Thursday, January 14, 2021

 

मतदान व मतमोजणी क्षेत्रातील

भरणारे आठवडी बाजार राहतील बंद   

नांदेड (जिमाका) दि. 14 :-जिल्ह्यात होत असलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी शुक्रवार 15 जानेवारी 2021 रोजी निवडणूक हद्दीत व मतमोजणीच्या दिवशी सोमवार 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी असलेल्या गावी / ठिकाणी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश मार्केट ॲड फेअर ॲक्टर, 1862 चे कलम 5 अन्वये जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत. 

अशा गाव / ठिकाणांचे आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशीचे आठवडी बाजार शनिवार 16 जानेवारी 2021 रोजी तर मतमोजणीच्या दविशी मतमोजणी असलेल्या गावी / ठिकाणाचे आठवडी बाजार मंगळवार 19 जानेवारी 2021 रोजी भरविण्यात यावेत, असेही आदेशात म्हटले आहे.

0000

 

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी

नदीपात्र परिसरात कलम 144  

नांदेड (जिमाका) दि. 14 :-मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून बुधवार 20 जानेवारी 2021 पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत. 

याबंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 जानेवारी 2021 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 फेब्रुवारी 2021 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे. 

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

0000

 

जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांनी

आधार सिडींग, मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी

नांदेड (जिमाका) दि. 14 :-जिल्ह्यात रास्‍तभाव दुकानदार यांच्‍यामार्फत शिधापत्रिकाधारक लाभार्थ्‍यांनी ई-पॉसवर ज्‍या सदस्‍यांच्‍या नावासमोर आधार नंबर दिसत नाही अशा सदस्‍यांनी रविवार 31 जानेवारी 2021 पर्यंत ई-पॉस मशीनद्वारे eKYC करुन आधार सिडींग व मोबाईल क्रमांकाची नोंदणी रास्‍तभाव दुकानदारामार्फत करावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्‍हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण यांनी केले आहे. 

राष्‍ट्रीय अन्‍नसुरक्षा योजना व एपीएल (केशरी) शेतकरी योजनेतील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्‍यांचे मोबाईल क्रमांक व आधार सिडींग शंभर टक्के पूर्ण करण्‍याच्‍या केंद्र शासनाच्‍या सूचना आहेत. राज्य शासनाच्या अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने आधार सिडींग करण्याबाबत कळविले आहे. सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेत अधिक पारदर्शकता येण्‍यासाठी मोहिम राबवून लाभार्थ्‍याचे आधार व मोबाईल सिडींग सुधारणे आवश्‍यक आहे. रास्‍तभाव दुकानांतील ई-पॉस उपकरणामधील eKYC व मोबाईल सिडींग सुविधेचा अधिकतम वापर करुन आधार व मोबाईल क्रमांक सिडींगचे प्रमाण वाढविण्‍यात यावे. यासाठी रविवार 31 जानेवारी 2021 पूर्वी प्रत्‍येक रेशनकार्डमध्‍ये लाभार्थ्‍यांचे 100 टक्के आधार सिडींग आणि किमान एक वैध मोबाईल क्रमांक सिड करण्‍याचे उद्दीष्‍ट दिले आहे. 

धान्‍याचे मासिक वाटप करतांना ई-पॉस उपकरणाद्वारे रास्‍तभाव दुकानदार यांच्‍यामार्फत ज्‍या शिधापत्रिकेतील लाभार्थ्‍यांच्‍या नावासमोर आधार नंबर दिसत नाही अशा लाभार्थ्‍यांची ई-पॉसद्वारे eKYC करून आधार सिडिंग व मोबाईल क्रमांकाचे सिडींग ही रविवार 31 जानेवारी पर्यंत करावी. या मुदतीत आधार सिडींग न झालेल्‍या लाभार्थ्‍यांचे अनुज्ञेय धान्‍य पुढील महिन्‍यापासून आधार सिडींग होईपर्यंत निलंबित करण्‍यात येईल. सर्व लाभार्थ्‍यांनी आपले eKYC करून आधार सिडिंग व मोबाईल क्रमांकाचे सिडींग ही 31 जानेवारी पर्यंत करावे, असेही आवाहन केले आहे.

0000

 

ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील

कामगार / कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सुट्टी  

नांदेड (जिमाका) दि. 14 :- जिल्ह्यात ज्या ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे त्याक्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी  सर्व उद्योग व्यवसाय आस्थापना चालकांनी त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बाजवण्यासाठी सुट्टी / 2 तासाची सवलत देण्यात यावी. कर्मचाऱ्याच्या वेतनातून वेतन कपात केल्यास ते जिल्ह्यातील जिल्हा कामगार कार्यालयास तक्रार नोंदवू शकतात. खाजगी क्षेत्रातील आस्थापनामधील अधिकारी, कर्मचारी व कामगारांनी मतदान करावे, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त मोहसिन अ. सय्यद यांनी केले. 

