Monday, November 23, 2026

 प्राणी कल्याणासाठी कार्यरत व्यक्तींना समितीवर संधी


• जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीवर अशासकीय सदस्य नियुक्तीसाठी  23 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


नांदेड, दि. 23 : जिल्ह्यातील प्राणी कल्याणासाठी कार्यरत प्राणीमित्र, समाजसेवक आणि प्राणी कल्याण संस्थांच्या प्रतिनिधींना जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीवर अशासकीय सदस्य म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या समितीवर नियुक्तीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी 23 डिसेंबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, नांदेड यांनी केले आहे.

अर्जदार हा नांदेड जिल्ह्याचा रहिवासी असावा. प्राणी कल्याण, प्राण्यांचे हक्क आणि प्राणी छळ प्रतिबंधक क्षेत्रात प्रत्यक्ष कामाचा किमान 3 ते 5 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. अनुभवाच्या पुष्ट्यर्थ छायाचित्रे, प्रसारमाध्यमांतील वृत्तांची कात्रणे आदी कागदपत्रे जोडावीत. नोंदणीकृत प्राणी कल्याण संस्थेचे प्रतिनिधी असल्यास संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र आणि शिफारस पत्र सादर करणे आवश्यक आहे.

इच्छुक उमेदवारांनी सविस्तर बायोडाटा, अनुभवाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि आवश्यक कागदपत्रांसह अर्ज जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय कार्यालय, नांदेड येथे प्रत्यक्ष किंवा टपालाद्वारे सादर करावेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 23 डिसेंबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत असून, मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

*******

 विशेष लेख


हीरक महोत्सवी बालभारती


महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ अर्थात बालभारतीने आपल्या स्थापनेच्या साठाव्या वर्षात पदार्पण केले आहे. मागील साठ वर्षाच्या काळात नवीन शैक्षणिक विचारप्रणाली, कालसुसंगत शैक्षणिक धोरणे, नवीन अध्ययन- अध्यापन पद्धती अशा विविध बाबींचा विचार करून बालभारतीने पाठ्यपुस्तकांच्या स्वरूपात, आशयात अनेक बदल केले आहेत. कालानुरूप बदलाची ही प्रक्रिया आजही सुरु आहे.

आपल्याला दरवर्षी नव्या इयत्तेत प्रवेश करताना विविध विषयांची पाठयपुस्तके अभ्यासाला असतात. त्यातील मराठी, इतिहास आणि तुमच्या आवडत्या इतर विषयांची पुस्तके तुम्ही आवडीने आधीच वाचून पाहत असता.कधी उन्हाळ्याच्या, दिवाळीच्या तर कधी रविवारच्या सुट्टीत ही पुस्तके तुम्ही आवडीने चाळून घेता.  त्यातील धडे, कथा, कविता, चित्रे पाहिल्याशिवाय तुमच्या मनाचे समाधान होत नाही. त्यावेळी किती वाचू नि किती नको ! असे तुम्हाला होत असते. त्यातच तुमचे ताई दादा तुमच्या पुढील वर्गात असतील तर तुम्ही त्यांची पुस्तकेसुद्धा त्यांच्याशी गोड बोलून, कधी भांडून तर कधी आईबाबांना सांगून मिळवता. कारण नव्या वर्गाचे पुस्तक पाहताना, वाचताना मनात खूप उत्सुकता, आनंद असतो.  त्याची तुलना आणि बरोबरी जगातल्या कुठल्याच आनंदाशी करता येत नाही. ही पुस्तके वर्षभर तुमची सोबती असतात. तुमचे आणि तुमच्या शिक्षकांचे जिवाभावाचे मित्रच असतात. तुमची ही लाडकी, आवडती पुस्तके तयार करणारी संस्था म्हणजे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ अर्थात तुमची लाडकी, आवडती बालभारती.

27 जानेवारी 1967 रोजी या संस्थेचा जन्म झाला. दरवर्षी २७ जानेवारी या तारखेला बालभारतीचा वाढदिवस अर्थात वर्धापन दिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात येतो. 

यंदा आपल्या लाडक्या बालभारतीने स्थापनेच्या ६० व्या वर्षात पदार्पण केले आहे. २०२६ हे वर्ष बालभारतीचे हीरक महोत्सवी वर्ष आहे. बालमित्रांनो हीरक महोत्सव म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती, संस्था किंवा राष्ट्राला स्थापनेपासून किंवा एखाद्या विशिष्ट घटनेला ६० वर्षे पूर्ण होतात, तेव्हा तो दिवस "हीरक महोत्सव" म्हणून साजरा केला जातो. गेल्या ६० वर्षाच्या काळात नव-नवीन व कालसुसंगत शैक्षणिक धोरणे, नवीन अध्ययन- अध्यापन पद्धती अशा विविध बाबींचा विचार करून बालभारतीने पाठ्यपुस्तकांच्या स्वरूपात, आशयात, मांडणीत अनेक महत्त्वाचे, उपयुक्त बदल केले आहेत आणि कालानुरूप बदलाची ही प्रक्रिया आजही सुरु आहे.  

