Saturday, May 19, 2018


संभाव्य आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी
सतर्कता, समन्वय, तत्परतेने प्रयत्न करावेत
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 19 :-  आपत्ती व्यवस्थापन, नियंत्रणासाठी संघटीत आणि वेळेत प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे संभाव्य आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी अधिक सतर्कता, समन्वय व तत्परतेने प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिल्या.  
मान्‍सून 2018 च्‍या अनुषंगाने पुर्वतयारी आढावा बैठक डॉ. शंकरराव चव्‍हाण नियोजन भवन येथे जिल्‍हाधिकारी डोंगरे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आयोजित करण्‍यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त लहूराज माळी, अप्पर जिल्‍हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्‍हाधिकारी जयराज कारभारी, कृषि, परिवहन, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, महानगरपालिका, पोलीस, आरोग्य आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पावसाळयात उद्भवणाऱ्या विविध आपत्तींना तोंड देण्‍यासाठी आणि सावधगिरीच्‍या उपाययोजनांचा आढावा संबंधीत विभागाकडून घेऊन जिल्‍हाधिकारी श्री डोंगरे म्हणाले, पाझर तलाव, नद्या आणि पाण्‍याच्‍या साठवणुकीचे मोठे, मध्‍यम आणि लघु प्रकल्‍प पावसाळयात फुटु नये अथवा ओव्‍हरफ्लो होऊन गावांना धोका होऊ नये यादृष्‍टीने उपाययोजना कराव्यात. पावसाळयात उत्‍पन्‍न होणाऱ्या साथीच्‍या रोगराईंना वेळीच थांबविण्‍यासाठी प्राथमिक आरोग्‍य केंद्रात मुबलकपणे औषधी आणि ब्लिचिंग पावडरची साठवणुक सुरक्षितपणे ठेवावी व त्‍याचा योग्‍य उपयोग व्‍हावा. महानगरपालिका व नगरपरिषदांनी नालेसफाई तसेच अतिक्रमण दूर करावेत. सर्व प्रमुख यंत्रणांनी 1 जून ते 30 सप्‍टेंबर या मान्‍सून कालावधीत नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवावीत. हवाई मार्गाने शोध व बचाव कार्य करण्‍याची आवश्‍यकता भासल्‍यास जिल्ह्यातील स्‍थायी व अस्‍थायी हेलिपॅडची विस्‍तृत माहिती स्‍थानिक पातळीवरुन तहसीलदार यांनी 25 मे पुर्वी उपलब्‍ध करुन त्‍यांचे अक्षांस व रेखांश दयावेत. पाटबंधारे विभागाने धरणनिहाय समन्‍वय अधिकारी नेमणूक करावीत. तहसीलस्‍तरावर मान्‍सुन पुर्व तयारी आढावा बैठक वेळीच आयोजित करुन पुर परिस्थिती प्रतिबंधक कामे मान्‍सून पुर्वी पुर्ण करावीत आणि स्‍थानिक शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे चालू मोबाईल संपर्क अदयावत करावीत. दरवर्षी होणा-या विजपातामुळे होणारे मृत्‍यु कमी करण्‍यासाठी जनजागृती आणि बचाव कार्याचे रंगीत प्रशिक्षण पूर्ण करण्‍याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री डोंगरे यांनी यावेळी दिले.
प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाबाबत व केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनासंबंधी केलेल्या उपाय योजनांची माहिती दिली.                
000000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...