Tuesday, February 22, 2022

 पहिल्या राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन 

 

·  माझे मत माझे भविष्य-एका मताचे सामर्थ्य या संकल्पनेवर राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- भारत निवडणूक आयोगाने यावर्षी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त  माझे मत माझे भविष्य-एका मताचे सामर्थ्य या मध्यवर्ती संकल्पनेवर राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत सहभागी घेण्यासाठी स्पर्धकांनी त्यांच्या प्रवेशिका तपशीलासह मंगळवार 15 मार्च 2022 पर्यंत voter-contest@eci.gov.in या ई-मेलवर पाठवाव्यात.  राष्‍ट्रीय मतदार जागृतीच्‍या अनुषंगाने आयोजित करण्‍यात आलेल्या या विविध स्‍पर्धेत जिल्ह्यातील अधिकाधिक शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, महिला, नागरिक व मतदारांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

सर्जनशील माध्यमातून प्रत्येक मताचे महत्त्व पटवून देणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे. स्विप मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग या कार्यक्रमातर्गंत ही स्पर्धा आयोजित केली आहे. सामान्य लोकांची प्रतिभा आणि सर्जनशीलतेचा वापर करून त्यांच्या सक्रिय सहभागातून निवडणूक आयोग लोकशाही बळकट करत आहे. या स्पर्धेत सर्व वयोगटांना सहभागी होता येणार आहे. सामुहिक सहभागातून लोकशाहीतील प्रत्येक मताचे महत्व स्पष्ट करण्याचा मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित कल्पना व मजकूरांचा गौरव करणे हा उद्देश या स्पर्धेचा आहे. 

 

स्पर्धकांनी तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे, नियम आणि अटी यांच्या माहितीसाठी स्पर्धेचे संकेतस्थळ https://ecisveep.nic.in/contest/ येथे भेट द्यावी. स्पर्धकांनी त्यांच्या प्रवेशिका सर्व तपशिलांसह voter-contest@eci.gov.in या ई-मेलवर पाठवाव्यात. ई-मेल करतांना स्पर्धेचे नाव <स्पर्धा> आणि <श्रेणी> याचा विषयात उल्लेख करावा. प्रश्नमंजूषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी स्पर्धा संकेतस्थळावर नोंदणी करावी. या स्पर्धेची मध्यवर्ती संकल्पना माझे मत माझे भविष्य-एका मताचे सामर्थ्य तर प्रश्नमंजूषा, घोषवाक्य, गीत, व्हिडिओ मेकिंग स्पर्धा आणि भित्तिचित्र स्पर्धा या 5 प्रकारच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा घेण्यात येत आहेत.

 

प्रश्न मंजूषा स्पर्धा- ही स्पर्धा जिज्ञासू मनांना सहभागी करून त्यांची निवडणुकीबाबतची जागरूकता पातळी जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. सुलभ, मध्यम आणि अवघड हे स्पर्धेतील तीन स्तर असतील. स्पर्धेच्या तीनही स्तरांची पूर्तता केल्यास सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

 

घोषवाक्य स्पर्धा- या स्पर्धेत सहभागी व्हा आणि दिलेल्या मध्यवर्ती संकल्पनेवर तुमचे शब्द गुंफून इतरांना प्रेरणा देण्यासाठी आकर्षक घोषवाक्य तयार करणे, हे या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे.

 

गीत स्पर्धा- शास्त्रीय, समकालीन आणि रॅप इत्यादीसह कोणत्याही स्वरूपातील गीतांच्या माध्यमातून स्पर्धकाच्या सर्जनशील मनाची प्रतिभा आणि क्षमता जोखणे हे या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे. सहभागी स्पर्धकांना दिलेल्या मध्यवर्ती संकल्पनेवर मूळ गीतरचना तयार आणि शेअर करू शकतात. कलाकार आणि गायक त्यांच्या आवडीचे कोणतेही वाद्य वापरू शकतात. गाण्याचा कालावधी तीन मिनिटांपेक्षा जास्त नसावा.