सा विद्या या विमुक्तये  असे बोधवाक्य असलेली बालभारती ही संस्था आपल्या देशाच्या शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाची संस्था म्हणून ओळखली जाते. सा विद्या या विमुक्तये म्हणजे 'जी विद्या मुक्ती देते, तीच खरी विद्या आहे'. हा एक संस्कृत श्लोक आहे, याचा अर्थ जे ज्ञान आपल्याला बंधनातून मुक्त करते तेच खरे ज्ञान आहे, तर इतर ज्ञान हे केवळ कौशल्ये आहेत. अक्षरओळखीपासून ते नामवंत साहित्यिकांची, विविध तज्ज्ञांची, विषयांची ओळख करून देत प्रत्येक मुलाला दरवर्षी नव्या विश्वाशी जोडत वाचनाची, शिक्षणाची आवड लावण्याचे कार्य 'बालभारती' ही संस्था सातत्याने करीत आहे.  शिक्षण हे समाज परिवर्तनाचे महत्त्वाचे माध्यम आहे, तर पाठ्यपुस्तक हे ज्ञानप्राप्ती व शिक्षणाचा प्रसार करण्याचे प्रमुख साधन आहे. पाठ्यपुस्तके हा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. आपल्या मनाचा एक कोपरा आपण शिकलेल्या , शिकत असलेल्या  पाठ्यपुस्तकांसाठी कायम राखीव असतो. लहानपणी शिकलेल्या कथा, कविता, चित्रे यांचा एक विलोभनीय ठसा मनावर उमटलेला असतो. पाठ्यपुस्तकांतून भाषेचे, साहित्याचे आणि वाचनाचे संस्कार तर होतातच, शिवाय जीवनाचे, जगण्याचे अनेक संस्कारही याच पाठ्यपुस्तकांतून होत असतात. अशी ही आयुष्यभर साथसंगत करणारी, उत्तम संस्कारांची शिदोरी देणारी पाठ्यपुस्तके बालभारतीत तयार होतात. तुमचे आई-बाबा, काका-काकू, आत्या-मावशी, ताई-दादा या सर्वांना आपली शाळा, शाळेतील शिक्षक आणि पाठयपुस्तकातील धडे, कथा, कविता, त्यांची चित्रे लक्षात असतात. काहींना तर पाठच असतात. ते आठवण आली की घडाघडा म्हणून दाखवतात. अशा प्रकारे अनेक पिढयांवर बालभारतीच्या पुस्तकांचा संस्कार आहे. एका अतूट धाग्याने विविध पिढ्या एकमेकांशी बांधल्या गेल्या आहेत.  

दरवर्षी अंदाजे 12 कोटी पुस्तकांची छपाई करून त्यांचे वितरण बालभारती मार्फत केले जाते. पाठ्यपुस्तकांची निर्मिती ही खडतर आणि विलक्षण प्रक्रिया आहे. प्रतिवर्षी एकाचवेळी राज्यातील लाखाहून अधिक शाळांमधील शिक्षक, कोट्यवधी विद्यार्थी आणि तितकेच पालक यांच्याशी आपुलकीच्या अतूट धाग्यांनी बालभारती जोडली गेली आहे. 

पाठ्यपुस्तक मंडळाची स्थापना

स्वातंत्र्यानंतरच्या देशातील शैक्षणिक वाटचाल सुरु करण्यासाठी अनेक अडचणींना, विविध प्रश्नांना सामोरे जावे लागले. कारण आपला देश विविध जाती, अनेक भाषा, विविध रूढी, परंपरा यांच्या वैविध्याने नटलेला, सजलेला होता. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी नेमके काय स्वीकारावे, काय स्वीकारू नये, याबाबत निश्चित दिशा आणि धोरण नव्हते. वेगवेगळ्या राज्यांतील  भाषाविषयक धोरण, शैक्षणिक अभ्यासक्रम  यामध्ये एकसमान असे सूत्रही नव्हते.म्हणूनच भारताच्या  शैक्षणिक धोरणाची आणि वाटचालीची पायाभूत दिशा ठरवण्यासाठी  कोठारी आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगाने भारतीय  शिक्षणक्षेत्रात क्रांती घडवून आणली. 

'बालभारती' तथा पाठ्यपुस्तक मंडळाच्या स्थापनेपूर्वी शाळांमध्ये खाजगी प्रकाशकांची पुस्तके वापरात होती. या पुस्तकाचा दर्जा, किमतीमधील तफावत, त्यांची उपलब्धता या बाबींची दखल कोठारी आयोगाने घेतली.या सर्व प्रक्रियेचा बारकाईने अभ्यास केला. त्यानुसार दर्जेदार आणि रास्त किमतीमधील पुस्तके मुलांना वेळेत मिळावी यासाठी राज्याने स्वायत्त संस्था निर्माण करावी अशी शिफारस या आयोगाकडून करण्यात आली. शालेय पाठ्यपुस्तकांचे राष्ट्रीयीकरण झाले. याच कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार 27 जानेवारी 1967 रोजी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ तथा बालभारती या संस्थेची स्थापना झाली. याचे उद्‌घाटन तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते 2 फेब्रुवारी 1967 रोजी  झाले. मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष या नात्याने तत्कालीन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांचे संस्था उभारणीत आणि मंडळाचे पहिले संचालक उत्तमराव सेवलेकर आणि पहिले नियंत्रक बापूराव नाईक यांचे संस्थेच्या प्रारंभीच्या वाटचालीत मोलाचे योगदान राहिले.

