Wednesday, July 29, 2026

वृत्त क्रमांक 

रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानाचा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते शुभारंभ

वाहतूक नियमांचे पालन करून अपघातमुक्त समाज घडविण्याचे आवाहन

नांदेड, दि. 28 जुलै :- रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त नांदेड जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते महात्मा फुले प्राथमिक व हायस्कूल, नांदेड येथे करण्यात आला. ‘सुरक्षित राहा–सर्वांसाठी रस्ता सुरक्षा’ या संकल्पनेवर आधारित अभियानाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविण्याच्या प्रकारांना आळा घालणे हा आहे.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी 18 वर्षांखालील मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये, अन्यथा संबंधित पालकांवर कायद्यानुसार कारवाई होऊ शकते, असे सांगितले. रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे, दुचाकीस्वारांनी हेल्मेट व चारचाकी वाहनचालकांनी सीटबेल्टचा वापर करणे, वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर टाळणे, मद्यप्राशन करून वाहन न चालविणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक न करणे, चुकीच्या दिशेने वाहन न चालविणे तसेच वाहतूक सिग्नलचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

नारायणा स्कूल येथे आयोजित कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी अजय शिंदे यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा नियमांचे महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी शक्यतो सायकलचा वापर करावा आणि 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर वाहतूक नियमांची माहिती घेऊनच वाहन चालवावे, असे आवाहन त्यांनी केले.

दि. 21 ते 28 जुलै या कालावधीत जिल्ह्यातील 28 शाळांमध्ये रिक्षाचालकांसाठी रस्ता सुरक्षा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणातून सुरक्षित वाहनचालना, वाहतूक नियमांचे पालन आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमास वाहतूक पोलीस उपनिरीक्षक श्री. मुंडे, अजयकुमार साखळे, सरदार जसपालसिंग, सेफर इंडियन रोड्सचे सरचिटणीस श्रीमती अनमोल पंडीत, सदस्य महेश तिवारी, वरुण तिवारी, मीतल तिवारी तसेच शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वाहतूक पोलीस विभाग व सेफर इंडियन रोड्स अँटी करप्शन टीमचे घनश्याम ओझा यांनी सहकार्य केले.

0000












No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   निश्चित कालमर्यादेत महामार्गालगतची अतिक्रमणे हटविण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य...