नशामुक्त युवा, विकसित
भारताचा संकल्प; धर्माबादमध्ये युवा संसद उत्साहात
- माय भारत केंद्राचा पुढाकार; व्यसनमुक्ती,
सामाजिक जाणीव आणि राष्ट्रनिर्मितीचा संदेश
नांदेड, दि. 23 :
युवकांना व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करण्यास प्रोत्साहन देऊन त्यांच्यात
सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रनिर्मितीची जाणीव जागृत करण्यासाठी भारत सरकारच्या
युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत माय भारत केंद्र, नांदेड
यांच्या वतीने ‘नशामुक्त युवा–विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित युवा संसद
कार्यक्रम धर्माबाद येथील हुतात्मा गोविंदराव पानसरे औद्योगिक प्रशिक्षण
संस्थेत उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात युवकांनी सामाजिक
प्रश्नांवर विचारमंथन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे
ज्ञानेश्वर बोंडवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कैलास गायकवाड व माहेश्वरी गायकवाड, तर प्रमुख वक्ते म्हणून वरिष्ठ संपादक शिवराज गाडीवान, वरिष्ठ संपादक हानमंतु देसाई आणि सोनकांबळे उपस्थित होते. मान्यवरांनी
तंबाखू, गुटखा, मद्य आणि अमली
पदार्थांच्या व्यसनामुळे युवकांचे आरोग्य, शिक्षण व भविष्य
धोक्यात येत असल्याचे सांगितले. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून आरोग्यदायी,
शिस्तबद्ध आणि सकारात्मक जीवनशैली अंगीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.
युवा संसदेत विद्यार्थ्यांना सामाजिक
प्रश्नांवर विचार मांडण्याची, चर्चेत सहभागी होण्याची
आणि नेतृत्वगुण विकसित करण्याची संधी मिळाली. युवकांनी सामाजिक परिवर्तनासाठी
पुढाकार घेऊन देशाच्या विकासात सक्रिय योगदान द्यावे, असा
संदेश या उपक्रमातून देण्यात आला. ‘नशामुक्त युवा म्हणजेच सशक्त भारताचा पाया’ या
विचारातून युवकांमध्ये आत्मविश्वास, सामाजिक जाणीव आणि
राष्ट्राप्रती कर्तव्यभावना निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन प्रा. अनुज मुंडकर यांनी केले, तर जितेंद्र
पाटील यांनी आभार मानले.
*******


No comments:
Post a Comment