Saturday, May 19, 2018


उभारी उपक्रमांतर्गत कौशल्य विकास व उद्योजकता रोजगाराभिमुख प्रशिक्षण
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांनी
तांत्रिक प्रशिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे रहावे
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 19 :- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांनी प्रशिक्षण संस्थेत जास्तीत जास्त सहभाग नोंदवुन तांत्रिक प्रशिक्षण घ्यावे व स्वतःच्या पायावर उभे राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील वारसांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवुन देण्याच्या दृष्टीने विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली उभारी उपक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यात 1 जानेवारी 2012 ते 31 मार्च 2018 या कालावधीतील आत्महत्याग्रस्त 751 कुटुंबांचा 15 नोव्हेंबर 2017 व 4 एप्रिल 2018 या दिवशी सर्व्हे करण्यात आला. त्यात शासनाच्या विविध योजनांची मागणी करणाऱ्या कुटुंबांची निश्चिती करुन त्यांना लाभ देण्यासाठी नियोजनबध्द कार्यक्रम आखण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणुन आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथील सभागृहात जिल्हाधिकारी डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या झालेल्या सर्वेक्षणात उभारी उपक्रमांतर्गत कौशल्य विकास व उद्योजकता रोजगाराभिमुख प्रशिक्षणासाठी मागणी केलेल्या 306 कुटुंबातील किमान आठवी ते बारावी उत्तीर्ण असणाऱ्या पाल्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.  
               
या कार्यशाळेत प्रमुख वक्ते नरेंद्र चव्हाण (चेअरमन, डॉ. शंकरराव चव्हाण बायो शुगर, डोंगरकडा), मल्लिकार्जुन सोपल (सेंटर हेड-ICICI Bank Academy for Skills, नरसोबावाडी, ता. शिरोळ जि. कोल्हापुर) यांचे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी आत्मनिर्भर होण्याच्यादृष्टीने बहुमोल मार्गदर्शन लाभले. नरेंद्र चव्हाण यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिला व मुलींसाठी बचत गटामार्फत विविध रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याचे नमुद करुन तांत्रिक प्रशिक्षणासाठी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
त्यासाठी ICICI Bank Academy for Skills, नरसोबावाडी, ता. शिरोळ जि. कोल्हापुर येथे मोफत रहिवासी व व्यावसायिक अभ्यासक्रमांतर्गत (उदा. विद्युत व घरगुती उपकरणांची दुरुस्ती, रेफ्रिजरेशन व ए.सी. दुरुस्ती, पंपसेट व मोटर्स रिपेअर इ.) प्रशिक्षण देऊन पाल्यांना आत्मनिर्भर कसे होता येईल या दृष्टीने पुर्ण मार्गदर्शन केले जाते. तसेच सदर प्रशिक्षण संस्थेमार्फत तीन महिन्याचा रहिवासी अभ्यासक्रम, भोजन व राहण्याची व्यवस्था निःशुल्क करण्यात येत असुन त्याकरिता ICICI Bank Academy for Skills, नरसोबावाडी, ता. शिरोळ जि. कोल्हापुर-416104 (मोबाईल क्र. 08554986343, 09175043070) या पत्त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. या संस्थेच्या नागपुर येथील शाखेत फक्त मुलींचे प्रशिक्षण केंद्र असुन नरसोबाची वाडी येथे मुलांसाठी निवासी प्रशिक्षणाची सोय आहे.
यावेळी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच महसुल कर्मचाऱ्यांचीही उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सोपान गुंडाळे यांनी केले तर आभार तहसिलदा किरण आंबेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, नायब तहसिलदार नितेशकुमार बोलोलु, श्रीमती जया अन्नमवार, श्रीमती शिला डाफणे, विजय चोथवे, राजीव ढवळे यांनी परिश्रम घेतले.             
000000000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्र. 1136 जिल्हास्तरीय   युवा महोत्सवाच्या तारखेत बदल युवा महोत्सवाचे आयोजन 1 व 2 डिसेंबर 2024 नांदेड दि.   25   नोव्हेंबर  :-   ज...