Saturday, December 15, 2018


माहूरगड येथे श्री दत्तजयंती उत्सवानिमित्त
पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान

नांदेड, दि. 15 :- माहूरगड येथे श्री दत्तजयंती उत्सव मंगळवार 18 डिसेंबर ते रविवार 23 डिसेंबर 2018 या कालावधीमध्ये साजरा होत आहे. या उत्सवासाठी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक व इतर राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे या कालावधीत मिरवणुका व इतर कार्यक्रम शांततेत पार पडावे, त्यामध्ये कोणतीही बाधा येऊ नये व शांतता रहावी यासाठी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये 18 ते 23 डिसेंबर 2018 च्या मध्यरात्री पर्यंत माहूर उपविभागीय पोलीस अधीकारी ए. डी. जहारवाल व माहूर पोलीस स्टेशचे स्वाधीन अधिकारी पोलीस निरीक्षक श्री टाक यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 मधील पोट कलमे अ ते फ प्रमाणे पुढील अधिकार केले आहेत.
प्रदान करण्यात आलेले अधिकार पुढीलप्रमाणे - रस्त्यावरील व रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे व कोणत्या रितीने वागावे याविषयी निर्देश देणे. अशा कोणत्याही मिरवणुका या कोणत्या मार्गाने, कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करणे. सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी व पुजा-अर्चेच्या प्रार्थना स्थळाच्या सर्व जागेच्या आसपास पुजा-अर्चेच्या वेळी कोणत्याही रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागा येथे गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होऊ देणे यासाठी योग्य ते आदेश देणे. सर्व रस्त्यावर किंवा रस्त्यामध्ये घाटात किंवा घाटावर, सर्व धक्क्यावर किंवा धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये, जत्रा, देवालय आणि सार्वजनिक स्थळी, लोकांच्या जाण्या-येण्याच्या जागेमध्ये सुव्यवस्था राखणेसाठी योग्य ते आदेश देणे. तसेच सार्वजनिक ठिकाणी अथवा सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी ध्वनिक्षेपकांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी व सूचना देण्यासंबंधी योग्य ते आदेश देणे. मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33, 35 ते 40, 42, 43, 45 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधिन असलेले व त्यास पुष्टी देणारे सुव्यवस्था राहणेकामी योग्य आदेश देण्याबाबत.
हा आदेश लागू असेपर्यंत माहूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. जहारवाल व पोलीस निरीक्षक श्री. टाक यांच्याकडून रहदारीचे नियम व मार्गाबाबत सूचना कार्यक्रमाची तारीख, वेळ, जाहीरसभा, मोर्चे, मिरवणूक, निदर्शने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधीत पोलीस फौजदार किंवा त्याच्या वरिष्ठांकडून तारीख व वेळ सभेची जागा, मिरवणुकीचा, मोर्चाचा मार्ग व त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा, पूर्व परवानगी शिवाय आयोजित करु नये. संबंधीत अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे. परवानगी दिलेल्या जाहीरसभा, मिरवणुका, पदयात्रा यात समायोजित घोषणा सोडून ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बाधा होऊ शकते अशा घोषणा देऊ नये. हा आदेश लग्नाच्या ठिकाणी, प्रेत यात्रेस लागू नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई कायदा कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल, असेही आदेश पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी जारी केले आहेत.
000000


No comments:

Post a Comment

  मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ प्रारूप मतदार यादीत आजच आपले नाव तपासा मतदार मदत क्रमांक १८०० २२ १९५० वर संपर्क करा #मतदारय...