Thursday, September 20, 2018


आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा जिल्हास्तरीय
उद्घाटन शुभारंभ 23 सप्टेंबर रोजी जिल्हा नियोजन भवनात होणार
नांदेड दि. 20 :- प्रधानमंत्री भारत सरकार यांच्या हस्ते रविवार 23 सप्टेंबर 2018 रोजी आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे उद्घाटन रांची (झारखंड) येथून देशभरात होणार आहे. या योजनेचा नांदेड जिल्हास्तरावरील उद्घाटन शुभारंभ रविवार 23 सप्टेंबर 2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन भवन येथे दुपारी 12 ते 2.30 यावेळेत करण्यात येणार आहे. त्याबाबत पूर्व तयारीची बैठक जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांचे निजी कक्षात आज घेण्यात आली. 
या कार्यक्रमास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना आमंत्रित करुन जिल्ह्यात नोंद झालेल्या लाभार्थ्यांपैकी काही निवडक लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात या योजनेच्या ई-कार्डचे वाटप करण्यात येणार आहेत. या योजनेत पात्र लाभार्थी कुंटुंबासाठी 5 लाख रुपये वर्षातून एकवेळा उपचारासाठी मिळणार आहेत. नांदेड जिल्ह्यात या योजनेचे 2 लाख 30 हजार लाभार्थी आहेत. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड व मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयाचा या योजनेसाठी अंतर्भाव करण्यात आला आहे. यावेळी  जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी कार्यक्रमाच्या तयारीच्या अनुषंगाने  संबंधितांना निर्देश दिले.
बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सहस्त्रबुद्धे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विद्या झिने, करमणूक कर शाखा नायब तहसिलदार श्रीमती उषा इज्जपवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. आर. गुंटूरकर, डॉ. वाय. एस. चव्हाण, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. विलास सर्जे, डॉ. अन्सारी, डॉ. दुर्गादास रोडे यांची उपस्थिती होती. 
यावेळी कार्यक्रमाच्या नियोजनाची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कदम यांनी तर योजनेची माहिती जिल्हा समन्वयक डॉ. सर्जे यांनी दिली. शेवटी आभार डॉ. गुंटूरकर यांनी मानले.
000000

Wednesday, September 19, 2018


सार्वजनिक गणेशमंडळामार्फत मतदार जनजागृती
नांदेड, दि. 19 :- धर्माबाद तालुक्यात एक गाव एक गणपती सार्वजनिक गणेश मंडळ येवती येथील सार्वजनिक गणेशमंडळामार्फत मतदार जनजागृती करण्यात आली.
यावेळी नायब तहसिलदार सुनील माचेवाड यांनी मतदार यादी शुद्धीकरण, नवीन मतदार नोंदणी, दुरुस्ती, स्थलांतर व मयत मतदारांचे नाव वगळणे या बाबींसाठी गावकऱ्यांनी बीएलओशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.
मतदार नोंदणी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोंबर 2018 च्याअनुषंगाने श्री. माचेवाड  यांनी येवती येथे भेट दिली. सार्वजनिक गणेश मंडळ येवती येथे मतदार जनजागृती अभियानाचे बॅनर लावण्यात आले. याप्रसंगी बीएलओ शिवकुमार पाटील, गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी, सरपंच, ग्रामसेवक मधुकर मुंगल, शालेय व्यवस्थापन  समिती अध्यक्ष बालाजी भोसले व गावकरी यांची उपस्थिती होती.
000000




ग्रामपंचायत निवडणुकीच्या मर्यादीत 
क्षेत्रापुरती 26 सप्टेंबर रोजी स्थानिक सुट्टी
नांदेड, दि. 19 :- नांदेड जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार आहे त्या मर्यादीत क्षेत्रापुरती बुधवार 26 सप्टेंबर 2018 रोजीची स्थानिक सुट्टी जिल्हाधिकारी नांदेड यांनी जाहिर केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून निर्दिष्ठ कार्यक्रमानुसार घेण्यात येत असलेल्या ग्रामपंचायतीच्या ऑक्टोंबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी तसेच सरपंच पदासाठी थेट निवडणुकीद्वारे भरण्यात येणाऱ्या रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जारी करण्यात आला आहे. या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रिया कार्यान्वतीत असून ग्रामपंचायत सार्वत्रिक मतदानाचा दिवस हा कार्यालयीन कामाचा दिवस असल्याने ग्रामपंचयातीच्या निवडणुका जेथे नियोजित आहेत, तेथील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा याकरीता महाराष्ट्र शासन परिपत्रक आणि शासन निर्णय राजस्व व सेवा विभाग नुसार निवडणूक आयोगाच्या 23 ऑगस्ट 2018 रोजीच्या आदेशान्वये नांदेड जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्या मर्यादीत क्षेत्रापुरती बुधवार 26 सप्टेंबर 2018 रोजीची स्थानिक सुट्टी जिल्हाधिकारी नांदेड यांनी जाहिर केली आहे. त्याबाबत अधिसुचना निर्गमीत करण्यात आली आहे.
000000


