Sunday, October 25, 2026

 वृत्त क्रमांक

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीसाठी सक्ती खपवून घेतली जाणार नाही-जिल्हाधिकारी

 

  • आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करा
  • नियमबाह्य वसुली करणाऱ्या वित्तीय संस्थांवर फौजदारी कारवाईचा इशारा

 

नांदेड, दि. 25 : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व अन्य कर्जदारांना दिलासा देण्यासाठी कर्जवसुली करताना स्मॉल फायनान्स, मायक्रोफायनान्स व इतर खासगी वित्तीय संस्थांनी कोणत्याही प्रकारची सक्ती, धमकी किंवा बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करू नये. तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज आयोजित बैठकीत दिले.

दुष्काळी परिस्थितीत शेतकरी व कर्जदार आर्थिक अडचणींचा सामना करीत असताना वित्तीय संस्थांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी सौजन्यपूर्ण व संवेदनशील वर्तन करावे. कर्जवसुलीसाठी मानसिक त्रास देणे, अपमानास्पद वर्तन करणे, धमकावणे, हिंसाचार करणे, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचा वापर करणे तसेच सीबील स्कोर खराब करण्याची भीती दाखवून दबाव आणणे, अशा बेकायदेशीर किंवा नियमबाह्य कृती कोणत्याही परिस्थितीत सहन केल्या जाणार नाहीत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

नियमबाह्य वसुली करणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई

स्मॉल फायनान्स, मायक्रोफायनान्स व इतर वित्तीय संस्थांकडून कर्जवसुलीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनामार्फत संबंधितांवर कायद्यानुसार कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल. यापुढे नियमबाह्य वसुलीच्या प्रकरणांत कोणतीही पूर्वसूचना देऊन कारवाईची संधी देण्याची अपेक्षा न ठेवता, लागू कायदेशीर तरतुदींनुसार तातडीने कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही बैठकीत देण्यात आला.

क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी नियमित देखरेख ठेवावी

क्षेत्रीय स्तरावर तहसीलदार, सहाय्यक निबंधक/संबंधित दुय्यम निबंधक सहकार अधिकारी यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने स्मॉल फायनान्स, मायक्रोफायनान्स व इतर वित्तीय संस्थांच्या कर्जवसुलीच्या व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवावे. अनधिकृत वसुली, कर्जदारांना धमकावणे आणि इतर संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्यांची तातडीने पडताळणी करून संबंधित कायद्यांनुसार आवश्यक कारवाई करावी. अशा प्रकरणांचा नियमित आढावा घेऊन केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.

शेतकऱ्यांचा सन्मान व कायद्याचे पालन अनिवार्य

सर्व वित्तीय संस्थांनी कर्जवसुली करताना लागू नियमांचे पालन करणे, कर्जदारांच्या सन्मानाचे व कायदेशीर हक्कांचे संरक्षण करणे आणि कोणत्याही प्रकारच्या दबावाच्या तंत्रांचा वापर टाळणे बंधनकारक आहे. दुष्काळी परिस्थितीचा गैरफायदा घेऊन शेतकरी व सर्वसामान्य कर्जदारांना त्रास देणाऱ्या संस्थांविरुद्ध प्रशासन कठोर भूमिका घेणार असून, नियमभंग करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या बैठकीत दिला.

या बैठकीस अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक शाहूराज हिरे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक बी. जी. सोनकांबळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

****** 













No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीसाठी सक्ती खपवून घेतली जाणार नाही - जिल्हाधिकारी   आरबीआयच्या मार्गदर्शक सू...