राज्य निवडणुक आयोगाच्या आदेशाद्वारे व शासन परिपत्रकातील परिशिष्ट १ व परिशिष्ट २ नुसार राज्यातील ३४ जिल्ह्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणुकासाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. त्यानुसार मुंबई शहर व मुंबई उपनगर हे जिल्हे वगळता उर्वरीत सर्व जिल्ह्यात शुक्रवार दिनांक १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील 1 हजार 13 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम समाविष्ट आहे. शासनाने या मतदानासाठी भरपगारी सुट्टी कामगारांसाठी जाहीर केली आहे. मतदानाच्या दिवशी सर्व खाजगी कार्यालये, आस्थापना, दुकाने, कारखाने, मॉल्स व्यापारी संकुल इत्यादी ठिकाणी काम करणारे अधिकारी, कर्मचारी, कामगारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपागारी सुट्टी द्यावी व त्यांच्या वेतानातून वेतन कपात करण्यात येवू नये तसेच सवलतीस पात्र असलेल्या आस्थापनांना ही सवलत देणे बंधनकारक आहे. 

राज्य शासनाच्या १३ जानेवारी २०२१ रोजीच्या परिपत्रकानुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी मग ते कामानिमित्त निवडणुक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही मतदानाच्या दिवशी मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. ही सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहील (उदा. खाजगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, ओद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी) तसेच अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीतकमी दोन तासाची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांना संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी यांची पुर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासाची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील, असे निर्देश दिले आहेत.

000000

 

जिल्ह्यातील 907 ग्रामपंचायतींच्या

निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

नांदेड (जिमाका) दि. 14 :- जिल्ह्यातील 907 ग्रामपंचायतीसाठी होणाऱ्या निवडणुकांची जिल्हा प्रशासनातर्फे संपुर्ण तयारी झाली असून याअनुषंगाने आवश्यक असलेल्या सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. या निवडणुका खेळीमेळीच्या आणि सौहार्दपुर्ण वातावरणात व्हाव्यात यासाठी त्यांनी आवाहन केले असून मतदारांनी अधिकाधिक संख्येने मतदान करावे असे सांगितले. 

सोळा तालुक्यातील एकूण 1 हजार 13 ग्रामपंचायतीसाठी निवडणूका कार्यक्रम जाहिर झाला होता. यापैकी 106 ग्रामपंचायती बिनविरोध आल्याने 907 ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. यासाठी एकूण 2 हजार 853 मतदार केंद्र तयार करण्यात आले असून सुमारे 11 हजार 412 शासकीय कर्मचारी व निवडणूक अधिकारी यासाठी जबाबदारी पार पाडतील. जिल्ह्यात एकूण 13 लाख 21 हजार 296 मतदार या निवडणूकीत आपला हक्क बजावणार असून यात 6 लाख 32 हजार 138 महिला मतदार तर 6 लाख 89 हजार 146 पुरुष मतदार मतदान करणार आहेत.

0000

जिल्ह्यातील 17 हजार 19 नोंदणी असलेल्या

हेल्थ वर्करना कोरोना लसीची उपलब्धता

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

जिल्ह्यात कोरोना लसीचे स्वागत

 

नांदेड (जिमाका) दि. 14 :-कोरोना प्रादुर्भावातून नवसंजीवन देणाऱ्या कोविड लसीची उपलब्धता नांदेड जिल्ह्यासाठी झाली असून लसीकरणाच्या पहिल्या फेरीत सुमारे 17 हजार 19 हेल्थ वर्करना आपण हा डोस येत्या 16 तारखेपासून देत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. आज जिल्हा परिषदेच्या औषध भांडार येथे या लसी शितकरणाच्या पेटीमध्ये अत्यंत सुरक्षितरित्या पोहचल्या. या लसी स्विकारण्यासाठी आर्वजून आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी समारंभास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. विद्या झिने, उपजिल्हाधिकारी शरद मंडलिक व इतर अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

 

आरोग्य विभागाच्या संपूर्ण टिमने कोरोनाच्या या आव्हानात्मक काळात अंत्यंत शर्थीचे प्रयत्न करुन कोरोना बाधितावर उपचार केले. समाजाचे स्वास्थ सुदृढ ठेवण्यात ज्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी योगदान दिले त्यांच्यापासून लसीकरणाची ही मोहिम टप्याटप्याने सर्व लोकापर्यंत उपलब्ध होईल असे डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले. नांदेड जिल्ह्यासाठी सुमारे 17 हजार लसी उपलब्ध झाल्या असून एका लसीच्या मात्रेमध्ये जवळपास 10 डोस उपलब्ध होऊ शकतात. हे लक्षात घेता लसीची कसलीही कमतरता जिल्ह्यासाठी कमी न पडता सहज उपलब्ध होईल यासाठी जिल्हा शासकीय यंत्रणा सिद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

00000




Wednesday, January 13, 2021

 

ग्रामपंचायत मतदानासाठी

कामगारांना भरपगारी सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 13 :- राज्य निवडणूक आयोगाने एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालाधीत मुदत संपणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील 1 हजार 13 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. या निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणूक होणार आहे त्या क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी शुक्रवार 15 जानेवारी 2021 रोजी सुट्टी जाहिर केली आहे.   

या ग्रामपंचायत क्षेत्रात मतदार असलेले शासकीय / निमशासकीय कर्मचारी, विविध आस्थापना, दुकाने आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, रिटेलर्स इ. येथील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शुक्रवार 15 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. 

तसेच शासकीय, निमशासकीय कर्मचारी, विविध आस्थापना यांना दोन तासाची सवलत देण्यात यावी. दुकाने आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना व माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, रिटेलर्स इत्यादी येथील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. याप्रकरणी संबंधित मतदार मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहिल्यास संबंधितांविरुद्ध आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, अशी अधिसुचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केली आहे.

00000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...