किशोर मित्र-मैत्रिणींनो, राज्यातील प्राथमिक स्तरावर शिक्षण घेणार्‍या पहिली ते आठवीपर्यंतच्या तुम्हा विद्यार्थ्यांसाठी भाषा व इतर सर्व विषयांची पाठ्यपुस्तके तयार करून वितरित करणे हे पाठ्यपुस्तक मंडळाचे मुख्य उद्‌दिष्ट आहे. मराठी बालभारती इयत्ता पहिली हे मंडळाचे पहिले पुस्तक 1968 साली प्रकाशित झाले. आठ भाषा माध्यमातून सर्व विषयांची पाठ्यपुस्तके तयार करणारे पाठ्यपुस्तक मंडळ हे बालभारतीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. 1968 पासून पाठ्यपुस्तक मंडळ दर्जेदार, संस्कारक्षम आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी पाठ्यपुस्तके तुम्हा विद्यार्थ्यांना अल्प किमतीत उपलब्ध करून देत आहे. गेल्या पन्नास वर्षाच्या काळात नवीन शैक्षणिक विचारप्रणाली, कालसुसंगत शैक्षणिक धोरणे, नवीन अध्ययन- अध्यापन पद्धती अशा विविध बाबींचा विचार करून पुस्तकांच्या स्वरूपात, आशयात अनेक बदल करण्यात आले आहेत. कालानुरूप बदलाची ही प्रक्रिया आजही सुरु आहे.

संस्थेचे नाव महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ असे असले, तरी `बालभारती' या नावाने प्रकाशित होणारी भाषेची पाठ्यपुस्तके बालक - पालक - शिक्षक यांच्यामध्ये अल्पावधीतच इतकी लोकप्रिय झाली, की पाठ्यपुस्तक मंडळ `बालभारती' याच नावाने ओळखले जाऊ लागले. 

बालभारती या नावामागील रंजक गोष्ट

 बालभारती या नावामागील गोष्ट रंजक आहे.  तुम्हाला बालभारती हे नाव मध्यप्रदेश सरकार भाषेच्या पुस्तकांसाठीवापरत होते. तेच नाव नियमक मंडळाने स्विकारले आणि आपण ते नाव वापरू लागलो. ते इतके आपले झाले की संपूर्ण भारतात आपली संस्था बालभारती या नावाने ओळखली जाऊ लागली. आज महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्राचा कणा असलेल्या बालभारतीच्या कार्यालयासाठी तेव्हा मात्र अगदी छोटी जागा होती. पुणे विद्यापीठ रस्त्यावरील श्री जी. वाय. राणे यांच्या बंगल्यावरील पहिल्या मजल्यावर आठ ते दहा कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन तटपुंजी भांडवल घेऊन बालभारती ही संस्था उभी राहिली.आता या छोट्याशा रोपट्याचे महावृक्षात रूपांतर झाले आहे.  बालभारती नावाप्रमाणेच बालभारतीच्या मुखपृष्ठाची आणि बोधचिन्हाची पण गंमतीदार गोष्ट आहे. झाले असे की, शिकणाऱ्या मुलांची मानसिकता ओळखून मुळ उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बालभारतीने कंबर कसली. याकामी अनेक मान्यवर लेखक, आणि चित्रकारांचे मोलाचे साहाय्य लाभले. यात प्रसिद्ध चित्रकार दिनानाथ दलाल यांनी  इयत्ता पहिलीच्या भाषेच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ काढले होते. हे मुखपृष्ठावरील भाऊ बहिणीचे  चित्र एवढं सुंदर आणि प्रभावी झाले की हेच मुखपृष्ठावरील भाऊ बहिणीचे चित्र  बालभारतीची कायमस्वरूपी ओळख ठरली.

पाठ्यपुस्तक प्रकाशन क्षेत्रातील एक पायाभूत, स्वायत्त संस्था असा बालभारतीचा उल्लेख करावा लागेल.  मंडळाने स्थापनेपासूनच संस्कारक्षम , आकर्षक व दर्जेदार पाठ्यपुस्तक तयार करण्याचे व्रत घेतले. अनेक अडचणींवर मात करून शिक्षण क्षेत्रातील पाठ्यपुस्तक प्रकाशनाचा पाया मजबूत केला. निव्वळ मुलांवरील प्रेमापोटी राज्यातल्या अनेक ख्यातनाम लेखक, कलावंत आणि विचारवंतानी बालभारतीच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. कल्पना कार्यक्षमता व कर्तृत्व यांचा एक सुंदर त्रिवेणी संगम मंडळाच्या आजवरच्या प्रवासात दिसून येतो. रोज तुमच्यासोबत असणारी बालभारतीची पुस्तके  कशी तयार होतात हे जाणून घ्यायला तुम्हांला आवडेल ना? चला तर मग त्यासाठी आपण आपल्या लाडक्या बालभारतीची रचना समजून घेऊयात. 

