Sunday, October 25, 2026

 वृत्त क्रमांक

कापूस उत्पादकता अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यास 114 कापूस कुट्टी यंत्रांचे उद्दिष्ट

 

  • वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट व सहकारी संस्थांनी महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन


नांदेड, दि. 25: सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी केंद्र पुरस्कृत ‘कापूस उत्पादकता अभियान (कपास क्रांती)’ योजनेअंतर्गत कापूस कुट्टी यंत्र (कॉटन श्रेडर) उपलब्ध करून देण्यासाठी महाडीबीटी संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कापूस शेतीत यांत्रिकीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने या घटकाचा प्रथमच योजनेत समावेश करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यासाठी एकूण 114 यंत्रांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

या योजनेचा लाभ वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांना घेता येणार आहे. केंद्र शासनाने या अभियानाला पुढील पाच वर्षांसाठी मान्यता दिली असून, कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाच्या धर्तीवर या घटकाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना यंत्राच्या किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल 75 हजार रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान देण्यात येणार आहे. तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना यंत्राच्या किमतीच्या 40 टक्के किंवा कमाल 60 हजार रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान मिळणार आहे.

महाडीबीटी संकेतस्थळावर ‘प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक शेतकरी व पात्र संस्थांनी विलंब न करता https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin या महाडीबीटी संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावेत. कापूस उत्पादनात वाढ करणे, पीक अवशेषांचे योग्य व्यवस्थापन करणे आणि आधुनिक कृषी यंत्रांच्या वापराला प्रोत्साहन देणे या उद्देशाने ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

******

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीसाठी सक्ती खपवून घेतली जाणार नाही - जिल्हाधिकारी   आरबीआयच्या मार्गदर्शक सू...