वृत्त क्रमांक
महिला बचत गटांना सुवर्णसंधीः नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातर्गत
'कृषी औजारे बँक' योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
नांदेड दि. 20 ऑगस्ट :- महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत, जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येत असलेल्या 'नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (PoCRA) टप्पा-२' अंतर्गत गावस्तरावरील शेती कामांच्या यांत्रिकीकरणाला गती देण्यासाठी 'कृषी औजारे बँक' ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेऊन गावातील महिला बचत गटांनी स्वतःचे उत्पन्न वाढवावे आणि शेतकऱ्यांना माफक दरात सेवा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना महागडी कृषी यंत्रसामग्री खरेदी करणे शक्य नसते. अशा शेतकऱ्यांना गावस्तरावरच पेरणीपासून काढणीपर्यंतची यंत्रे भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देणे, शेतीकामातील महिलांचे कष्ट कमी करणे आणि हवामान बदलाच्या परिस्थितीत शेती अधिक फायदेशीर करणे ही या योजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
पात्रता आणि अटी
प्रकल्प गावातील उमेद (MSRLM) किंवा माविम (MAVIM) पुरस्कृत महिला बचत गट आणि गाव संघ या योजनेसाठी पात्र आहेत(एक वर्ष पूर्ण असलेला व एका वर्षाचे सनदी लेखापाल यांचेद्वारे लेखा परीक्षण झालेले असावे ज्यामध्ये प्रकल्प रक्कमेच्या ५% उलाढाल व ५% भागभांडवल हवे). बचत गटात वेगवेगळ्या कुटुंबातील किमान १० सदस्य असणे आवश्यक आहे. एका गावातून एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास ऑनलाईन लॉटरी पद्धतीने निवड केली जाईल. ज्या गटांनी यापूर्वी इतर कोणत्याही योजनेतून कृषी औजारे बँकेचा लाभ घेतला आहे, ते या योजनेस पात्र राहणार नाहीत.
अनुदानाचे स्वरूप
या योजनेअंतर्गत कृषी औजारे बँकेसाठी प्रकल्प मूल्याच्या ६० टक्के अनुदान देय आहे('बॅक एंडेड सबसिडी'). अनुदानाची कमाल मर्यादा २४ लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. ३. २० लाख रुपयांपेक्षा जास्त प्रकल्प मूल्य असल्यास बँक कर्ज घेणे बंधनकारक आहे.
निवडता येणारी यंत्रे
बचत गट त्यांच्या गावातील पीक पद्धतीनुसार ट्रॅक्टर, बीबीएफ (BBF) यंत्र, बेड मेकर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र यांसारखी हवामान अनुकूल तंत्रज्ञानास प्रोत्साहन देणारी औजारे निवडूशकतात. ट्रॅक्टर खरेदी करावयाचा असल्यास त्यासोबत किमान तीन ट्रॅक्टरचलित औजारे खरेदी करणे आवश्यक आहे(टेस्ट रीपोर्ट असणारे).
अर्जाची प्रक्रिया
इच्छुक महिला बचत गटांनी 'FPO-DBT-Portal' या वेब प्लॅटफॉर्म किंवा मोबाईल अॅप्लिकेशनवरून ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे आणि बॅक विवरणपत्र जोडणे अनिवार्य आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31/8/२०२६ असून अधिक माहितीकरिता आमचे संकेतस्थळ www.ndksp. mahapocra.gov.in ला भेट द्या, असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment