Monday, June 22, 2026

वृत्त क्रमांक 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २० जून रोजी पी.एम. किसानच्या २३ व्या हप्त्याअंतर्गत

जिल्ह्यातील ३ लाख ८२ हजार ६६० लाभार्थ्यांना ७६.५३ कोटी रुपये वितरीत 

नांदेड दि. 22 जून:- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा माहे एप्रिल २०२६ ते जुलै २०२६ कालावधीतील २३ वा हप्ता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते २० जून, २०२६ रोजी पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्हयातील तारकेश्वर येथून वितरीत करण्यात आला. 

केंद्र शासनाने शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजना माहे फेब्रुवारी, २०१९ पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये) 2 हजार रुपये प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी 6 हजार रुपये त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे. पी. एम. किसान योजने अंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना यापुर्वी एकूण २२ हप्त्यांमध्ये सुमारे १८०७.४१ कोटी रुपयांचा लाभ जमा झालेला आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजनेच्या लाभासाठी केंद्र शासनाकडून लाभार्थाने भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत करणे, बैंक खाते आधार संलग्न करणे, व ई-केवायसी प्रमाणिकरण करणे या बाबीबंधनकारक केलेल्या आहेत. जिल्ह्यातील सद्यस्थितीत या तीनही बाबीची पूर्तता केलेल्या एकूण ३ लाख ८२ हजार ६६० शेतकरी कुटुंबांना २० जून, २०२६ रोजी सुमारे रक्कम रुपये ७६.५३ कोटी रुपये इतक्या रक्कमेचा लाभ त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा झाला आहे. अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.  

00000

No comments:

Post a Comment

  मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ प्रारूप मतदार यादीत आजच आपले नाव तपासा मतदार मदत क्रमांक १८०० २२ १९५० वर संपर्क करा #मतदारय...