पाठ्यपुस्तक  मंडळाची  रचना

पाठ्यपुस्तक मंडळ हे राज्यशासनाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेली स्वायत्त संस्था आहे. राज्याचे शिक्षणमंत्री हे या संस्थेचे पदसिद्‌ध अध्यक्ष असतात. संस्थेचे सर्व धोरणात्मक निर्णय नियामक मंडळात घेतले जातात. पाठ्यपुस्तके तयार करण्याचे मुख्य काम विद्या विभागात केले जाते. विद्याविभागांतर्गत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, सिंधी, तेलुगू, गुजराती या आठ भाषा आणि इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान, कार्यानुभव, आरोग्य व शारीरिक शिक्षण असे एकूण 14 विभाग आहेत. सर्व विषयांसाठी म्हणजे मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, नागरिकशास्त्र आणि भूगोल, 'खेळू, करू, शिकू' या विषयांसाठी स्वतंत्र विभाग असलेल्या वेगवेगळ्या विषय समित्या काम करत असतात. त्या त्या विषयाचे अभ्यासक, तज्ज्ञ, शिक्षक, समाजात अन्य क्षेत्रांत महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती त्या समितींमध्ये काम करत असतात. आता हस्तपुस्तिकांऐवजी नव्याने आलेल्या कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण या विषयांचं 'खेळू, करू, शिकू' हे संयुक्त पुस्तक तुम्ही अभ्यासत आहात. त्यामध्ये दिलेल्या नवीन वस्तू तयार करणे, गीतगायन, कथा-संवाद-कोडी, नृत्य-नाट्य, चित्रकाम, कागदकाम, विविध खेळ अशा अनेकविध कृती आवडीने करत आहात ना ? या सर्व पुस्तकांची रचना, मांडणी, निर्मिती बालभारती येथे केली जाते.

विषय समित्या

पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी विषयवार समित्या असतात. मंडळातील त्या त्या विषयाचे तज्ज्ञ अधिकारी विषय समित्यांमध्ये सदस्य-सचिव म्हणून काम करतात. जुन्या अभ्यासक्रमाच्या जागी नवीन अभ्यासक्रम येऊन पाठ्यपुस्तके बदलली जात नाहीत, तोपर्यंत या समित्या कार्यरत असतात. पाठ्यपुस्तके तयार करणे ही जटील, गुंतागुंतीची  प्रक्रिया आहे. तुम्हा मुलांचा वयोगट, त्याचं भावविश्व, त्यांची आकलन क्षमता, मजकुराची काठिण्यपातळी या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पाठ्यविषयांची निवड करणे आणि सोप्या भाषेत धड्यांच्या स्वरूपात त्यांचे लेखन करणे हे एक प्रकारचे कष्टदायक आणि अभ्यासपूर्ण काम असते. सर्वप्रथम त्या त्या विषयाचा अभ्यासक्रम तयार केला जातो. तुमच्या सर्वांगीण विकासासाठी  विविध कौशल्यांचा विकास घडवून आणणे हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून हे अभ्यासक्रम तज्ज्ञ तयार करतात. त्या अभ्यासक्रमावर आधारित उ‌द्दिष्टांनुसार प्रत्येक विषयाचा स्वतंत्र पाठ्यक्रम बारकाईने तयार केला जातो. त्यानुसार  सर्व विषयांचे अभ्यासक्रम तयार झाल्यावर पाठ्यपुस्तक निर्मितीचे काम सुरू केले जाते.   प्रत्येक विषयासाठी संयोजक म्हणून विशेषाधिकारी आणि सहायक विशेषाधिकारी हे पुस्तक संपादनाचे काम करतात.त्यातील मजकूर, मांडणी, रचना अतिशय व्यवस्थित, काळजीपूर्वक तपासून घेतात. या सर्वच पाठ्यपुस्तकांची भाषा सोपी, सुटसुटीत आणि विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेनुसार ठेवण्यावर जाणीवपूर्वक भर दिला जातो. 

अमराठी पुस्तके

आपल्या राज्यात मराठी, हिंदी, इंग्रजीबरोबरच अमराठी माध्यमांच्या शाळांची संख्या लक्षणीय आहे. उर्दू, कन्नड, सिंधी, गुजराती, तेलुगू इत्यादी मातृभाषा असणारे अनेक अमराठी भाषक महाराष्ट्रात राहतात. त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारून शासनाने अमराठी माध्यमांच्या शाळा सुरू करण्यास राज्यात परवानगी दिली आहे. या मुलांसाठी त्यांच्या मातृभाषेतील पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम देखील  बालभारतीच करते. इतिहास, भूगोल, विज्ञान, गणित इत्यादी विषयांची पुस्तके मराठीतून तयार झाल्यानंतर ती अन्य अमराठी भाषांत अनुवादित केली जातात. हीच पुस्तके या शाळांमध्ये अभ्यासली जातात.

पाठ्येतर प्रकाशने

पाठ्यपुस्तकांची निर्मिती व वितरण हे पाठ्यपुस्तक मंडळाचे मुख्य  कार्य असले, तरी मंडळाने शिक्षक, तुम्ही  विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी अवांतर वाचनासाठी अन्य उपयुक्त साहित्याचीही निर्मिती केली आहे. आदर्श शिक्षकांची आत्मचरित्रे, उत्तम संस्कारकथा, ग्रामगीता, गांधीजींची आत्मकथा-माझे सत्याचे प्रयोग, कथा स्वातंत्र्याची, शिल्पकार स्वातंत्र्याचे, स्फूर्तिगीते, माहीत आहे का तुला?, मराठी शब्दार्थकोश, गोष्ट स्वातंत्र्यलढ्याची, बालगोष्टी, बालगीते इत्यादी पाठ्येतर प्रकाशनांना वाचकांचा उत्तम प्रतिसाद आहे.