 

व्हिडिओ मेकिंग स्पर्धा- व्हिडिओ मेकिंग स्पर्धेतून कॅमेराप्रेमींना भारतीय निवडणुकांचा उत्सव आणि त्यातील विविधता साजरी करणारा व्हिडिओ (चित्रफीत) तयार करण्याची संधी मिळते. स्पर्धेच्या मुख्य विषयाव्यतिरिक्त, खालील विषयांवर देखील सहभागी स्पर्धक व्हिडिओ बनवू शकतात-: माहितीपूर्ण आणि नैतिक मतदानाचे महत्त्व (प्रलोभनमुक्त मतदान); मतदानाची शक्ती, महिला, दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि नवीन मतदारांसाठी मतदानाचे महत्त्व प्रदर्शित करणे. सहभागी स्पर्धकांना वरीलपैकी कोणत्याही एका विषयावर केवळ एक मिनिट कालावधीचा व्हिडिओ करायचा आहे.

 

व्हिडिओ, गाणे आणि घोषवाक्य स्पर्धेसाठी प्रवेशिका भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूची नुसार कोणत्याही अधिकृत भाषेत दिल्या जाऊ शकतात.  

 

भित्तिचित्र स्पर्धा: वरील मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आणि विचारप्रवर्तक अशी भित्तिचित्रे तयार करू शकणाऱ्या चित्रकार आणि कलाप्रेमींसाठी ही स्पर्धा आहे. सहभागी स्पर्धक डिजिटल भित्तीचित्र, आरेखन किंवा रंगवलेली भित्तिचित्रे पाठवू शकतात. भित्तिचित्र यांचे रेझोल्यूशन (रंगकणांचे पृथक्करण) चांगले असले पाहिजे.

 

संस्थात्मक, व्यावसायिक, हौशी या स्पर्धेच्या श्रेणी आहेत. संस्थात्मक श्रेणी- शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे अशा केंद्र किंवा राज्य सरकारच्या संबंधित कायद्यांतर्गत नोंदणीकृत संस्थांना संस्थात्मक श्रेणीमध्ये भाग घेता येईल. व्यावसायिक श्रेणी- ज्या व्यक्तीचा उदरनिर्वाहाचा मुख्य स्त्रोत गायन/व्हिडिओ मेकिंग/भित्तिचित्र असा आहे किंवा गायन/व्हिडिओ मेकिंग/भित्तिचित्र याच्याशी संबंधित एखादे काम हा जिच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे अशी व्यक्ती व्यावसायिक म्हणून गणली जाईल. निवड झाल्यास, सहभागी स्पर्धकाला व्यावसायिक श्रेणी सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्र सादर करावे लागेल. हौशी श्रेणी- हौशी: जी व्यक्ती गायन/व्हिडिओ मेकिंग/भित्तिचित्र हा छंद म्हणून, सृजनाची आस म्हणून करते, परंतु तिच्या/ त्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत इतर कोणत्या तरी माध्यमांतून असतो तिला 'हौशी' म्हणून गणण्यात येईल.

 

गीत स्पर्धा, व्हिडिओ मेकिंग स्पर्धा आणि भित्तिचित्रे स्पर्धांचे तीन श्रेणींमध्ये वर्गीकरण केले असून संस्थात्मक, व्यावसायिक आणि हौशी या श्रेणीचा समावेश आहे. प्रत्येक श्रेणीतील पहिल्या तीन विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके दिली जातील. या व्यतिरिक्त, प्रत्येक श्रेणीला विशेष उल्लेखनीय रोख पारितोषिके दिली जातील. संस्थात्मक श्रेणीमध्ये 4 विशेष उल्लेखनीय तर व्यावसायिक आणि हौशी श्रेणीसाठी 3 विशेष उल्लेखनीय पारितोषिके दिली जातील.

