Sunday, September 27, 2026

वृत्त क्रमांक 

राज्यात २ लाख ५८ हजार २६१ प्राण्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण

२२ हजार ५५५ भटक्या कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया

नांदेड (जिमाका), दि. २७ : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यभरात ‘ॲनिमल बर्थ कंट्रोल’ (एबीसी) नियमांची प्रभावी अंमलबजावणी पशुसंवर्धन विभागामार्फत सुरू आहे. नागरिक व प्राण्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भटक्या कुत्र्यांचे नसबंदीकरण आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम राज्यभर राबविण्यात येत आहे.

दि. २३ सप्टेंबर २०२६ पर्यंत राज्यभरात २२ हजार ५५५ भटक्या कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यात आली असून, २ लाख ९ हजार ५१७ कुत्र्यांना तसेच ५६ हजार ९४४ इतर प्राण्यांना रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. नसबंदी व रेबीज लसीकरण या दोन्ही बाबींमध्ये पुणे जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

ॲनिमल बर्थ कंट्रोल नियमांच्या अंमलबजावणीत एकट्या पुणे जिल्ह्यात १५ हजार ६६६ श्वानांचे नसबंदीकरण करण्यात आले आहे. हे प्रमाण राज्यातील एकूण नसबंदी शस्त्रक्रियांच्या सुमारे ६८ टक्के आहे. या यादीत सोलापूर जिल्हा २ हजार ४२८ शस्त्रक्रियांसह दुसऱ्या, तर अहिल्यानगर जिल्हा १ हजार ९८५ शस्त्रक्रियांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

राज्यातील एकूण नसबंदी शस्त्रक्रियांपैकी तब्बल ८८ टक्क्यांहून अधिक वाटा पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांचा आहे.

२ लाख ५८ हजारांहून अधिक प्राण्यांचे लसीकरण

राज्यात प्राण्यांमधील रेबीजसह विविध रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी एप्रिल २०२६ पासून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत २ लाख ५८ हजार २६१ प्राण्यांचे यशस्वी लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये कुत्र्यांच्या लसीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे.

महसूल विभागाचा विचार करता, पुणे विभागाने ५९ हजार ८३५ प्राण्यांच्या लसीकरणासह राज्यात आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ नाशिक विभागात ४० हजार ३९६ प्राण्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्हानिहाय कामगिरीत नाशिक, यवतमाळ आणि पुणे जिल्ह्यांची कुत्र्यांच्या लसीकरणातील कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.

विशेष प्रशिक्षणामुळे मोहिमेला गती

ही मोहीम अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळ, पुणे आणि राज्यस्तरीय प्रशिक्षण संस्था, गोखलेनगर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी औंध, पुणे येथील ‘सुपर स्पेशालिटी व्हेटरनरी हॉस्पिटल’मध्ये उजळणी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यामध्ये राज्यातील ३१ पशुवैद्यकीय शल्यचिकित्सकांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षित डॉक्टरांनी पुढे आपापल्या जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिल्यामुळे राज्यभर मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करणे शक्य होत आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात भटक्या श्वानांच्या नियंत्रणासाठी ‘ॲनिमल बर्थ कंट्रोल’ नियमांची अंमलबजावणी नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. श्वान नसबंदी व रेबीज लसीकरणाच्या कामात पुणे जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली असून, राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही ही प्रक्रिया अधिक गतिमान करण्यात येत आहे. नागरिक आणि प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी लसीकरणाची मोहीम अधिक तीव्रतेने राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

****



वृत्त क्रमांक 

दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांकडून सावकारी कर्जाची सक्तीने वसुली करू नये

जिल्ह्यातील सर्व परवानाधारक सावकारांना निर्देश

अनुपालनाचा अहवाल सादर करण्याच्या तालुका उपनिबंधक व सहकारी संस्थेच्या सहायक निबंधकांना सूचना

नांदेड (जिमाका), दि. २७ : पर्जन्यमानातील तूट व अन्य घटकांमुळे राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, ट्रिगर-1 (प्रथम कळ) लागू झाल्यामुळे संदर्भीय शासन निर्णयानुसार या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने शासनामार्फत विविध उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत.

नांदेड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी तसेच आवश्यक उपाययोजनांबाबत पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी आज, दि. २७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात पाहणी केली. या पाहणीदरम्यान दुष्काळग्रस्त शेतकरी व शेतमजुरांकडून सावकारी कर्जाची सक्तीने वसुली केली जात असल्याची बाब निदर्शनास आली. दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीत शेतकरी आत्महत्यांसारख्या दुर्दैवी घटना घडू नयेत, यासाठी जिल्ह्यातील वैध परवानाधारक सावकारांनी सावकारी कर्जाची सक्तीने वसुली करू नये, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार सावकारांचे जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड यांनी आज तातडीने परिपत्रक काढून जिल्ह्यातील सर्व परवानाधारक सावकारांना सूचना दिल्या आहेत. दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर तसेच ग्रामीण कारागीर यांच्याकडून सावकारी कर्जाची सक्तीने वसुली करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच सावकारी कर्जाचे वाटप करताना परवान्यातील अटी व शर्ती, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ तसेच त्याअंतर्गत लागू असलेल्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील सर्व तालुका उपनिबंधक व सहायक निबंधक, सहकारी संस्था यांनाही निर्देश देण्यात आले आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व वैध परवानाधारक सावकारांना सदर सूचनांची माहिती देऊन त्याचे काटेकोरपणे पालन होत असल्याची खात्री करावी. तसेच सूचनांच्या अनुपालनाबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर व ग्रामीण कारागिरांना आर्थिक अडचणींच्या काळात दिलासा मिळावा आणि सावकारी कर्जाच्या सक्तीच्या वसुलीपासून त्यांना संरक्षण मिळावे, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