किशोर (मुलांचे मासिक)

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी (१४ नोव्हेंबर १९७१ रोजी) ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी `किशोर' हे मासिक मंडळाने सुरू केले. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान मिळावे, त्यांच्या संवेदनशील मनावर उत्तम मूल्यांचे संस्कार व्हावेत ही उद्‌दिष्टे ठेवून किशोर मासिक चालवले जाते. गेल्या ५४  वर्षांत किशोर मासिकाने अनेक पिढ्यांवर वाचनाचे ज्ञान-विज्ञाचे व मूल्यांचे संस्कार केले आहेत. अनेक चित्रकार, कवी लेखक यांना मासिकाने घडवले आहे. ४० वर्षांतील किशोरमधील उत्तम निवडक साहित्य १४ खंडांत प्रकाशित झाले आहेत. हे साहित्य अतिशय वाचनीय असून तुम्ही ते जरूर वाचा. कोरोनाच्या काळात 'किशोर'ची ३३ हजार पृष्ठे जगभरातील मराठी वाचकांसाठी मोफत उपलब्ध करून देण्याचे श्रेय देखील बालभारतीस जाते. केवळ तुमच्या प्रेमापोटी कोरोनाच्या काळात मुलांना, पालकांना एकटे पडू न देण्यासाठी किशोरने विशेष कष्ट घेतले. आता ही सर्व पुस्तके तुम्हाला www.ebalbharati.in या संकेतस्थळावर डिजिटल स्वरूपातही उपलब्ध आहेत. ती तुम्ही जरूर पहा.  

आजघडीला देशभरातल्या नामांकित मुद्रकांकडून बालभारतीची पुस्तके छापून घेतली जातात. दरवर्षी बालभारती तब्बल 12 कोटी पुस्तकांची छपाई करते.  पण एकेकाळी छपाई तंत्रज्ञानाबरोबरच वाहतूक व्यवस्था सुद्धा मर्यादित होती. वेळप्रसंगी पुण्यातील पुण्यातच पुस्तक तयार करून, छापून ती बैलगाडीतून  पाठवावी लागायची. हे सारे अडथळे पार करून फक्त मुलांच्या हातात वेळच्या वेळी पुस्तक पोहोचायला हवे हा हट्ट बालभारतीने धरला होता.

अद्ययावत ग्रंथालय

प्रारंभी पाठ्यपुस्तके, किशोर सारखी इतर प्रकाशने  यासाठी संदर्भाची गरज पडली होती. म्हणून बालभारतीने स्वतःचे समृद्‌ध असे ग्रंथालय विकसित केले. यात  सव्वा लाख पुस्तक,  पाच हजार कोश, असंख्य नकाशे,  नॅशनल जिओग्राफिक, नेचर, यासारखी महागडी मासिके असं सर्व काही उपलब्ध आहे. आताही पाठ्यपुस्तकांची निर्मिती करताना अनेक नवनवीन संदर्भग्रंथांची आवश्यकता भासते. अद्ययावत आणि अत्यंत दुर्मिळ असे अनेक संदर्भग्रंथ इथे उपलब्ध आहेत. बालभारतीत आठ भाषांमध्ये पाठ्यपुस्तके तयार होत असल्यामुळे ग्रंथालयात आठही भाषांमधील विपुल ग्रंथसंपदा आहे. प्रतिवर्षी नवनवीन ग्रंथांची यात भर पडत असते. ग्रंथांबरोबरच आठ भाषांमधील व अन्य विदेशी भाषांमधील असंख्य नियतकालिकेही मागवली जातात.

ई-बालभारती (e-Balbharati) आणि तंत्रज्ञानाचा वापर

बालभारतीचे डिजिटल युगातील हे सर्वात महत्त्वाचे पाऊल होते. बालभारतीची सर्व पाठ्यपुस्तके ऑनलाइन (PDF स्वरूपात) विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे तुम्हा विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना पुस्तके कधीही, कुठेही मिळवणे शक्य झाले.

QR कोडचा वापर: प्रत्येक पाठात किंवा धड्यात क्यूआर (QR) कोड छापण्यात आले. हे कोड स्कॅन करून तुम्ही  अतिरिक्त शैक्षणिक संसाधने, ऑडिओ-व्हिडिओ क्लिप्स आणि सराव चाचण्या यांचा फायदा घेऊ शकलात आणि  यामुळे शिक्षण अधिक सोपे व संवादी  झाले.

DIKSHA App: भारत सरकारच्या 'दीक्षा' (DIKSHA) प्लॅटफॉर्मवर बालभारतीची संसाधने उपलब्ध करून दिली गेली, ज्यामुळे राष्ट्रीय स्तरावर या संसाधनांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला.