ग्रामपंचायत निवडणूक
मतदान-मतमोजणी केंद्र परिसरात 144 कलम
नांदेड दि. 19 :-जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून तसेच निवडणूक कालावधीत कायदा, सुव्यवस्था अबाधीत रहावी यादृष्टीने बुधवार 26 सप्टेंबर 2018 रोजी मतदान केंद्र परिसरात व गुरुवार 27 सप्टेंबर 2018 रोजी मतमोजणी केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी आदेश लागू केला आहे.
जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतीच्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या तसेच मतमोजणीच्या दिवशी संबंधीत तहसिलदार यांनी निश्चित केलेल्या मतमोजणी केंद्राच्या हद्दीपासून 200 मीटर परिसरातील मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त खाजगी वाहन, चिन्हांचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी प्रतिबंधीत करण्यात आले आहे.
हा आदेश मतदान केंद्राच्या हद्दीपर्यंत 26 सप्टेंबर 2018 रोजी मतदान सुरु झाल्यापासून मतदान संपेपर्यंत तर मतमोजणी केंद्राच्या हद्दीपर्यंत 27 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहील, असेही आदेशात म्हटले आहे.
00000


किनवट औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत
तासिका तत्वावरील पदांसाठी मुलाखती
नांदेड दि. 19 :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किनवट येथे जोडारी, कार्यशालेय गणित व चित्रकला आणि संधाता या व्यवसायाच्या निदेशकांच्या रिक्त पदावर अत्यंत तात्पुरत्या स्वरुपातील तासिक तत्वावर काम करण्यास इच्छूक असणाऱ्या विहित शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांनी सोमवार 24 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 11 वा. शैक्षणिक अर्हतेच्या प्रमाणपत्रासह औद्योगिक प्रशिक्षण संस्था किनवट येथे मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे. निवड झालेल्या उमेदवारांना शासनाच्या नियमाप्रमाणे तासिकेनुसार मानधन देय राहील, असे आवाहन किनवट येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे मुकुंद कुलकर्णी यांनी केले आहे.
000000

Tuesday, September 18, 2018


गैरहजरीबाबत शिक्षक कोणे यांना
रायगड जिल्हा परिषदेची नोटीस
नांदेड दि. 18 :- रायगड जिल्हा परिषदेत खाली नमूद केलेल्या प्राथमिक शिक्षक दयानंद मल्लप्पा कोणे या अनधिकृतपणे गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यास कळविण्यात येते की, तुम्हाला तुमच्या गैरहजेरीबाबत वारंवार कळवूनही तुम्ही हजर झालेले नाहीत. त्यामुळे ही नोटीस प्रकाशित झालेल्या तारखेपासून अनधिकृत गैरहजेरीचा खुलासा दहा दिवसाचे आत मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांचे कार्यालयात स्वत: हजर राहून सादर करावा. अन्यथा तुम्हाला सेवेची आवश्यकता नाही असे गृहीत धरुन आपली सेवा संपुष्टात आणण्यात येईल. तसेच महराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम 1982 च्या नियम 47 (1) च्या तरतुदीनुसार सेवेत खंड पडून मागील सेवेचा हक्क संपुष्टात येईल व परिणामी आपणास सेवानिवृत्तीचा लाभ मिळणार नाही व एकदा सेवा संपुष्टात आणल्यानंतर आपणास कोणत्याही प्राधिकाऱ्यांकडे तसेच न्यायालयात दाद मागता येणर नाही.
नमुद केलेल्या अनाधिकृत गैरहजर कर्मचाऱ्याचे नाव - दयानंद मल्लप्पा कोणे, हुद्दा - प्रा. शिक्षक, रहिवासी ठिकाण- मु. पो. जूनी ता. बिलोली जिल्हा नांदेड. नोकरीत असलेला तालुका महाड, अनधिकृत गैरहजेरीबाबत दिलेल्या नोटीस दिनांक 9 एप्रिल 2010, दिनांक 17 एप्रिल 2010, दि. 12 जानेवारी 2015, दि. 18 एप्रिल 2018. अनधिकृत गैरहजर असल्यापासूनची तारीख 17 ऑगस्ट 2002, असे रायगड जिल्हा परिषद अलिबागचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी कळविले आहे.  
000000


शासकीय अध्यापक महाविद्यालयात
घडयाळी तासिकेवरील जागेसाठी मुलाखती  
नांदेड दि. 18 :- शासकीय अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे शैक्षणिक वर्षे 2018-19 साठी अगदी तात्पुरत्या स्वरुपात घडयाळी तासिकेवर (सीएचबी) सहा जागा भरण्यात येणार आहेत. इच्छूक उमेदवारांनी मुळ कागदपत्रांसह सोमवार 24 सप्टेंबर 2018 रोजी शासकीय अध्यापक महाविद्यालय शोभानगर पाण्याच्या टाकीजवळ नांदेड येथे सकाळी 11 वाजता स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित रहावे.
विषयानुसार प्रत्येकी एका जागेसाठी पात्रता पुढील प्रमाणे आहे. मराठी, इतिहास व भूगोल या विषयासाठी महाराष्ट्र शासन व एनसीटीईच्या नियमानुसार शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. परमॉमिंग आर्टस शिक्षक व शारीरिक शिक्षण निर्देशक- पदव्युत्तर पदवी, फाईन आर्टस शिक्षक- ग्रंथालय माहितीशास्त्र पदवी आवश्यक आहे, असे नांदेड शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी कळविले आहे.   
0000000

वृत्त   निवडणूक तयारीत सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा - विभागीय आयुक्त जी. श्रीकांत नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत निवडणूक तयारीचा आढावा छत्रपती ...