***

वृत्त क्रमांक 

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर उद्या नांदेड जिल्हा दौऱ्यावर

नांदेड (जिमाका), दि. 27 : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास तसेच सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर या सोमवार, दि. 28 सप्टेंबर 2026 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

सोमवार, दि. 28 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता मसूड, ता. कळमनुरी, जि. हिंगोली येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण करतील. सायंकाळी 5.45 वाजता नांदेड विमानतळ येथे त्यांचे आगमन होईल. सायंकाळी 6.45 वाजता नांदेड विमानतळ येथून त्या पुणेकडे प्रयाण करतील.

***


वृत्त क्रमांक 

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या नांदेड जिल्हा दौऱ्यावर

अर्धापूर येथे दुष्काळग्रस्त भागाची पाहणी; शिराढोण येथे महाआरोग्य शिबिरास उपस्थिती

नांदेड (जिमाका), दि. 27 : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवार, दि. 28 सप्टेंबर 2026 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात ते अर्धापूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. तसेच कंधार तालुक्यातील शिराढोण येथे आयोजित मोफत महाआरोग्य शिबिर कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार, दि. 28 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता हिंगोली येथून मोटारीने अर्धापूरकडे प्रयाण करतील. दुपारी 2 वाजता अर्धापूर येथे दुष्काळग्रस्त भागाचा पीक पाहणी दौरा करतील. दुपारी 2.45 वाजता अर्धापूर येथून मोटारीने नांदेड येथील शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण करून दुपारी 3 वाजता आगमन होईल.

दुपारी 3 ते 4 या वेळेत शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे नागरिकांची निवेदने स्वीकारण्यासाठी वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता शिराढोण, ता. कंधार येथील कार्यक्रमस्थळाकडे प्रयाण करतील.

सायंकाळी 4.30 वाजता शिराढोण येथील प्रेरणास्थळ, भीमाशंकर विद्यालय परिसरात लोकनेते कै. माधवराव गोविंदराव पांडागळे यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरणानिमित्त आयोजित मोफत महाआरोग्य शिबिर कार्यक्रमास उपस्थित राहतील.

सायंकाळी 5.15 वाजता कार्यक्रमस्थळावरून नांदेड विमानतळाकडे प्रयाण करून 5.45 वाजता विमानतळावर आगमन होईल. सायंकाळी 645 वाजता नांदेड विमानतळ येथून पुणेकडे प्रयाण करतील.

***

वृत्त क्रमांक 

दुष्काळाच्या संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : पालकमंत्री अतुल सावे 

• पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडून जिल्ह्यातील विविध गावांतील पीक परिस्थितीची पाहणी ;  शेतकऱ्यांना दिलासा

नांदेड (जिमाका), दि. 27 : राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, या संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांनी काळजी करू नये, शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी आज दिली.  

पालकमंत्री अतुल सावे यांनी आज हदगाव तालुक्यातील जगापूर व तामसा, भोकर तालुक्यातील हळदा व मोघाळी, उमरी तालुक्यातील सोमठाणा, नायगाव तालुक्यातील पळसगाव आणि नांदेड तालुक्यातील तुप्पा येथे भेट देऊन पीक परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी, विशेषतः महिला शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व व्यथा जाणून घेतल्या.

राज्य शासन या संकटात शेतकऱ्यांसोबत असून, त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असा धीर देत पालकमंत्री सावे यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. तसेच, सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत कर्जमाफीची प्रक्रिया सुरू राहणार असल्याचेही श्री. सावे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

जिल्ह्यातील उर्वरित दोन तालुक्यांचाही ट्रिगर-2 अंतर्गत दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून अहवाल घेतला असून, या दोन्ही तालुक्यांचाही समावेश केला जाईल, असा विश्वास पालकमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला. 

या पाहणी दौऱ्यात जगापूर व सोमठाणा येथे आमदार बाबूराव कदम कोहळीकर, हळदा व मोघाळी येथे खासदार अशोकराव चव्हाण व आमदार श्रीजया चव्हाण, पळसगाव येथे आमदार राजेश पवार, तर तुप्पा येथे आमदार आनंदराव तिडके-बोंढारकर उपस्थित होते.  

यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांच्यासह संबंधित तालुक्यांचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. या पीक परिस्थिती पाहणी दौऱ्यावेळी संबंधित गाव परिसरातील शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

***











केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...