Monday, August 3, 2026

वृत्त  

पराक्रम दिनानिमित्त राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांचे आयोजन ; 

१ ते १५ ऑगस्टदरम्यान सहभागाची संधी

पुणे, दि. २९ जुलै : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त १८ ऑगस्ट हा दिवस राज्यभर ‘पराक्रम दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने १ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच खुल्या गटातील नागरिकांसाठी राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व आणि रिल्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्य, पराक्रम, राष्ट्रनिष्ठा आणि नेतृत्वगुणांची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमासाठी अमृत संस्थेमार्फत इतिहासतज्ज्ञ व अभ्यासकांचा समावेश असलेली ‘पराक्रम दिन समिती’ स्थापन करण्यात आली आहे.

अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये तसेच इच्छुक नागरिकांनी या स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

स्पर्धांचे स्वरूप

* निबंध स्पर्धा: शालेय, महाविद्यालयीन आणि खुला गट.

* वक्तृत्व स्पर्धा: शालेय, महाविद्यालयीन आणि खुला गट.

* रिल्स स्पर्धा: महाविद्यालयीन आणि खुला गट.

महत्त्वाचे नियम

* निबंध: कमाल १,००० शब्द; मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत टाइप करून PDF स्वरूपात अपलोड करणे आवश्यक.

* वक्तृत्व: स्वतःचे कमाल ७ मिनिटांचे स्पष्ट आवाजातील मूळ व्हिडिओ सादर करावेत. व्हिडिओमध्ये व्हिज्युअल इफेक्ट्स, साऊंड इफेक्ट्स किंवा AI-निर्मित प्रतिमांचा वापर करता येणार नाही.

* रिल्स: २ ते ३ मिनिटांची रील्स/शॉर्ट्स तयार करावी. स्वतःच्या आवाजात व स्वतःवर चित्रीत केलेली असावी. विषयानुरूप आवश्यक त्या इमेज, साऊंड किंवा AI चा वापर मिक्सिंगसाठी करता येईल.

स्पर्धेचे विषय

१८ व्या शतकातील हिंदवी साम्राज्य विस्तारक थोरले बाजीराव पेशवे.

अपराजित योद्धा थोरले बाजीराव पेशवे.

थोरल्या बाजीरावांचे संघटन कौशल्य.

थोरल्या बाजीरावांची युद्धनीती.

थोरल्या बाजीरावांची स्वामीनिष्ठा.

थोरल्या बाजीरावांची दिल्ली मोहीम.

बुंदेलखंड व छत्रसालाचे रक्षणकर्ते थोरले बाजीराव पेशवे.

थोरल्या बाजीरावांचा जगप्रसिद्ध पालखेड विजय.

स्पर्धेची सविस्तर माहिती, नियमावली, संदर्भ पुस्तके, ई-बुक तसेच ऑनलाइन नोंदणीची सुविधा https://parakramdin.mahaamrut.org.in/ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवेशिका स्वीकारण्याचा कालावधी १ ते १५ ऑगस्ट २०२६ असा आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे.

000

No comments:

Post a Comment

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...