Saturday, September 2, 2023

 वृत्त 

फ्रेंच राज्यक्रांती एवढाच हैदराबाद मुक्तिसंग्राम लढा महत्त्वाचा

- ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉ. प्रभाकर देव 

इतिहासाच्या आपल्या गावातील पाऊलखुणा नव्या पिढी पर्यंत पोहचण्यासाठी हा जागर

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत 

▪️महसूल, जिल्हा परिषद आणि पोलीस विभागाच्या समन्वयातून कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- फ्रेंच राज्यक्रांती व हैदराबाद मुक्तिसंग्राम यात खूप सामन्य आहे. शेवटची राजसत्ता फ्रेंच राज्यक्रांतीने उलथवून टाकली. इकडे भारताला स्वातंत्र्य मिळूनही निजामाची राजसत्ता तशीच होती. ती राजसत्ता हैदराबाद अर्थात मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या लढ्याने भारतातील शेवटची राजसत्ता उलथवून टाकत लोकशाहीच्या मूल्यांना प्रवाहित केले. फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये राजसत्ता नष्ट करायची होती. मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यात जुलमी राजा नष्ट करायचा होता, असे नि:संदिग्ध प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉ. प्रभाकर देव यांनी केले. 

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उमरी येथे कै. गिरीशभाऊ गोरठेकर सांस्कृतिक सभागृहात स्मरण इतिहासाचे या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. महसूल विभाग, जिल्हा परिषद आणि पोलीस विभागाच्या समन्वयातून आयोजित या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, धर्माबादच्या उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे, अप्पर पोलीस अधिक्षक खंडेराव धरणे, तहसिलदार हरीश गाडे, पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे, गटविकास अधिकारी मारोती जाधव, मुख्याधिकारी प्रियंका टोंगे व गावातील ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते. 

मराठवाडा मुक्तीच्या लढ्यात अनेक ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी योगदान दिले आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या, हुतात्मांच्या बलिदानाने, संघर्षाने आपण स्वतंत्र झालो. आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र मिळाले परंतु मराठवाडा निझामाच्या जोखडातून मुक्त झाला नाही. यासाठी मराठवाड्यातील विशेषत: 16 जिल्ह्यातील सामान्य माणसाला खूप मोठा शांतीच्या मार्गाने तर काही ठिकाणी सशस्त्र लढा द्यावा लागला. या लढयात 18 पगड जातीच्या लोकांचा सहभाग होता. स्त्रियांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लक्षणीय योगदान होते, असे डॉ. प्रभाकर देव यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले. 

अनेक महिलांनी पहिल्यांदाच प्रत्यक्ष हातात शस्त्र घेतले. अनेकजणी तुरुंगात गेल्या. हैदराबाद मुक्तीसंग्राम लढा अधिक तीव्र करण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांना आर्थिक अडचण भासत होती. त्यातूनच उमरी बँक ॲक्शन घटनेचा प्लॅन उमरखेड कॅम्प मध्ये तयार झाला. सर्व गावाच्या समोर भरदिवसा स्वातंत्र्य सैनिकांनी उमरी स्टेट बँकेवर हल्ला करुन बँक लुटली. या लुटीचे वैशिष्ट असे की यात एका पैशाचा देखील गैरवापर झाला नाही. या रकमेचे ऑडिट झाले. उमरी बँक ॲक्शन हे स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रामाणिकपणाचे प्रतिक असून मराठवाडा मुक्तीच्या लढ्यातील ही घटना मुकूटमणी म्हणावी लागेल. उमरी यादृष्टीनेच अधिक महत्त्वाचे आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामात उमरीच्या भुमीचे योगदान मोठे असल्याचे डॉ. देव यांनी सांगितले. 