'व्हर्चुअल क्लासरूम' प्रकल्पात बालभारतीचे योगदान

महाराष्ट्राच्या आदिवासी पाड्यांवर अतिदुर्गम वाड्या, वस्त्यांवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न शासनाकडून सातत्याने करण्यात येत आहेत. शहरी भागाप्रमाणेच दुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी व्हर्चुअल क्लासरूम हा पर्याय खूपच प्रभावी ठरत आहे. सन २०१९ पूर्वी मुंबईतील काही शाळांमध्ये हा प्रयोग करण्यात आला होता आणि तो यशस्वी ठरला. त्यामुळे शासनाकडून  अतिदुर्गम भागात असलेल्या शाळांमध्ये 'व्हर्चुअल क्लासरूम' हा प्रकल्प महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेमधील एक आधारस्तंभ असलेली संस्था म्हणजेच 'बालभारती'मार्फत राबवण्याचे ठरविण्यात आले. या संस्थेच्या अंतर्गत, बदलत्या काळानुरूप शिक्षण व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी 'ई-बालभारती' या विभागाची स्थापना करण्यात आली आहे. बालभारतीच्या आर्थिक सहकार्यातून सदर प्रकल्प राबवण्याचे निर्णय शासनाने घेतला. सन २०२० मध्ये ई-बालभारतीच्या माध्यमातून अतिदुर्गम भागातील ७६१ शाळा या प्रकल्पांतर्गत जोडण्यात आल्या.पोहोचू शकत नाही अशा अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना या प्रकल्पामुळे उत्तम विषय तज्ज्ञांकडून मार्गदर्शन देण्याची संधी बालभारतीच्या माध्यमातून शासनाने उपलब्ध करून दिली आहे. बालभारतीने या प्रकल्पांतर्गत ३ अत्याधुनिक स्टुडिओंची निर्मिती केली असून त्या स्टुडिओच्या माध्यमातून आणि 'एस.सी.ई.आर.टी.' या संस्थेच्या सहयोगातून वेगवेगळ्या विषयाचे तज्ज्ञ इयत्ता पहिली ते इयत्ता दहावीचे शिक्षण विद्यार्थ्यांना देत आहेत. सदर तासिका या रोज सकाळी ११ ते २ या वेळेत ३ स्टुडिओमधून प्रसारित केल्या जातात. या प्रकल्पात विद्यार्थ्यांना विषय शिकवत असताना येणाऱ्या शंका विचारण्याची सोय करण्यात आली असून या तासिकेमध्ये होणारे संभाषण हे दोन ही बाजूंनी करण्याची सोय यात करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी इंटरनेट, मोबाईल सेवा सदर सुविधेबरोबरच या प्रकल्पांतर्गत प्रसारित होणाऱ्या सर्व विषयांच्या तासिका ई-बालभारतीने यु-ट्युबच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना उपलब्ध करून दिल्या आहेत. शासनाने सदर सुविधा सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य उपलब्ध करून दिल्या आहेत. ही यंत्रणा आगामी काळात अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच वरदान ठरणार आहेत.

नव्या बदलांची नांदी

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने शालेय वर्ष २०२६-२७ मध्ये महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळामार्फत (बालभारती) इयत्ता ३ री, ४ थी, व ६ वीची पाठ्यपुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत नव्या शैक्षणिक पर्वाची पायाभरणी करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वंकष विकासाचा दृष्टिकोन लक्षात घेऊन ही अभ्यासपूर्ण आणि दर्जेदार पुस्तके तयार करण्यात आली आहेत. मागील काही महिन्यांचा आढावा घेता विद्यार्थी, शिक्षक व पालकांकडून या पुस्तकाचे स्वागत करण्यात आले आहे. नव्या युगातील आव्हानांचा सामना करण्यासाठी ही पुस्तके तत्पर अशीच आहेत.

बालभारतीचे सामाजिक योगदान आणि महत्त्व

बालभारतीचे महत्त्व केवळ पाठ्यपुस्तके छापण्यापुरते मर्यादित नाही. या संस्थेने 


समानता : राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना समान, दर्जेदार, अत्यंत परवडणाऱ्या, योग्य दरात आणि एकाच वेळी पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देऊन शैक्षणिक समानता आणण्याचा प्रयत्न केला.

भाषेचा विकास : मराठीसह इतर प्रादेशिक भाषांमधील पाठ्यपुस्तके तयार करून भाषिक विकासाला चालना दिली.

सांस्कृतिक जडणघडण : पाठ्यपुस्तकांमधून महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, संस्कृती आणि थोर व्यक्तिमत्त्वांचा परिचय करून देऊन विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावली.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, अर्थात 'बालभारती' ही महाराष्ट्रातील शालेय शिक्षणाचा पाया मजबूत करणारी एक स्वायत्त संस्था आहे. २७ जानेवारी १९६७ रोजी पुणे येथे स्थापन झालेल्या या संस्थेने, महाराष्ट्रातील कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे.संपूर्ण देशात बालभारतीची रचना आणि कार्यपद्‌धती आदर्शवत आहे.गुणवत्ता व दर्जा याबाबतीतसुद्‌धा मंडळाची पाठ्यपुस्तके मागे नाहीत. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर मंडळनिर्मित पाठ्यपुस्तकाची गणुवत्ता व दर्जा उत्कृष्ट असल्याबाबतची प्रमाणपत्रे मिळाली आहेत. किशोर या मासिकालाही भारत सरकारचे गुणवत्ता प्रमाणपत्र व मुद्रण स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त झाले आहे. आजही देश-विदेशातील मंडळे बालभारतीला भेट देण्यासाठी येतात आणि येथील रचना आणि कार्यपद्‌धती त्यांच्याकडे सुरू करण्याच्या दृष्टीने विचार करतात, यातच बालभारतीचे यश दडलेले आहे.

