Wednesday, July 29, 2026

वृत्त क्रमांक 

कापूस उत्पादकता अभियान (कपास क्रांती) अंतर्गत कॉटन श्रेडरसाठी महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, दि. २९ जुलै :- केंद्र पुरस्कृत ‘कापूस उत्पादकता अभियान (कपास क्रांती)’ अंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी कॉटन श्रेडर या घटकासाठी नांदेड जिल्ह्यास 114 यंत्रांचा तालुकानिहाय लक्षांक प्राप्त झाला असून, इच्छुक वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

कापूस शेतीत यांत्रिकीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने या योजनेत प्रथमच कॉटन श्रेडर या घटकाचा समावेश करण्यात आला आहे. केंद्र शासनाने या योजनेस पुढील पाच वर्षांसाठी मान्यता दिली असून, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान (SMAM) च्या धर्तीवर या घटकाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांना लाभ मिळणार आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना यंत्राच्या किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल 75 हजार रुपये, तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना 40 टक्के किंवा कमाल 60 हजार रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे.

लाभार्थ्यांची निवड ‘प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य’ (First Come, First Serve - FCFS) या तत्त्वावर करण्यात येणार असल्याने इच्छुकांनी विलंब न करता https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावेत.

कापूस उत्पादनात वाढ, पीक अवशेषांचे प्रभावी व्यवस्थापन आणि आधुनिक यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा व अधिक उत्पादनासाठी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्रमांक   पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 कर्जमाफीस पात्र रक्कमेबाबत जिल्हा प्रशासनाचे स्पष्टीकरण ...