1942 ला उमरी परिसरात लोकजागरणाचे काम सुरु झाले. सामान्य माणूस जागरुक होवून स्वातंत्र्य लढयात सहभागी झाला. हैदराबाद राज्याच्या प्रशासनात अडचणी निर्माण करुन हैदराबादच्या राजाला भारतात विलीन होण्यासाठी भाग पाडणे हा स्वातंत्र्य सैनिकांचा उद्देश होता. यात दळणवळणाची साधने नष्ट करणे, टेलिफोनच्या तारा तोडणे, स्त्रियांनी पोटाला बांधून शस्त्रास्त्रे पुरविणे, पोलीस स्टेशनवर हल्ला करणे, रेल्वे स्टेशन ताब्यात घेणे अशा अनेक घटनांना सामोरे जाताना अनेकांनी प्राणांतिक संघर्ष केला. शेवटी पोलीस कारवाई करुन मराठवाडा निझामाच्या तावडीतून मुक्त झाला, असे डॉ. प्रभाकर देव यांनी स्पष्ट करून लढ्यातील अनेक घटनाक्रमांना उजाळा दिला. 

इतिहासाच्या आपल्या गावातील पाऊल खुणा

नव्या पिढी पर्यंत पोहचण्यासाठी हा जागर

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. यातून स्वातंत्र्याचे मोल नव्या पिढीपर्यंत पोहचेल. आपल्या शहरात घडलेल्या स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वपूर्ण घटना अशा कार्यक्रमातून अत्यंत प्रभावीपणे प्रवाहित होतात. इतिहासाचा हा अनमोल ठेवा इतरांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने जिल्ह्यातील प्रत्येक तालुकापातळीवर आम्ही कार्यक्रम आयोजित करत असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. 

या कार्यक्रमात कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय उमरी, कै. गिरीशभाऊ गोरठेकर इंग्लिश स्कुल, मॉर्डन इंग्लिश स्कूल, उमरी या शाळेच्या विद्यार्थ्यानी देशभक्तीपर गीताचे उत्कृष्ट सादरीकरण केले. या कार्यक्रमात उमरी बँक ॲक्शनचा देखाव्याचे हुबेहुब सादरीकरण शालेय विद्यार्थ्यांनी केले. या सादरीकरणात उमरी बँक लुटीची रोमहर्षक घटना प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उभी राहीली. या देशभक्तीवरील सादरीकरणाबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे यांनी तर आभार गटशिक्षण अधिकारी उमरी यांनी मानले.

00000

छायाचित्र : सदा वडजे, नांदेड








Friday, September 1, 2023

 जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह

पाऊस व वादळी वारे वाहण्याची शक्यता

 

·   नागरिकांनी सावधगिरी बाळगावी

 

नांदेड, (जिमाका) दि. 1 :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 1 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 2, 3 व 4 सप्टेंबर 2023 हे तीन दिवस येलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दिनांक 2, 3 व 4 सप्टेंबर 2023 या तीन दिवसांच्या काळात जिल्ह्यात एक किंवा दोन ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीची उपाययोजना नागरिकांनी पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी असे, आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे.  

 

या गोष्टी करा : विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

 

या गोष्टी करु नका: आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. याबाबत सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी असेही, आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे.

00000

 विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी 

विजयकुमार जोशी यांची बिनविरोध निवड 

          लातूर, दि.01 (विमाका) :  लातूर विभागीय अधिस्वीकृती समिती - २०२३ ची पहिली बैठक आज लातुरच्या शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात पार पडली. या बैठकीत समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार विजयकुमार जोशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. लातूर जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. 

          या बैठकीस माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लातूर विभागाच्या उपसंचालक डॉ.सुरेखा मुळे, विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य सर्वश्री अमोल अंबेकर, अझरोद्दीन रमजान शेख, नरसिंह घोणे, प्रल्हाद उमाटे, यांच्यासह नांदेड जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, उस्मानाबाद जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, हिंगोली जिल्हा माहिती अधिकारी अरूण सूर्यवंशी, लातूर विभागीय माहिती कार्यालयाचे सहायक संचालक डॉ. श्याम टरके, माहिती अधिकारी तानाजी घोलप, उपसंपादक रेखा गायकवाड आदी उपस्थित होते.