सद्यस्थिती आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (२०२० ते आजपर्यंत) : गेल्या काही वर्षांपासून, महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत मोठे आणि क्रांतिकारी बदल होत आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) : एनईपी २०२० मुळे शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल सुचवण्यात आले आहेत. महाराष्ट्रात या धोरणाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने सुरू आहे आणि बालभारती यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

कौशल्य आणि अनुभवाधिष्ठित शिक्षण: केवळ घोकंपट्टीवर भर न देता, विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास, व्यावहारिक ज्ञान आणि अनुभवाधिष्ठित शिक्षण (experiential learning) रुजवण्याचे उद्दिष्ट आहे.

अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांमधील ताजे बदल

बालभारतीची भूमिका : या बदलासाठी आवश्यक असलेले नवीन पाठ्यपुस्तक लेखन आणि निर्मितीचे काम बालभारतीकडे सोपवण्यात आले आहे. बालभारतीचे तज्ज्ञ सध्या NCERT च्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करून, त्यात महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल आणि संस्कृतीचे अनोखे पैलू कायम ठेवून नवीन पुस्तके तयार करत आहेत.

आव्हाने आणि पुढील वाटचाल

गेल्या काही वर्षांत खाजगी प्रकाशनांशी स्पर्धा, बदलत्या तंत्रज्ञानानुसार पुस्तकांचे अद्ययावतीकरण आणि वेळेवर पुस्तकांचे वितरण ही काही आव्हाने संस्थेसमोर उभी राहिली. मात्र, संस्थेने यावर मात करत, नवीन शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) नुसार अभ्यासक्रमात सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. बदलत्या काळानुसार आता बालभारतीही बदलते आहे.आधुनिक ज्ञान-तंत्रज्ञान यामुळे पारंपरिक पाठ्यपुस्तकांचे स्वरूप बदलण्यासाठी व नवी आव्हाने पेलण्यासाठी बालभारती आता सज्ज झाली आहे. आजमितीला बालभारतीची ६० वर्षांची वाटचाल ही एका अर्थाने महाराष्ट्रातील शालेय शिक्षणाचीच वाटचाल आहे. २७ जानेवारी १९६७ रोजी रोवलेले बालभारतीचे रोपटे आज वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. जानेवारी २०२६ मध्ये साजऱ्या होणाऱ्या ६० वर्षांच्या प्रवासात, बालभारतीने अनेक पिढ्यांना ज्ञानाचे धडे दिले आहेत. महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेचा अविभाज्य भाग बनलेल्या या संस्थेची वाटचाल प्रेरणादायी आहे. आणि आगामी काळातही ती शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत राहील असा विश्वास वाटतो.


-किरण केंद्रे , कार्यकारी संपादक (किशोर) व जनसंपर्क अधिकारी (बालभारती) 



 अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा उद्या नांदेड दौरा


नांदेड, दि. 23 : राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय मंत्री नरहरी झिरवाळ हे मंगळवार, दि. 24 नोव्हेंबर 2026 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

मंगळवार, दि. 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता पुणे विमानतळ येथून विमानाने नांदेडकडे प्रयाण करतील. सकाळी 8.15 वाजता गुरु गोविंदसिंह विमानतळ, नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 8.30 वाजता शासकीय वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण करतील.

सकाळी 11 वाजता हिंगोली येथून नांदेड येथील शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण करून राखीव राहील. दुपारी 2.30 वाजता शासकीय विश्रामगृह, नांदेड येथून गुरु गोविंदसिंह विमानतळाकडे प्रयाण करतील. दुपारी 3.30 वाजता नांदेड विमानतळ येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

******

Saturday, November 21, 2026

दुष्काळ निवारणासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला १५ लाखांचा निधी.!
खरीप हंगामातील दुष्काळ निवारणासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, प्रत्येक ग्रामपंचायतीला दुष्काळ निवारणासाठी १५ लाखांचा निधी दिला जाणार असल्याची घोषणा, दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
हा निधी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) माध्यमातून उपलब्ध करून दिला जाईल. तसेच जलसंधारण व ग्रामविकासासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून, महसूलसह ११ विभागांवर दुष्काळ निवारणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध विभागांच्या माध्यमातून विविध प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात येत आहेत !




