वृत्त क्रमांक
राज्यात २ लाख ५८ हजार २६१ प्राण्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण
२२ हजार ५५५ भटक्या कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया
नांदेड (जिमाका), दि. २७ : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यभरात ‘ॲनिमल बर्थ कंट्रोल’ (एबीसी) नियमांची प्रभावी अंमलबजावणी पशुसंवर्धन विभागामार्फत सुरू आहे. नागरिक व प्राण्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भटक्या कुत्र्यांचे नसबंदीकरण आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम राज्यभर राबविण्यात येत आहे.
दि. २३ सप्टेंबर २०२६ पर्यंत राज्यभरात २२ हजार ५५५ भटक्या कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यात आली असून, २ लाख ९ हजार ५१७ कुत्र्यांना तसेच ५६ हजार ९४४ इतर प्राण्यांना रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. नसबंदी व रेबीज लसीकरण या दोन्ही बाबींमध्ये पुणे जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
ॲनिमल बर्थ कंट्रोल नियमांच्या अंमलबजावणीत एकट्या पुणे जिल्ह्यात १५ हजार ६६६ श्वानांचे नसबंदीकरण करण्यात आले आहे. हे प्रमाण राज्यातील एकूण नसबंदी शस्त्रक्रियांच्या सुमारे ६८ टक्के आहे. या यादीत सोलापूर जिल्हा २ हजार ४२८ शस्त्रक्रियांसह दुसऱ्या, तर अहिल्यानगर जिल्हा १ हजार ९८५ शस्त्रक्रियांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
राज्यातील एकूण नसबंदी शस्त्रक्रियांपैकी तब्बल ८८ टक्क्यांहून अधिक वाटा पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांचा आहे.
२ लाख ५८ हजारांहून अधिक प्राण्यांचे लसीकरण
राज्यात प्राण्यांमधील रेबीजसह विविध रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी एप्रिल २०२६ पासून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत २ लाख ५८ हजार २६१ प्राण्यांचे यशस्वी लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये कुत्र्यांच्या लसीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे.
महसूल विभागाचा विचार करता, पुणे विभागाने ५९ हजार ८३५ प्राण्यांच्या लसीकरणासह राज्यात आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ नाशिक विभागात ४० हजार ३९६ प्राण्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्हानिहाय कामगिरीत नाशिक, यवतमाळ आणि पुणे जिल्ह्यांची कुत्र्यांच्या लसीकरणातील कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.
विशेष प्रशिक्षणामुळे मोहिमेला गती
ही मोहीम अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळ, पुणे आणि राज्यस्तरीय प्रशिक्षण संस्था, गोखलेनगर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी औंध, पुणे येथील ‘सुपर स्पेशालिटी व्हेटरनरी हॉस्पिटल’मध्ये उजळणी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यामध्ये राज्यातील ३१ पशुवैद्यकीय शल्यचिकित्सकांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षित डॉक्टरांनी पुढे आपापल्या जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिल्यामुळे राज्यभर मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करणे शक्य होत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात भटक्या श्वानांच्या नियंत्रणासाठी ‘ॲनिमल बर्थ कंट्रोल’ नियमांची अंमलबजावणी नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. श्वान नसबंदी व रेबीज लसीकरणाच्या कामात पुणे जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली असून, राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही ही प्रक्रिया अधिक गतिमान करण्यात येत आहे. नागरिक आणि प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी लसीकरणाची मोहीम अधिक तीव्रतेने राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
****

No comments:
Post a Comment