 

गीत स्पर्धा

संस्थात्मक श्रेणीत- पहिले बक्षिस 1 लाख रुपये, दुसरे बक्षिस 50 हजार रुपये, तिसरे बक्षिस 30 हजार तर विशेष उल्लेखनीय 15 हजार रुपये. व्यावसायिक श्रेणीत- पहिले बक्षिस 50 हजार रुपये, दुसरे बक्षिस 30 हजार रुपये, तिसरे बक्षिस 20 हजार तर विशेष उल्लेखनीय 10 हजार रुपये. हौशी श्रेणीत- पहिले बक्षिस 20 हजार रुपये, दुसरे बक्षिस 10 हजार रुपये, तिसरे बक्षिस 7 हजार 500 तर विशेष उल्लेखनीय बक्षिस 3 हजार रुपये असेल.

 

व्हिडीओ मेकिंग स्पर्धा

संस्थात्मक श्रेणीत- पहिले बक्षिस 2 लाख रुपये, दुसरे बक्षिस 1 लाख रुपये, तिसरे बक्षिस 75 हजार तर विशेष उल्लेखनीय 30 हजार रुपये. व्यावसायिक श्रेणीत- पहिले बक्षिस 50 हजार रुपये, दुसरे बक्षिस 30 हजार रुपये, तिसरे बक्षिस 20 हजार तर विशेष उल्लेखनीय 10 हजार रुपये. हौशी श्रेणीत- पहिले बक्षिस 30 हजार रुपये, दुसरे बक्षिस 20 हजार रुपये, तिसरे बक्षिस 10 हजार तर विशेष उल्लेखनीय बक्षीस 5 हजार रुपये असेल.

 

भित्तिचित्र स्पर्धा

संस्थात्मक श्रेणीत- पहिले बक्षिस 50 हजार रुपये, दुसरे बक्षिस 30 हजार रुपये, तिसरे बक्षिस 20 हजार तर विशेष उल्लेखनीय 10 हजार रुपये. व्यावसायिक श्रेणीत- पहिले बक्षिस 30 हजार रुपये, दुसरे बक्षिस 20 हजार रुपये, तिसरे बक्षिस 10 हजार तर विशेष उल्लेखनीय 5 हजार रुपये. हौशी श्रेणीत- पहिले बक्षिस 20 हजार रुपये, दुसरे बक्षिस 10 हजार रुपये, तिसरे बक्षिस 7 हजार 500 रुपये तर विशेष उल्लेखनीय बक्षिस 3 हजार रुपये असे बक्षिसाचे स्वरुप आहे.

 

घोषवाक्य स्पर्धा

प्रथम पारितोषिक 20 हजार रुपये,  द्वितीय पारितोषिक 10 हजार रुपये,  तृतीय पारितोषिक 7 हजार 500 आहे. तर सहभागी होणाऱ्या स्पर्धाकांपैकी 50 स्पर्धकांना प्रत्येकी 2 हजार रुपये विशेष उल्लेखनीय पुरस्कार म्हणून देण्यात येणार आहे.

 

प्रश्नमंजूषा स्पर्धा

विजेत्यांना भारतीय निवडणूक आयोगाचे नाव असलेल्या आकर्षक वस्तू देण्यात येतील. तसेच तिसरी पातळी पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र देण्यात येतील.

 

विविध श्रेणींमधील प्रवेशिका या भारत निवडणूक आयोगाद्वारे गठित परीक्षण मंडळाकडे पाठवण्यात येतील आणि विजयी प्रवेशिकांची निवड करण्यात येईल. पूनर्मूल्यांकनाच्या दाव्यांशी संबंधित विनंत्यांचा विचार केला जाणार नाही, असेही प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

 नांदेड जिल्ह्यातील लोकसभा पोटनिवडणुकीत विधानसभा निहाय झालेल्या मतदानाची एकत्रित अंतिम टक्केवारी मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज. जिल्हाधिकारी अभिज...