          उपसंचालक डॉ. मुळे यांनी नवनियुक्त अध्यक्ष श्री. जोशी व समिती सदस्यांचे शाल, पुष्पगुच्छ, ग्रंथ भेट देऊन स्वागत केले. अधिस्वीकृती समितीचे नवनियुक्त अध्यक्ष श्री. जोशी यांनी शासकीय अधिकारी व समिती सदस्यांच्या समन्वयातून अधिकाधिक पत्रकारांना न्याय देऊ. विभागीय अधिस्वीकृती समितीवर माझी पहिल्यांदाच निवड झाली. सर्व समिती सदस्यांच्या परस्पर सहकार्यातून सकारात्मकदृष्टीने काम करण्याचा त्यांनी मनोदय व्यक्त केला. पात्र असलेल्या पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका देण्यासाठी समिती सदैव तत्पर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. समितीचे सदस्य श्री. उमाटे, श्री. शेख यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

                                                          ***




जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- नांदेड जिल्ह्यात 10 सप्टेंबर 2023 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 10 सप्टेंबर 2023 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

 

प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत आयोजित शिबिरात आतापर्यत 413 बस चालकांच्या आरोग्याची तपासणी

 प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत आयोजित

शिबिरात आतापर्यत 413 बस चालकांच्या आरोग्याची तपासणी

नांदेड, (जिमाका) दि. 1 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत जिल्हयातील बस चालकांसाठी जुलै 2023 पासून मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर सुरु करण्यात आले आहे. या शिबिरात आतापर्यंत 413 बस चालकांची नेत्र व आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व बस चालकांनी अशा प्रकारच्या शिबीरात सहभाग घेवून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.

तपासणी शिबिराच्या अनुषंगाने 31 ऑगस्ट रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन चालकांची नेत्र व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर लायसन्स क्लब मिड टाऊन नांदेड तथा सिडकोच्या वतीने संपन्न झाले. या शिबीरात एका दिवसात सुमारे 200 वाहन चालकांची नेत्र व आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच रस्ते सुरक्षेबाबत समुपदेशन करण्यात आले. संबंधित वाहनचालकांना प्रमाणपत्र देण्यात  आले.  या तपासणीमध्ये दृष्टीदोष आढळलेल्या वाहन चालकांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात येणार आहे. या शिबीरास लायन्स क्लब मिडटाऊनचे अध्यक्ष लॉ.अमरसिंह चौहान, कोषाध्यक्ष लॉ.शिवाजी इबितवार, लॉ.शिरिष गिते, लॉ.ज्ञानेश्वर महाजन तथा लॉ.डॉ.सुरेंद्र कदम, प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी संदिप निमसे, वाहतुक नियंत्रक यासीन अहमद खान, राज्य परिवहन महामंडळाचे वैभव डूब्बेवार, सहा.मोवानि, स्वप्नील राजूकर, सहा.मोवानि व इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हयातील रस्ते अपघाताचे विश्लेषण केले असता बहुतांश अपघातास वाहनचालक कारणीभूत असतात. वाहनचालकांच्या वाहन चालविण्याच्या कौशल्यात त्यांचे संपूर्ण आरोग्य तसेच वाहन चालकाच्या दृष्टीस अनन्यसाधारण महत्व आहे. चालकाला कुठल्याही प्रकारची व्याधी अथवा दृष्टीदोष असेल तर वाहन चालविताना त्याला अडचण येत असतात. परिणामी अशा परिस्थितीत अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत अशा विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे असे परिवहन कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोगाचा प्रसार रोखण्यासाठी कृषि विभागाचे आवाहन

                                                     सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोगाचा प्रसार

 रोखण्यासाठी कृषि विभागाचे आवाहन

 