वृत्त क्रमांक 

रेशीम शेतीतून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार – डॉ. अशोक जाधव

सिल्क समग्र-२ अंतर्गत २५ लाभार्थ्यांचे निवासी प्रशिक्षण सुरू

नांदेड, दि. २१ : कमी पाणी आणि खर्चात अधिक उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता रेशीम शेतीत आहे. शास्त्रीय पद्धतीने रेशीम शेती केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन ग्रामीण भागात रोजगाराच्या संधीही निर्माण होतील, असे प्रतिपादन REC परभणीचे वैज्ञानिक डॉ. अशोक जाधव यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या रेशीम संचालनालयांतर्गत जिल्हा रेशीम कार्यालय, नांदेड यांच्यावतीने सिल्क समग्र-२ योजनेंतर्गत आयोजित सात दिवसीय लाभार्थी सक्षमीकरण निवासी प्रशिक्षणाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते SBI RSETI, नांदेड येथे करण्यात आले. दि. २० ते २६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत होणाऱ्या या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील २५ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी कृषी विज्ञान केंद्र, पोखरणीचे विभागप्रमुख डॉ. देविकांत देशमुख, जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यात रेशीम शेतीचा विस्तार वाढत आहे. कमी पाणी, कमी खर्च आणि तुलनेने कमी कालावधीत उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी या शेतीकडे वळत आहेत. हे प्रशिक्षण शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देऊन रेशीम उत्पादन वाढविण्यास उपयुक्त ठरेल, असे डॉ. जाधव यांनी सांगितले.

 या प्रशिक्षणात तुती लागवड व बाग व्यवस्थापन, रेशीम कीटक संगोपन, रोग व्यवस्थापन, कोष उत्पादन, बाजारपेठ व्यवस्था आणि शासकीय योजनांची माहिती तज्ज्ञांकडून दिली जात आहे. प्रात्यक्षिकांद्वारे दिले जाणारे प्रशिक्षण शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतीत उपयोगी ठरेल. प्रशिक्षणानंतरही लाभार्थ्यांना तांत्रिक मार्गदर्शन व सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे यांनी सांगितले.

रेशीम शेतीमध्ये तुतीच्या पानांवर रेशीम कीटकांचे संगोपन करून रेशीम कोषांचे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रात प्रामुख्याने तुती रेशीम उत्पादन केले जाते. एकदा लागवड केलेली तुती बाग १५ ते २० वर्षे उत्पादन देऊ शकते. वर्षातून पाच ते सहा वेळा कीटक संगोपन करता येत असल्याने उत्पन्नाचे नियमित साधन उपलब्ध होते. तुती लागवड, कीटक संगोपन गृह, साहित्य व उपकरणांसाठी शासनाकडून अनुदान तसेच प्रशिक्षण व तांत्रिक मार्गदर्शन दिले जाते. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा पर्याय स्वीकारावा, असे आवाहन वडवळे यांनी केले.

प्रशिक्षणाचा समारोप २६ नोव्हेंबर रोजी रेशीम संचालनालयाचे उपसंचालक डॉ. महेंद्र ढवळे यांच्या हस्ते होणार असून, यावेळी लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. उद्घाटनप्रसंगी प्रशिक्षक शिवप्रसाद माळवतकर, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक कांचन जाधव, क्षेत्र सहाय्यक अमर सूर्यवंशी, खिल्लारे, कोल्हे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

*******






वृत्त क्रमांक 

शिक्षणाच्या बळावर आदिवासी युवकांनी प्रगती साधावी – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

जलधारा व वाळकेवाडी येथे जनजातीय गौरव सप्ताहानिमित्त जनसंवाद मेळावा उत्साहात संपन्न

नांदेड, दि. २१ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या विचारांचा अंगीकार करून आदिवासी युवकांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाच्या विकासात योगदान द्यावे. शासनाच्या विविध शैक्षणिक व कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन प्रगती साधावी, असे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.

क्रांतीसूर्य धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जनजातीय गौरव सप्ताहांतर्गत किनवट तालुक्यातील जलधारा आणि हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी येथे आयोजित जनसंवाद मेळाव्यात ते बोलत होते.

भगवान बिरसा मुंडा यांचे बलिदान, संघर्ष आणि समाजासाठीचे योगदान प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प युवकांनी करावा. आदिवासी समाजातील प्रत्येक घटक शिक्षित होण्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे. त्यांचा लाभ घ्यावा. सध्याची दुष्काळी परिस्थिती आणि ऑगस्ट २०२७ पर्यंत कमी पर्जन्यमानाचा अंदाज लक्षात घेता शासन नागरिकांच्या मदतीसाठी कटिबद्ध असून, कोणत्याही अडचणीच्या काळात आवश्यक मदत कमी पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही मंत्री झिरवाळ यांनी दिली.

जलधारा येथील कार्यक्रमास आमदार भीमराव केराम, जयवंत वानोळे, सरपंच वैशालीताई पाचपुते, तहसीलदार शारदा चोंडेकर, तर वाळकेवाडी येथील कार्यक्रमास आमदार बाबूराव कदम कोहळीकर, जयवंत वानोळे, तहसीलदार पल्लवी टेमकर, गटविकास अधिकारी यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. दोन्ही ठिकाणी संबंधित आमदारांनी मनोगत व्यक्त केले.

जलधारा येथे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. पारंपरिक वेशभूषेतील आदिवासी बांधवांनी नृत्य सादर करून त्यांचे स्वागत केले. वाळकेवाडी येथे त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दोन्ही कार्यक्रमांना नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

****





















  नांदेड जिल्ह्यातील 5 लाख 68 हजार शेतकऱ्यांना दुष्काळी अग्रीम अनुदान वितरित 8 लाख 73 हजार शेतकऱ्यांची माहिती शासनाकडे सादर ; उ...