वृत्त क्रमांक
मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) : कामात मागे असलेल्या BLO यांच्या कामाची जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी ; कामात गती आणण्याचे निर्देश
नांदेड दि. ८ जुलै :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर सुरू असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमांतर्गत 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत व त्रुटीमुक्त करण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक पात्र नागरिकाची मतदार म्हणून नोंद सुनिश्चित करणे, मृत अथवा स्थलांतरित मतदारांची माहिती अद्ययावत करणे तसेच मतदारांच्या तपशीलांचे डिजिटायझेशन करण्यात येत आहे.
याच अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी उस्मानशाही मिल, सिडको परिसरातील प्रभाग क्रमांक 6 मधील कामात अपेक्षित प्रगती नसलेल्या 20 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व त्यांच्या पर्यवेक्षकांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी पुढील दोन दिवसांत कामात लक्षणीय प्रगती करण्याचे निर्देश देत, कामात निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.
बैठकीनंतर जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष BLO यांच्या कामाची पाहणी केली. त्यांनी मतदार गणना फॉर्म स्वतः भरून घेण्यास सांगितला तसेच मोबाईल ॲपद्वारे त्याचे तत्काळ डिजिटायझेशन करून संपूर्ण प्रक्रियेची प्रत्यक्ष पडताळणी केली. यावेळी त्यांनी भविष्यात कोणत्याही मतदान केंद्र क्षेत्राला अचानक भेट देऊन BLO प्रत्यक्ष काम कसे करत आहेत, याची तपासणी करण्यात येईल. भेटीदरम्यान संबंधित BLO किंवा त्यांचे सहाय्यक अनुपस्थित आढळल्यास अथवा कामात समाधानकारक प्रगती दिसून न आल्यास नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
या पाहणीवेळी उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ) संजय वारकड, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी श्री. स्वामी व श्री. सानप तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले की, मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) हा केवळ प्रशासकीय उपक्रम नसून लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. अचूक, अद्ययावत व विश्वासार्ह मतदार यादी ही मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेचा भक्कम पाया आहे. त्यामुळे सर्व पात्र नागरिकांनी आवश्यक माहिती वेळेत उपलब्ध करून देत या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा आणि निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
0000
No comments:
Post a Comment