वंचित ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिला.

पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना चिखलातून जावे लागत होते. आता रस्ता मोकळा झाल्याने शेतकऱ्यांनी साखर वाटून आनंद व्यक्त केला.

यावेळी दत्ता भोसले, बाबुराव शिंदे, नामदेव शिंदे, दत्तराव तातेराव भोसले, विजय भोसले, गंगाधर भोसले, संतोष भोसले, जळबाजी भोसले आदी शेतकरी उपस्थित होते.

00000



वृत्त क्रमांक 

जनगणना कामाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथकाची लोहा तालुक्यास भेट

नांदेड, दि. 22 मे : जनगणना 2027 अंतर्गत सुरू असलेल्या कामाच्या पाहणीसाठी आज 22 मे 2026 रोजी जनगणना केंद्रीय पथकाने लोहा तालुक्यास भेट दिली.

या पथकात जनगणना सहसंचालक श्री. शर्मा, सहाय्यक संचालक श्री. पांडे, श्री. बी. प्रसाद तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथील जनगणना कक्ष सहाय्यक लतीफ पठाण यांचा समावेश होता.

संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व पर्यवेक्षकांची बैठक घेऊन आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले. तसेच तालुक्यात आतापर्यंत झालेल्या जनगणना कामाचे कौतुक करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी लोहा जनगणना ग्रामीण चार्ज अंतर्गत सर्वप्रथम जनगणनेचे नियुक्त काम पूर्ण करणारे प्रगणक श्री. लिंगोजी गणपती वाघमारे (सहशिक्षक) तसेच संबंधित पर्यवेक्षकांचा सत्कार करण्यात आला.

तहसीलदार तथा चार्ज अधिकारी (ग्रामीण) लोहा विठ्ठल परळीकर यांनी नियुक्त 64 पर्यवेक्षकांना त्यांच्या अखत्यारीतील 359 प्रगणकांकडून जनगणनेचे काम अचूक व वेळेत पूर्ण करून घेण्याच्या सूचना दिल्या आणि पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.

०००००





वृत्त क्रमांक 

नांदेड जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेचे प्राधिकृत अधिकारी म्‍हणुन 

जिल्‍हाधिकारी यांनी स्विकारला पदभार 

नांदेड, दि. 22 मे : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्राधिकृत अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज पदभार स्वीकारला. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था शाहुराज हिरे यांच्याकडून त्यांनी पदभार स्विकारल्यानंतर बँकेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेत बँकेच्या प्रशासकीय व आर्थिक कामकाजाबाबत मार्गदर्शन केले. तसेच मुख्यालयातील विविध विभागांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणीही केली.

या प्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय कदम, वैधानिक परीक्षक रोहित लोहिया तसेच बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची मुदत 3 एप्रिल 2026 रोजी संपुष्टात आल्याने नव्या संचालक मंडळाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सध्या अंतिम मतदार यादी तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 77-अ (1) (दोन) नुसार विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातूर यांनी विद्यमान संचालक मंडळ निष्प्रभ करून बँकेचे दैनंदिन कामकाज सुरळीत चालावे यासाठी जिल्हा उपनिबंधक शाहुराज हिरे यांची 27 एप्रिल 2026 रोजी “प्राधिकृत अधिकारी” म्हणून नियुक्ती केली होती. त्यांनी पदभार स्वीकारून बँकेचे प्रशासकीय कामकाज सुरू ठेवले होते.

यानंतर सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई येथील अपर निबंधक तथा सहसचिव यांनी नांदेड जिल्हाधिकारी यांची बँकेच्या “प्राधिकृत अधिकारी” पदावर नियुक्ती करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातूर यांनी 20 मे 2026 रोजी आदेश जारी करून शाहुराज हिरे यांच्या जागी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नियुक्ती केली.

त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी 22 मे 2026 रोजी सकाळी प्राधिकृत अधिकारी पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. त्यांच्या नियुक्तीमुळे बँकेच्या निवडणूक प्रक्रियेसह दैनंदिन कामकाजाला गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

00000


Thursday, May 21, 2026

#खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन

#नांदेड 


 

दुष्काळ निवारणासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला १५ लाखांचा निधी.! खरीप हंगामातील दुष्काळ निवारणासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून,...