Monday, August 3, 2026

 वृत्त क्रमांक 

नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप

१२२ शिबिरांमध्ये १३,६१९ नागरिकांची आरोग्य तपासणी ; ३,१२१ आयुष्मान भारत व आभा कार्ड नोंदणी

नांदेड दि. 3 ऑगस्ट :- महाराष्ट्र शासनाच्या जनकल्याणकारी उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या समन्वयाने जिल्हाभरात आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप झाला. १ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत ग्रामीण तसेच शहरी भागात एकूण १२२ शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये १३ हजार ६१९ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तर ३ हजार १२१ आयुष्मान भारत व आभा कार्ड नोंदणी करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मंत्रालय, मुंबई चे कक्षप्रमुख तथा विशेष कार्य अधिकारी रामेश्वर नाईक  यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राज्यभर राबविण्यात आला.

नांदेड जिल्ह्यात हा उपक्रम जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, आयुक्त, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका महेशकुमार डोईफोडे तसेच निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या राबविण्यात आला.

शिबिरांच्या प्रभावी नियोजन व अंमलबजावणीसाठी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयकुमार कापसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय परके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका डॉ. हनमंत रीठ्ठे यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले.

१३,६१९ नागरिकांची आरोग्य तपासणी

या १२२ शिबिरांमध्ये ४,२१० पुरुष, ६,७२२ महिला, १,०६९ पुरुष बालक आणि १,६१८ महिला बालक, अशा एकूण १३,६१९ नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. याशिवाय ३,१२१ आयुष्मान भारत व आभा कार्ड नोंदणी करण्यात आली.

शिबिरांमध्ये नागरिकांची विविध आजारांसाठी आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला तसेच रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन व इतर आवश्यक निदान चाचण्या करण्यात आल्या. गरजू रुग्णांना पुढील उपचारासाठी योग्य रुग्णालयांमध्ये संदर्भित करण्यात आले. तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि इतर शासकीय आरोग्य योजनांतर्गत उपलब्ध उपचार सुविधांची माहिती नागरिकांना देण्यात आली.

विविध यंत्रणांचा प्रभावी समन्वय

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत मुंडे, समाजसेवा अधीक्षक गजानन वानखेडे आणि समन्वयक संभाजी लोंढे यांनी जिल्ह्यातील शासकीय व संलग्नित खासगी रुग्णालये, आरोग्य विभाग तसेच संबंधित यंत्रणांशी सातत्याने समन्वय साधून शिबिरांचे नियोजन, आयोजन व प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित केली.

उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीत योगदान

या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीत डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका आरोग्य विभाग, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्रे, मुख्यमंत्री सहाय्यता निधीशी संलग्नित खासगी रुग्णालये, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेशी संलग्नित रुग्णालये, तसेच वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका व संबंधित विभागांनी मोलाचे योगदान दिले.

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांना जिल्ह्यातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेषतः दुर्गम व गरजू नागरिकांना त्यांच्या परिसरातच आरोग्य तपासणी, निदान, मार्गदर्शन आणि पुढील उपचारासाठी संदर्भ सेवा उपलब्ध झाल्याने हा उपक्रम लोकाभिमुख व परिणामकारक ठरला.

भविष्यातही जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या समन्वयातून नागरिकांना गुणवत्तापूर्ण, सुलभ व वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अशाच लोकाभिमुख आरोग्य उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

00000




No comments:

Post a Comment

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...