नांदेड, (जिमाका) दि. 31 :- राज्यात कापूस पिका खालोखाल सोयाबीन पीक घेतले जाते. मागील वर्षी सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक (केवढा) या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला होता. रोगाच्या जास्त प्रादुर्भावामुळे काही भागात संपूर्ण पिक उपटून टाकण्याची वेळ आली होती. सध्या सोयाबीन पिकाची लागवड होऊन दीड महिन्याचा कालावधी झाला आहे. काही ठिकाणी यंदाही या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगाचा प्रादुर्भाव ओळखून शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना कराव्यात, जेणेकरून उत्पादनात होणारी घट टाळली जाईल, असे आवाहन कृषि विभागाच्यावीने करण्यात आले आहे.  

 

पिवळा मोझॅक रोगाची लक्षणे-


झाडाची वाढ खुंटते, पाने आखूड, लहान, जाडसर, सुरकुतलेली होतात व पानाच्या कडा खालच्या बाजून दुमडतात. सुरूवातीला पानवर पिवळ्या रंगाचे छोटे चट्टे दिसतात. कालांतराने ठिपक्यांच्या चट्यांचा आकरमान वाढत जातो अणि संपूर्ण पान पिवळे पडून त्यातील हरीतद्रव्याच्या ऱ्हास होतो. अशा पिवळ्या पानांवर तांबूस करपट रंगाचे ठिपके दिसतात. झाडांच्या पानांचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो. फुलोरा उशिरा येतो व शेंगा कमी लागतात तसेच दाने लहान भरतात किंवा संपूर्ण शेंगा दाणे विरहीत व पोचट उपजतात. प्रादुर्भावग्रस्त झाडाची वाढ पूर्णपणे खुंटते.


प्रसार-


रोगाचा प्राथमिक प्रसारक बियाणेमार्फत, दुय्यम प्रसार रसशोषक किडीमार्फत होतो. त्यात प्रामुख्याने पांढरी माशी व मावा किडीचा समावेश आहे.


एकात्मिक व्यवस्थापन-


रोगास बळी न पडणाऱ्या वाणांची लागवड करावी. नियंत्रणासाठी प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटुन त्यांना जाळुन किंवा जमिनीत पुरुन नष्ट करावीतजेणेकरून निरोगी झाडावर होणारा रोगाचा प्रसार कमी करता येईल. आंतरपीक व मिश्र पीक पद्धतीचा अवलंब केल्यास रोगाचे प्रमाण कमी करणे शक्य होते.

बिगर हंगामी सोयाबीन लागवड टाळावी जेणेकरून किडीच्या जीवनक्रमात अडथळे येऊन पुढील हंगामात होणारा प्रादुर्भाव कमी होईल. लागवडीनंतर सुरुवातीचे 45 दिवस पीक तण विहिरीत ठेवावे.

जैविक नियंत्रण - पिक पेरणी नंतर ३० ते ३५ दिवसांनी 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. पिवळे चिकट सापळे प्रति एकरी 10 याप्रमाणे लावावेत. तज्ञांच्या सल्याने किटकनाशकाची फवारणी करावी असे कृषिविभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 

 वने, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा दौरा 

नांदेड, (जिमाका) दि. 31 :- राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मस्त्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार हे शनिवार 2 सप्टेंबर 2023 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

 

शनिवार 2 सप्टेंबर 2023 रोजी नागपूर येथून विमानाने सकाळी 9 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 9.15 वा. मोटारीने नांदेडहून औंढा नागनाथ, जि. हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 1 वा. मोटारीने औंढा नागनाथ हुन नांदेड कडे प्रयाण. दुपारी 2 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वा. नांदेड जिल्हा भाजपा पदाधिकारी बैठकीस उपस्थिती. स्थळ-नांदेड. सायं. 4.30 वा. पत्रकार परिषद. स्थळ-नांदेड. सायं.5.15 वा. मोटारीने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. सायं.5.45 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व विमानाने नागपूरकडे प्रयाण करतील.

00000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...