Saturday, December 15, 2018


मतदार यादीत समावेश, कमी करण्यात आलेल्या
मतदारांची यादी मतदान केंद्रावर आज प्रसिद्ध होणार

              नांदेड, दि. 15 :- मतदार यादीमध्ये समावेश करण्यात आलेल्या मतदाराची यादी तसेच मतदार यादीमधून नाव कमी करण्यात आलेल्या मतदाराची यादी ही संबंधीत मतदान केंद्रावर रविवार 16 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 9 वा. बीएलओ प्रसिद्ध करणार आहेत. या दिवशी विविध राजकीय पक्षांनी नियुक्त केलेले बीएलए उपस्थित राहणार आहेत.
              1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्याचे पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नांदेड तालुक्यातील नांदेड दक्षिण व नांदेड उत्तर या विधानसभा मतदार संघात फॉर्म नंबर 6 द्वारे नवीन 32 हजार 742 मतदारांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. तर मतदार यादीमधून फॉर्म नंबर 7 द्वारे 2 हजार 151 मतदार यांचे नाव मयत, दुबार, स्थलांतरीत झाल्यामुळे कमी करण्यात आले आहेत. तर फॉर्म नंबर 8 द्वारे 9 हजार 512 मतदाराचे नावात दुरुस्ती, छायाचित्र अद्यावत करण्यात आली आहेत.
                जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली नांदेड तालुक्यातील मतदार नोंदणी अधिकारी प्रदिप कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली मतदार यादी अद्यावत करण्याचे कामकाज चालू असून लोकसभा निवडणूकी संदर्भात अंतिम मतदार यादी 11 जानेवारी 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निवडणूक कामी नांदेड तालुक्यातील सरकारी कार्यालये, खाजगी माध्यमिक शाळा, महाविद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधील आतापर्यंत 4 हजार 500 अधिकारी, कर्मचारी यांची माहिती तहसिल मधील निवडणूक प्रशासनाने जमा केली आहे. ती जमा करण्याची पुढे काम चालू आाहे.
              दरम्यान ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट याबाबत तालुक्यात निवडणूक प्रशासन प्रचार व प्रसिद्धी 21 डिसेंबर पासून शहरातील विविध विभागात तसेच गावनिहाय करणार आहे. त्यासाठी चार वाहनाद्वारे गावा-गावात, मतदान केंद्र, आठवडी बाजार चौक, ग्रामपंचायत, बसस्टँड, रेल्वेस्टेशन अशा विविध स्थळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामध्ये नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, बीएलओ, कोतवाल यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत अशी माहिती तहसिलदार किरण अंबेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...